इस्लामी गूढवादी परंपरेमधल्या महत्त्वाच्या चार संप्रदायांपैकी एक संप्रदाय. याचा उगम अफगाणिस्तानातील चिश्त गावात इ.स.च्या १० व्या शतकात झाल्याचे मानतात. पुढे १२ व्या शतकापर्यंत या संप्रदायाचा प्रसार अफगाणिस्तानापुरता मर्यादित न राहता भारतीय उपखंडातही तो पसरला. या संप्रदायाने आपली पाळेमूळे भारतामध्ये खोलपर्यंत पसरवली. चिश्तींनी स्थानिक लोकांसाठी आपली प्रार्थनास्थळे आणि उपासनापद्धती खुली केली. ज्या लोकांना याबद्दल कुतूहल निर्माण झाले त्यांना सूफी तत्त्वे शिकविण्याची सोयही त्यांनी दिली. परिणामी सूफी गूढवादाकडे लोक आकर्षित होऊन चिश्तींना संतांचा दर्जा मिळाला. लोकांमध्ये त्यांचा प्रभाव वाढत राहिला. तत्कालीन राजांपैकी सम्राट अकबराचा आणि त्याच्या कुटुंबाचा चिश्तींवर लोभ असल्यामुळेही हा प्रभाव वाढण्यास हातभार लागला असावा; मात्र सूफी परंपरेनुसार त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये सर्वांना समान वागणूक दिली जाई. परंपरेने सूफींना राजेरजवाडे आणि लौकिक-भौतिक शक्तींचा संपर्क वर्ज्य होता. चिश्ती संप्रदायाच्या प्रसारात त्यांच्या भक्तीप्रधान गायनाच्या कव्वाली या प्रकारानेही चांगलाच हातभार लावला. आजही अजमेरमध्ये कव्वाली गायनाला तितकेच महत्त्व दिले जाते.

उगम आणि इतिहास : मुहंमद पैगंबरांनंतर इस्लाम प्रचारकांच्या नवव्या पिढीमधले अबू इश्क शामी पश्चिम अफगाणिस्तानातील हेरात या गावापासून सु. ९५ मैल दूर असलेल्या चिश्त गावी दाखल झाले. मूळचे सिरियातील असलेले शामी पुढील दहा वर्षे चिश्त गावात राहिले आणि त्यांनी तिथे आपली शिष्य-परंपरा निर्माण केली. स्थानिक अमिर-पुत्र अबू अहमद अब्दाल यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम अफगाणिस्तानात चिश्ति संप्रदाय बहरला.

भारतीय उपखंडामध्ये चिश्ती संप्रदायाचा प्रसार ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती (सु. ११४२‒१२३६) यांनी केला. त्यांचा जन्म पर्शियातील सेस्तान येथे सय्यीद कुटुंबात झाला. वयाच्या ९ व्या वर्षी कुराण मुखोद्गत करून ते हाफिझ बनले. वडिलांच्या मृत्यूनंतर मिळालेली संपत्ती त्यांनी विकली आणि मिळालेले पैसे गरिबांना वाटून ते कुराणातील ‘हदिथ’ आणि ‘फिक’ यांच्या अभ्यासासाठी बल्ख आणि समरकंदला गेले. इस्लामी पांडित्य आणि कायदेविषयक न्यायव्यवस्थेच्या पलीकडचे ज्ञान मिळविण्याच्या हेतूने त्यांनी चिश्ती संप्रदायाच्या उस्मान हरूनी यांचे शिष्यत्व पत्करले. पुढे आपल्या संप्रदायाच्या प्रसारासाठी प्रथम ते लाहोर येथे आले. नंतर ११९३ साली दिल्ली येथे जाऊन थोड्याच अवधीत अजमेर येथे ते स्थायिक झाले.

मुईनुद्दीन चिश्ती यांच्यानंतर चिश्ती संप्रदायाचे नेतृत्व कुतुबुद्दीन बख्तियार काकी आणि नंतर फरिदुद्दीन मसूद (बाबा फरीद) यांच्याकडे आले. बाबा फरीदांनंतर हा संप्रदाय दोन गटांत विभागला गेला. एका गटाने निजामुद्दीन औलिया, तर दुसर्‍या गटाने अल्लाऊद्दीन सबिर कल्ल्यारी यांचे नेतृत्व पत्करले (अनुक्रमे चिश्ती निझामी आणि चिश्ती साबिरी संप्रदाय). या दोन्ही शाखा पुढे इतर प्रमुख सूफी शाखांमध्ये मिसळल्या. यामुळे आता चिश्ती संप्रदायात सूफी परंपरेतील चारही महत्त्वाच्या संप्रदायांचे (चिश्ती, सुहरवर्दी, कादिरी, नक्षबंदी) एकत्रित शिष्यत्व दिले जाते.

