बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या पारंपरिक सामग्रीमध्ये माती, दगड, खडी, वाळू, विटा, कौले, फरशी, चुना, लाकूड, पत्रे व लोखंड यांचा मुख्यत्वे समावेश होतो.

माती : नैसर्गिक रीत्या मोठ्या प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने माती उपलब्ध होते. कणाकणांनी बनलेल्या मातीचे गुणधर्म हे कणांतील खनिजे व त्यांचे प्रमाण, कणांचे आकारमान, त्यांतील पोकळी व पाणी, कणांचे घनीभवन इत्यादींवर अवलंबून असतात. उन्हात वाळविलेल्या मातीच्या कच्च्या विटांचा उपयोग घरांच्या भिंतींसाठी करतात. मातीचा गारा तयार करून त्याचा उपयोग पक्क्या विटांचे बांधकाम व दगडांचे बांधकाम यांसाठी करतात. तसेच मातीचा उपयोग गिलाव्यासाठी करतात.

दगड : यांतील खनिजांचे कण एकमेकांशी घट्ट चिकटलेले असल्यामुळे दगडांची भार पेलण्याची क्षमता खूपच जास्त असते. तसेच ऊन, वारा, पाऊस व इतर कारणांनी कण सुटे होऊन दगडांची झीज होण्याचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे बांधकामासाठी दगडाची निवड फार पूर्वीपासून केली जात आहे. भारवाही भिंत, धरणांच्या भिंती, अवजड यंत्रांसाठी चौथरे, स्मारके यांसाठी दगडांचा उपयोग केला जातो. तुळया व खांब या रूपांतही उपयोग करतात.

खडी व वाळू : दगडगोटे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून वाळू तयार होते; तर दगडगोटे हातोड्याने व दलित्राने (दगड फोडण्याच्या यंत्राने) फोडून खडी तयार करतात. मूळ दगडांचे जलाभेद्यता, भार पेलण्याची क्षमता आदि महत्त्वाचे गुणधर्म खडीमध्ये राहत असल्यामुळे तिचा उपयोग क्राँक्रीट, रस्तेबांधणी इ. ठिकाणी करतात; तर वाळूचा उपयोग चुना व सिमेंट यांचा गारा व काँक्रीट करण्यासाठी करतात.

समुद्र, नदी, नाले, ओढे व तलाव अशा ठिकाणी वाळूचे स्रोत असतात. क्वॉर्ट्झ हा वाळूतील प्रमुख घटक असतो. वाळूमध्ये माती, रसायने, मीठ असे घटक असू शकतात. ज्या वाळूतील मातीचे प्रमाण सात टक्क्यांपेक्षा कमी असते, अशी वाळू बांधकामासाठी योग्य समजली जाते. खडकांपासून बनविलेल्या कृत्रिम वाळूने (क्रश सॅण्ड) नैसर्गिक वाळूला उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. खडी दलित्रावर व्हीएसआय यंत्रणा बसविली असता कृत्रिम वाळू तयार करता येते. या वाळूमध्ये भुकटीचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा अधिक नसावे. या वाळूला पाण्याची गरज कमी लागते. उच्च प्रतीचे क्राँक्रीट, वीटकाम, प्लॅस्टर करण्यासाठी तिचा वापर उपयुक्त ठरत आहे.

विटा : बांधकामातील भिंती बांधण्यासाठी मातीच्या विटांचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. मातीमध्ये ॲल्युमिना व सिलिका यांचे प्रमाण अधिक असते; तर चुना, लोखंड, मॅग्नेशिया इ. कमी प्रमाणात असतात. मातीच्या विटा भाजल्यावर त्यातील खनिजाची  नवीन संयुगे तयार होऊन सुटे कण घट्ट होतात. त्यामुळे विटा जास्त भार पेलू शकतात आणि जलाभेद्य होतात. बांधकामात सर्वसाधारणपणे ९ इंच, ६ इंच किंवा ४ इंच जाडीच्या भिंती बांधल्या जातात. त्यासाठी योग्य आकारांच्या विटांची निवड करतात. प्रत्यक्ष वापर करण्याअगोदर विटांची चाचणी करतात. त्यांमध्ये रंगाचे सातत्य, कानेकोपरे, काटकोन, आकार, पाणी शोषणक्षमता इ. गोष्टींचा समावेश असतो. विटांची तुटफूट एकूण संख्येच्या ५ टक्क्यांपेक्षा अधिक नसावी.

कौले : छप्परांसाठी मातीची वेगवेगळ्या आकाराची कौले (उदा., सपाट, पन्हाळी, मंगलोरी) वापरतात. साधारणपणे कौलांसाठी चिकणमाती वापरतात, त्यामुळे भाजल्यावर कौले जलाभेद्य होतात.

फरशी : थर असलेल्या दगडांच्या पातळ व कमी जाडीच्या फरश्यांत कमी झीज होणे व जलाभेद्यता हे गुण असतात. यंत्राच्या साहाय्याने पृष्ठभागावरील उंचसखलपणा काढून टाकून फरश्यांना चकाकी आणता येते. पॉलिश केलेल्या शहाबादी फरश्यांचा उपयोग इमारतींच्या जमिनी, पायऱ्या इत्यादींसाठी करतात.

चुना : चुनखडी भाजून तयार होणाऱ्या चुन्यात पाणी पडल्यावर त्याचा पुन्हा हवेशी संयोग होऊन कठीण पदार्थात रूपांतर होते आणि त्याचबरोबर बांधकामातील बाजूच्या विटा, दगडी चिरे इत्यादींना तो घट्ट धरून ठेवतो. चुना व वाळू यांचा गारा तयार करतात. या गाऱ्याचा उपयोग दगड-विटांचे बांधकाम, गिलावे क्राँक्रीट यांसाठी करतात. विटांचा बारीक चुरा चुन्यात मिसळून वापरल्यास गिलावा सपोत व भेगारहित होतो.

लाकूड : घर बांधताना दरवाजे, खिडक्या, तुळया, जिना, छत, कमानी इत्यादी ठिकाणी लाकडाचा वापर करतात. सागवान, साल, बाभूळ, आंबा, देवदार, ओक, पाम अशा अनेक झाडांचे लाकूड बांधकामाकरिता वापरतात. चांगल्या प्रतीच्या लाकडातून उष्णतेचे वहन होत नाही. तसेच त्यामध्ये जलरोधकता असते. लाकडाची ज्वलनरोधकता वाढविण्यासाठी पृष्ठभाग स्वच्छ करून त्यावर सोडियम आर्सेनेट अथवा सिलिकेटाचे आवरण दिले जाते.

पत्रे व लोखंड : बांधकामात साधारणपणे घडीव लोखंडाचा उपयोग सांडपाण्याचे नळ, कड्या, कोयंडे इत्यादींसाठी केला जाते. जस्तलेपित पत्र्यांचा उपयोग छपरांसाठी तसेच आडभिंती म्हणून केला जाते. पायातील कुसव व पुलाचे लोखंडी खांब यांसाठी लोखंडाचा उपयोग करतात. पाण्याच्या नळांसाठीही लोखंड वापरतात. पोलादाचे खिळे, स्क्रू, नट, बोल्ट यांचा जोडकामासाठी उपयोग होतो. छपरांच्या कैच्या, खांब, खिडक्यांच्या चौकटी यांसाठीही पोलादाचा उपयोग होतो.

 

समीक्षक : विनायक सूर्यवंशी