एक देशव्यापी राजकीय पक्ष. भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी या पक्षाची स्थापना १७ ते २० जुलै १९४२ च्या नागपूर परिषदेमध्ये केली. मद्रास येथील नेते रावबहादूर एन. शिवराज हे या परिषदेचे अध्यक्ष होते. यापूर्वी अस्तित्वात असलेला त्यांचा स्वतंत्र मजूर पक्ष (१९३६-४२) बरखास्त करून वासाहतिक भारतीय राजकारणात होत असलेल्या सांविधानिक बदलाच्या पार्श्वभूमीवर या नवीन पक्षाची स्थापना करण्यात आली होती. ब्रिटिश भारतातील सांविधानिक बदलाच्या प्रक्रियेमध्ये दलितांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी या पक्षाची स्थापना झाली. मात्र जरी शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन (शेकाफे) हा नावाने भारतातील दलितांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष वाटत असला, तरी हा पक्ष केवळ दलितांचा नसून सर्व कामगारांचा हा पक्ष आहे, हे या पक्षाच्या जाहीरनाम्यात स्पष्ट होते.

१९४२ च्या नागपूर परिषदेमध्ये शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनची कार्यकारिणी निवडणुकीद्वारे नियुक्त करण्यात आली होती. या परिषदेमध्ये हजारो प्रतिनिधी उपस्थित होते. बंगाल, बॉम्बे, पंजाब, केंद्रीय प्रांत व बरार आणि सयुंक्त प्रांत येथून सर्व प्रतिनिधी आले होते. आंबेडकरांच्या क्रिप्स मिशन बद्दलच्या भूमिकेला पूर्ण समर्थन देणे, हा या परिषदेचा उद्देश होता. परिषदेमध्ये विविध ठराव पास करण्यात आले. त्यामध्ये पहिला ठराव सर स्टॅफर्ड क्रिप्स (१९४२) ने सूचित केलेल्या सांविधानिक बदलाच्या प्रस्तावाचा निषेध करणे हा होता. शेकाफेच्या मते हा बदल म्हणजे ब्रिटिश सरकारकडून शेड्यूल्ड कास्ट्सच्या (अनुसूचित जाती) हितांचा विश्वासघात होता. तसेच हे ब्रिटिशांनी दिलेल्या आश्वासनांचे उल्लंघन होते; ज्यामध्ये दलितांच्या संमतीशिवाय नवीन संविधान लागू केले जाणार नव्हते. त्याचसोबत इतरही ठराव मांडण्यात आले. प्राथमिक आणि उच्च शिक्षणाकरिता निधी, सरकारी नोकरी, सर्व कायदेमंडळात प्रतिनिधित्व आणि अस्पृश्यांकरिता स्वतंत्र मतदारसंघ मिळविणे आदी ठराव मांडण्यात आले. खेड्यांच्या व्यवस्थेत मूलगामी बदल होण्याची आवश्यकता नमूद करून जिथे शेड्यूल्ड कास्ट्सचे शतकानुशतके शोषण होत आहे, ते थांबविण्यासाठी ठरावात सांविधानिक तरतुदींच्या माध्यमातून शेड्यूल्ड कास्ट्सला स्वतंत्र शेड्यूल्ड कास्ट्स खेड्यांमध्ये स्थलांतरित करण्यात यावे, असे मंजूर करण्यात आले. अंतिम ठरावाद्वारे शेड्यूल्ड कास्ट्सच्या राजकीय हितांकरिता लढणारा पक्ष म्हणून शेड्यूल्ड कास्ट्स फेडेरेशनची स्थापना करण्यात आली.

जुलै-ऑक्टोबर १९४६ मध्ये शेकाफेने स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीकरिता पुणे, नागपूर, लखनौ आणि कानपूर येथील राज्य विधिमंडळासमोर सत्याग्रह केले. या सत्याग्रहाचा प्रभाव महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील जनतेच्या राजकीय भूमिका तयार करण्यात महत्त्वपूर्ण राहिला. याच दरम्यान आंबेडकरांची व्हाइसरॉयच्या कौन्सिलमध्ये मजूरमंत्री म्हणून नियुक्ती झाली. १९४५-४६ च्या प्रांतिक निवडणुकीत शेकाफे पराभूत झाला. मुंबई प्रांतामध्ये एकही उमेदवार निवडून आला नाही, तर प्रत्येकी एक उमेदवार हा बंगाल आणि केंद्रीय प्रांतिक कायदेमंडळातून निवडून आले. मे १९४६ मध्ये भारतात आलेल्या कॅबिनेट मिशनसाठी आंबेडकरांनी तयार केलेल्या माहितीनुसार प्राथमिक निवडणुकीत, ज्यात फक्त शेड्यूल्ड कास्ट्सनेच मतदान केले होते, त्यामध्ये शेकाफे आणि काँग्रेसच्या तुलनेत मद्रास, बॉम्बे आणि केंद्रीय प्रांतांमध्ये अधिक मते मिळविलेली होती. त्यामुळे आंबेडकरांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला अधिक बळकटी मिळाली; तथापि या मागणीस तसेच शेकाफेला महत्त्वपूर्ण पक्ष म्हणून मान्यता देण्यास ब्रिटिश तयार नव्हते. जोगेंद्रनाथ मंडल व मुस्लिम लीग यांच्या  माध्यमातून  बंगालमधून आंबेडकरांची संविधान समितीवर निवड झाली. परंतु आंबेडकर ज्या भागातून नियुक्त झाले होते, तो भाग फाळणीत पाकिस्तानमध्ये निघून गेल्याने त्यांची उमेदवारी रद्द झाली. पुढे मुंबई काँग्रेसने आंबेडकरांना संविधान सभेत पाठविले.

१९५१-५२ मध्ये झालेल्या निवडणुकीत शेकाफेचे मुंबईतून लोकसभेसाठी चार उमेदवार उभे होते त्यांपैकी पी. एन. राजभोज (पूर्वीचे काँग्रेसपुढारी) चांभार जातीतून सोलापूर येथून निवडून आले. आंबेडकर हे उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणुकीत उभे होते, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. मुंबई विधिमंडळात शेड्यूल्ड कास्ट्ससाठी २७ जागा राखीव होत्या. परंतु शेकाफेने ३८ जणांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत बी. सी.  कांबळे यांचा विजय झाला व इतर सर्व उमेदवारांचा पराभव झाला. बी. सी. कांबळे हे महार जातीतील उच्चशिक्षित वकिली पेशातील होते. पुढे आंबेडकरांनी व्यापक राजकारणाची आखणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या स्थापनेचा आराखडा तयार केला (१९५६).

 

संदर्भ :

  • Jeffrelot, Christophe, Dr. Ambedkar and Untouchability : Analysing and Fighting Caste, Delhi, 2004.
  • Omvedt, Gail, Dalits and the Democratic Revolution: Dr. Ambedkar and the Dalit Movement in Colonial India, Delhi, 2007.
  • खैरमोडे, चांगदेव भवानराव, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, पुणे, २००२.
  • फडके, य. दि. आंबेडकरी चळवळ, पुणे, २००७.

                                                                                                                                    समीक्षक :  अरुणचंद्र पाठक