ट्रिपल अलायन्स म्हणजेच त्रिराष्ट्र लष्करी करार. जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी आणि इटली यांच्यामध्ये पहिल्या महायुद्धापूर्वी हा करार झालेला होता (२० मे १८८२). या करारानुसार फ्रान्सविरोधात जर्मनीला इटलीकडून मदत मिळेल, अशी व्यवस्था प्रशियाचा चान्सेलर बिस्मार्क याने केली. त्याची पार्श्वभूमी अशी : उत्तर आफ्रिकेतील ट्युनिशिया या प्रदेशावर वर्चस्व मिळवण्यासाठी इटलीने प्रयत्न चालवले होते. मात्र या प्रदेशावर फ्रान्सचेही लक्ष होते. परिणामी फ्रान्स व इटली यांच्यामध्ये संघर्ष चालू होता. हा संघर्ष जास्तीत जास्त वाढावा व इटली जर्मनीच्या जवळ यावी याकरिता बिस्मार्कने राजकारण केले. बिस्मार्कने इटलीस ट्युनिशियाचा कब्जा घ्यावा, अशी सूचना केली. दुसरीकडे बिस्मार्कने फ्रान्सला ट्युनिशिया जिंकण्यास काहीच हरकत नाही, असे अप्रत्यक्ष सांगितले. परिणामी फ्रान्सने १८८१ मध्ये ट्युनिशिया हा प्रदेश जिंकून घेतला व तो आपल्या साम्राज्यास जोडला. हा प्रदेश इटलीला हवा होता आणि तो फ्रान्सने घेतल्यामुळे इटलीने जर्मनीकडे फ्रान्सविरोधात मदत मागितली.
जर्मनीच्या संरक्षणाकरिता बाल्टिकपासून भूमध्य समुद्रापर्यंत जर्मनीच्या प्रभावाखाली एक राष्ट्रगट निर्माण करण्याची बिस्मार्कची योजना होती. ती योजना इटलीने मदत मागताच सफल झाली. बिस्मार्कने याअगोदर १८७९ मध्ये ऑस्ट्रियाबरोबर द्विराष्ट्र मैत्रीचा करार केला होता. बिस्मार्कने या द्विराष्ट्र करारामध्ये इटलीला सामील करून घेतले. त्यामुळे जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी व इटली या देशांमध्ये त्रिराष्ट्र मैत्री करार म्हणजेच ट्रिपल अलायन्स अस्तित्वास आला. या करारानुसार खालील तरतुदींना या देशांनी मान्यता दिली :
१. फ्रान्सने इटलीवर काहीही कारण नसताना हल्ला केल्यास त्रिराष्ट्र लष्करी कराराच्या इतर दोन राष्ट्रांनी ऑस्ट्रिया व जर्मनीने सर्व सामर्थ्यानिशी इटलीच्या मदतीला जावे.
२. फ्रान्सने काहीही कारण नसताना जर्मनीवर हल्ला केला, तर इटलीने सर्व सामर्थ्यानिशी जर्मनीच्या मदतीला जावे.
३. ऑस्ट्रिया-हंगेरी व रशिया यांच्यामध्ये युद्ध झाल्यास इटलीने तटस्थ राहावे.
४. त्रिराष्ट्र मैत्री करार हा पूर्णतः गुप्त राहील, असे तिन्ही राष्ट्रांनी मान्य केले.
५. त्रिराष्ट्र मैत्री करार हा प्रथम सहा वर्षांसाठी राहील; नंतर त्याचे नूतनीकरण करण्यात येईल.
६. त्रिराष्ट्र मैत्री करारामधील तीन राष्ट्रांमध्ये परस्परांबरोबर शांतता व मैत्रीचे संबंध राहतील. करारामध्ये सहभागी देश राजकीय, आर्थिक प्रश्नावर एकमेकांना सहकार्य व विचारांची देवाणघेवाण करतील. एकमेकांना सहकार्य करतील.
७. त्रिराष्ट्र मैत्री करारामधील तीन राष्ट्रांपैकी एक किंवा दोन राष्ट्रे यूरोपातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त राष्ट्रांशी युद्धात गुंतली, तर तिन्ही मित्रराष्ट्रांनी परस्परांना लष्करी मदत द्यावी व सयुंक्तपणे शत्रूचा प्रतिकार करावा.
८. त्रिराष्ट्र लष्करी करारापैकी कोणत्याही राष्ट्राच्या सुरक्षेला यूरोपच्या एखाद्या बड्या राष्ट्राकडून धोका निर्माण झाल्यामुळे त्या राष्ट्राविरोधात युद्ध पुकारणे त्या राष्ट्राला भाग पडल्यास इतर दोन राष्ट्रांनी अनुकूल तटस्थता बाळगावी.
९. फ्रान्सने भूमध्य सागरीय व उत्तर आफ्रिकन प्रदेशांत व्यापार, संरक्षण किंवा सार्वभौमत्वाचा विस्तार यांपैकी कोणत्याही दृष्टीने हालचाल केल्यास, इटलीला आपले संरक्षण करणे आवश्यक वाटल्यास, त्याने फ्रान्सबरोबर युद्ध करण्याचा प्रस्ताव ठेवला, तर त्याच्या मागणीनुसार फ्रान्सबरोबर युद्ध केले जाईल.
अशाप्रकारे काही अंशी फ्रान्स व रशियाविरोधात अस्तित्वात आलेला हा त्रिराष्ट्र लष्करी करार होता. मध्य यूरोपात जर्मनीच्या संरक्षणाकरिता बिस्मार्कने घडवून आणलेला हा करार युद्धपूर्व काळात अत्यंत महत्त्वाचा ठरला. पुढे ठरावीक काळानंतर या कराराचे नूतनीकरण होत गेले.
या करारामुळे यूरोपातील इतर राष्ट्रांना धोका निर्माण झाला. त्याचा परिणाम फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यामधील वितुष्ट संपुष्टात येऊन फ्रान्सने रशिया व इंग्लंड यांच्याबरोबर त्रिराष्ट्र समहित (ट्रिपल एन्टीटी) प्रतिकरार केला (१९०४). यामधून पहिल्या जागतिक महायुद्धाची बीजे रोवली गेली.
संदर्भ :
- Grenville, John; Wasserstein, Bernard, Eds., The Major International Treaties of the Twentieth Century, 2013.
- Hamilton, Richard F.; Herwig, Holger H. Eds., The Origins of World War- I, 2003.
- वैद्य, सुमन, आधुनिक जग : १८७१ ते १९४५, नागपूर, १९८८.
समीक्षक : अरुण भोसले