राजशेखर या काव्यशास्त्रज्ञाने ९ व्या शतकात रचलेला संस्कृत साहित्यशास्त्र विषयक ग्रंथ. इ.स. ७ व्या आणि ८ व्या शतकात भारतात होत असलेल्या वैचारिक मंथनाचे या ग्रंथात प्रतिबिंब पडलेले आहे. साहित्यशास्त्राचा यापूर्वीचा पाया अलंकारशास्त्र हा होता.भामह,उद्भट,दण्डी या काव्यशास्त्राच्या विद्वानांनी अलंकार हा काव्याचा आत्मा मानला. पुढे वामन यांनी रीती हा काव्याचा आत्मा आहे असे म्हटले. भरतमुनींनी मांडलेल्या रसाची संकल्पना भट्टनायक,आचार्य अभिनवगुप्त यांनी आणखी तपशीलात मांडली.आचार्य मम्मटांनी त्या विचारांना स्थिरता आणली. तोपर्यंत काव्यशास्त्राची गणना तत्त्वज्ञानात्मक शास्त्रात केली गेली नव्हती. मात्र आचार्य आनन्दवर्धन, अभिनवगुप्ताचार्य अशा अभ्यासकांनी तत्त्वज्ञानात्मक संकल्पनांचा आधार काव्यातील संकल्पनांना दिला. त्याचप्रमाणे राजशेखरानेही काव्यशास्त्राला गंभीरपणे मांडण्याचा सुव्यवस्थित प्रयत्न केला. काव्यमीमांसा या ग्रंथशीर्षकातूनही ते स्पष्ट होते. तत्त्वज्ञानपर ग्रंथांप्रमाणे हा देखील काव्याची मीमांसा करणारा ग्रंथ आहे याची त्याने स्पष्टपणे जाणीव करून दिली. साहित्यशास्त्राला प्रमाणभूत शास्त्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी त्याचा वेदांशी संबंध दाखविला, पुरुषार्थ सिद्धी आणि सूत्ररूप शैली याचा जाणीवपूर्वक वापर केला.

कोणत्याची एका काव्यशास्त्र ग्रंथातील केवळ एखाद्या सिद्धान्ताची चर्चा या ग्रंथात केलेली नाही तर साहित्यशास्त्रातील यापूर्वी प्रतिपादन झालेल्या सर्वच विषयांचे संकलन करून त्यातील योग्य मतांची दखल घ्यावी तसेच योग्य मतांचे समर्थन करावे आणि सदोष वाटणाऱ्या मतांचे खंडन करावे अशी राजशेखराची भूमिका या ग्रंथात प्रकट झाली आहे. काव्यशास्त्राला प्रौढ, सर्वसमावेशक व विद्वन्मान्य स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी या ग्रंथाची रचना केली गेली. कौटिल्याचे अर्थशास्त्र आणि वात्सायनाचे कामसूत्र तसेच ब्रह्ममीमांसा आणि धर्ममीमांसा या ग्रंथांची शैली तसेच विषय याचा प्रस्तुत ग्रंथाच्या लेखनावर पुष्कळ प्रभाव असल्याचे दिसून येते. काव्यशास्त्राला वेदाङ्गाचा दर्जा आहे असे राजशेखर यांनी प्रतिपादन केले. त्यामुळे काव्यशास्त्र हे अवैदिक म्हणून उपेक्षित राहणार नाही अशी त्यांची भूमिका दिसते. अर्थ आणि धर्म या दोन्हींना काव्यशास्त्रामुळे पुष्टी मिळते.

एकूण १८ अधिकरणे रचण्याचा कवीचा मूळ संकल्प त्याने बोलून दाखवला असला तरी प्रत्यक्षात तो संकल्प पूर्णत्वाला गेला नसावा. कारण आज या ग्रंथाचे केवळ पहिले ‘कविरहस्य’ हे एकमेव अधिकरण उपलब्ध आहे. अर्थात या एका अधिकरणाचाही विस्तार मोठा आहे. शास्त्रसंग्रह या पहिल्या अध्यायात श्रीकण्ठ म्हणजेच शिवाने काव्यशास्त्राचा शिष्यांना उपदेश केला त्यासंबंधी माहिती येते. तसेच काव्यशास्त्राशी ब्रह्मदेव आणि काव्यपुरुषाचा संबंध सांगितला आहे. ब्रह्मदेवाने आपल्या शिष्यांना ही विद्या दिली त्यातील एक शिष्य काव्यपुरूष हा होता. त्याला भू,भुव आणि स्वर्ग या तीनही लोकांमध्ये काव्यविद्येचा प्रसार करायला सांगितले. काव्यपुरुषाने अठरा अधिकरणे असलेल्या काव्य विद्येसंबंधी शिष्यांना विस्ताराने सांगितले. या प्रकारे काव्यशास्त्राच्या विषयांचा निर्देश करत राजशेखर यांनी आपल्या ग्रंथातील अठरा अधिकरणांचे विषय सांगितले आहेत.

