राजकीय संपर्क. आधुनिक राजकीय विश्लेषणातील ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. राजकीय व्यवस्था सतत कार्यरत राहण्यासाठी तिच्यातील एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे राजकीय स्वरुपाची माहिती संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे राजकीय संसूचन, विज्ञापन, संज्ञापन किंवा संदेशवहन होय. संसूचन हे राजकीय व्यवस्थेचे एक महत्त्वाचे अंगभूत कार्य आहे. राजकीय रचनांच्या विविध अंगांना साधणे हे महत्त्वाचे कार्य संसूचन प्रक्रियेद्वारे साधले जाते. हया प्रक्रियेत राजकीय माहितीचा प्रवाह एका रचनेकडून दुसरीकडे असा एकमार्गी नसतो. तर राजकीय माहितीची देवाणघेवाण होत राहते.

कल्पनाचित्र

सर्व प्रकारच्या माहितीच्या देवाणघेवाणीचा राजकीय संपर्कात समावेश होतो, जसे की – लिखित शब्द किंवा मौखिक शब्द, चिन्हे, प्रतीके, दर्शके आणि प्रतिकात्मक कृती किंवा हालचाली. राजकीय संसूचनाचे कार्य हे विशिष्ट संस्था अगर संघटनांच्या मार्फतही होत असते. राजकीय संसूचनाची अनेक साधने/मार्ग आहेत. उदाहरणार्थ, वृत्तपत्रे, वृत्तपरिषदा, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, चित्रपट, नाटक, सभा, संमेलने, मिरवणुका, राजकीय पक्ष, दबावगट, व्यावसायिक व वैचारिक संघटना, विधिमंडळ व विधिमंडळ सदस्य, शासनाचा माहिती विभाग, प्रकाशन विभाग आणि जनसंपर्क विभाग तसेच राष्ट्रीय नेत्यांचे दौरे, सार्वजनिक भाषणे, नियतकालिकांना दिलेल्या मुलाखती. या सर्व घटकांद्वारे राजकीय  संसूचन सतत सुरु असते. कोणत्याही सामाजिक पर्यावरणात राजकीय संसूचन होत असते. दोन किंवा अधिक व्यक्तींनी केलेली चर्चा, निवडून दिलेल्या प्रतिनिधींवर मतदारांनी ठेवलेले लक्ष ही देखील त्यादृष्टीने राजकीय संसूचनाचीच उदाहरणे म्हणता येतील. आल्मंडन या राजकीय विचारवंताने  राजकीय संपर्क आदान मानले आहे. कारण त्यामुळे राजकीय व्यवस्थेला रुपांतर प्रक्रियेची क्षमता वाढविणे शक्य होते. राजकीय संपर्काच्या अभ्यासात संपर्काचे उगम, माध्यमे, संपर्काचा आशय इत्यादी घटकांचा अभ्यास होतो.

माहिती नियंत्रण शास्त्र (Cybernetics) व संसूचन सिध्दातांच्या आधारे कार्ल ड्वाईशने राजकीय संसूचनाचा दृष्टीकोन मांडला. विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी मानवी प्रयत्नांना चालना देणे आणि त्यांचा समन्वय साधणे ही राजकारणातील आणि प्रशासनातील मूलभूत प्रक्रिया आहे अशी संसूचन दृष्टीकोनाची आधारभूत भूमिका आहे. त्याच्या मते, संसूचन हे राजकीय व्यवहारांचे एक गतिशील तत्व आहे की ज्याव्दारे राजकीय व्यवस्थेतील एक घटक दुसऱ्या घटकाला संदेश पोहोचवितो. विविध वार्ताप्रवाहांवर आधारलेली निर्णय प्रक्रियेची व्यवस्था म्हणजे शासन होय असे ही प्रतिपादन ड्वाईशने केले आहे. संसूचनाव्दारे राजकीय व्यवस्था आपल्या ध्येय-धोरण आणि कार्यक्रमांची माहिती लोकांना देते. संसूचनाच्या माध्यमातूनच राजकीय निर्णय घेणारे केंद्र आणि विविध प्रकारच्या संस्था आणि गट यांच्यामध्ये सांमजस्य निर्माण होते.

संदर्भ :

  • व्होरा,राजेंद्र,पळशीकर,सुहास,राज्यशास्त्र कोश,पुणे,१९८७.