शास्त्रग्रंथांप्रमाणेच राजशेखराने पहिल्या अधिकरणाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथातील प्रकरणांचा निर्देश केला आहे.अधिकरणाची विषयसूची पुढीलप्रमाणे – शास्त्रसंग्रह, शास्त्रनिर्देश, काव्यपुरुषोत्पत्ति, पदवाक्यविवेक, पाठप्रतिष्ठा, अर्थानुशासन, वाक्यविधी, काव्यविशेष, कविचर्या, राजचर्या, काकुप्रकार, शब्दार्थहरणोपाय, कविसमय, देशकालविभाग आणि भुवनकोश.

काव्य आणि कवी या दोघांच्या संबंधी आवश्यक विषयांचा यात समावेश आहे. काव्यपुरुषाची उत्पत्ती, विकास कसा झाला, त्याची भौगोलिक उत्पत्ती काय? या शास्त्राचे अध्ययन करू इच्छिणारा शिष्य कसा असला पाहिजे, प्रतिभा आणि व्युत्पत्ती दोन्ही समानरूपाने कशा महत्त्वाच्या आहेत, पद आणि वाक्य म्हणजे काय? याप्रकारच्या काव्याचे स्वरूप स्पष्ट करणाऱ्या अनेक मुद्दयांची विस्तृत चर्चा यामधे आहे.काव्याचा अर्थ हा त्याचा प्राण आहे. काव्याचे स्वरूप कसे असते? काव्याला शब्दांमुळे सरसता कशी प्राप्त होते यासंबंधी वर्णन केले आहे. दहाव्या अध्यायात कवी आणि राजा यांची दिनचर्या कशी असावी ते सांगितले आहे. कविच्या लेखनाला बाधा आणू शकणाऱ्या आणि कविने टाळलेच पाहिजे अशा काही शब्दहरण आणि अर्थहरण याच्या संबंधीचे विचार नमूद केले आहेत. त्याचप्रमाणे कविला काव्य रचनेसाठी उपयुक्त असणाऱ्या समयवर्णन, देश, काल अशा अनेक गोष्टींची माहिती या ग्रंथात समाविष्ट केली आहे.राजशेखर यांचा भौगोलिक विषयांचा उत्तम व्यासंग होता. देशपरिचयामधे भारतखण्डातील अनेक द्वीप, भूभाग, त्या त्या भूभागातील जनपद, नगरे, नदी, पर्वत अशांचा चांगला परिचय सतराव्या अध्यायात करून दिला आहे. तर अठराव्या अध्यायात प्रकृतिवर्णनासाठी आवश्यक तत्त्वांचे विवेचन केले आहे. साहित्यशास्त्रात या गोष्टींचा समावेश राजशेखर सोडून कोणी केलेला दिसत नाही. १८व्या अध्यायाच्या शेवटी प्रथम अधिकरण समाप्त झाल्याचा स्पष्ट निर्देश असल्यामुळे त्यानंतरचा १९ वा भुवनकोश हा अध्याय होता किंवा नाही या विषयी शंका आहे. काही विद्वजनांच्या मते भुवनकोश हा राजशेखराचा स्वतंत्र ग्रंथ होता. पण तसे असते तर विषयसूचीत त्या विषयाचा समावेश केला नसता.

ग्रंथामधील बहुतेक विषय कवीसाठी तात्त्विक आणि व्यावहारिक दृष्टया उपयुक्त आहेत. विषयाची स्थूल मांडणी करून मग त्याचे वर्गीकरण, पोटभेद करत विषयाच्या खोलात विवेचन करणारी रचना दिसते. आपले मत प्रतिपादन करीत असता राजशेखर इतर काव्यशास्त्रज्ञांच्या मतांचा उल्लेख करून त्यावर साधक-बाधक चर्चा करतो.त्यात त्याने पत्नी अवंतिसुंदरी हिचीही मते उद्धूत केली आहेत. आणि शेवटी आपले मत ‘यायावरीय’ या कुलनामासहित दिले आहे. भारतातील वेगवेगळया भाषांबद्दल आपुलकी व अभ्यास,स्त्रियांच्या लेखनकौशल्यावर विश्वास आणि कवीसाठी व्यावहारिक तपशीलांचा ऊहापोह ही काही या लेखनाची वैशिष्टये नमूद केली पाहिजेत.

संदर्भ :

  • अभ्यंकर,कमल, राजशेखराची काव्यमीमांसा श्रीविद्या प्रकाशन,१९९२.
  • मिश्र, पं. मधुसूदन(संपा), काव्यमीमांसा  चौखम्बा संस्कृत सीरिज, बनारस, १९३४.

समीक्षक – अंजली पर्वते

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content