मान्यताप्राप्त तत्त्वे :

  • लौकिक जगाचा त्याग करावा.
  • भौतिक/राजकीय शक्तींपासून दूर राहावे.
  • समा म्हणजे संगीत सभेत भाग घ्यावा.
  • निर्वाह दानावर चालवावा.
  • प्रार्थना आणि कडक व्रतांचे आचरण करावे.
  • संप्रदायातील प्रमुख शेख किंवा पीराच्या आज्ञा पाळाव्या.
  • चमत्कारांच्या मागे लागू नये.
  • मानवांच्या कल्याणासाठी कार्य करावे.
  • इतर भक्तीमार्गांचा आदर राखावा.

(उपरोक्त तत्त्वांपैकी सुरुवातीची चार तत्त्वे कुराण आणि हदीसच्या विरुद्ध असल्याने ती आता इतिहासजमा झाली आहेत).

उपासनापद्धती :

  • सांगितलेल्या विशिष्ट आसनात बसून अल्लाहचे नाव मोठ्याने उच्चारणे.
  • अल्लाहचा नामजप शांतपणे करणे.
  • श्वासांवर नियंत्रण राखणे.
  • गूढ चिंतनात निमग्न राहणे.
  • एकांतात ४० दिवसांसाठी अध्यात्मिक प्रार्थना आणि मनन, चिंतन करणे.

आध्यात्मिक परंपरा :

  • मुहंमद पैगंबर
  • अली इब्न अबि तलिब
  • अल् हसन अल् बस्री
  • अब्दुल वाहिद बिन झैद बिन अबुल फादल
  • फुदाईल इब्न इयाद बिन मासूद बिन बिश्र अल् तामिमी
  • इब्राहिमी बिन आदम
  • हुदाईफा अल् मराशी
  • अमिनुद्दीन अबू हुदाइरा अल् बस्री
  • मुमशाद दिनवरी
  • अबू इशक शामी (संप्रदाय प्रवर्तक, मृत्यू ९४०)
  • अबू अहमद चिश्ती
  • अबू मुहंमद चिश्ती
  • अबू युसुफ नझरुद्दीन चिश्ती (मृत्यू १०६७)
  • कुतुबुद्दीन मौदूद चिश्ती (मृत्यू ११३९)
  • हाजी शरीफ झिंदानी (मृत्यू १२१५)
  • उस्मान हरूनी (मृत्यू १२२०)
  • मुईनुद्दीन चिश्ती (सु. ११४२‒१२३६)
  • कुतुबुद्दीन बख्तियार काकी (इ.स. ११७३ ते इ.स. १२२८)
  • फरिदुद्दीन मसूद (बाबा फरीद इ.स. ११७३ किंवा ७५ ते इ.स. १२६६)

साहित्य : सूफींमध्ये बहुतांशी मौखिक परंपरेचा अंगिकार केलेला दिसून येतो. कारण सूफी गुरू (मुर्शिद; पीर) त्याच्या शिष्यांना (मुरिदांना) उपासनापद्धती आणि तत्त्वे यांचे ज्ञान मौखिक पद्धतीनेच देत. यामागे गूढ परंपराही कारणीभूत असावी. त्यामुळेच चिश्ती परंपरेमध्ये तत्त्वज्ञानविषयक कोणतीही ग्रंथनिर्मिती झालेली आढळत नाही. असे असले तरी सूफी तत्त्वज्ञानाचे पुढील दोन ग्रंथ अभ्यासले जातात : शेख शिहाब अल् दीन सुहरवर्दी यांचा अवारिफ अल् मारीफ आणि हुज्वीरी यांचा कश्फूल महजुब. याशिवाय चिश्ती संप्रदायाच्या शिष्यांनी संग्रहीत केलेला शेख-मुर्शदांच्या कविता, भाषणे, वचने, जीवन यांचा दस्तऐवज मालफुजात याचाही अभ्यास केला जातो.

सद्यस्थिती आणि प्रभाव : अजमेर हे सूफी चिश्ती संप्रदायाचे भारतातील महत्त्वाचे केंद्र मानले जाते. येथे मुईनुद्दीन चिश्ती यांची कबर असून रजब महिन्याच्या एक तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत दर वर्षी त्या निमित्त मोठा उरूस भरतो. येथील चिश्ती निजामी संप्रदायाचा प्रसार ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका देशांमध्ये झालेला आहे.

काही प्राचीन आणि अर्वाचीन सूफी नसलेल्या इस्लामी संप्रदायांवरही चिश्ती संप्रदायाचा प्रभाव पडलेला आहे. चिश्ती संप्रदायातील अनेक सूफींचा संप्रदायबाह्य फकीर आणि दरवेशी यांच्याशीही संबंध आलेला आहे. जमात ए अहले सुन्नतसारख्या मुळात सूफी नसलेल्या गटांनीही चिश्तींच्या अनेक रूढी, परंपरा आणि उपासना यांचा आपल्यात अंतर्भाव केलेला दिसून येतो.

संदर्भ :

  • Earnst, Carl W.; Lawrence, Bruce B. Sufi Martyrs of Love : The Chishti Order in South Asia and Beyond, New York, 2002.
  • Kandhlawi, Shaykh Muhammad Zakariya, The Mashaikh of Chisht, South Africa, 2007.
  • Rozehnal, Robert, Islamic Sufism Unbound : Politics and Piety in Twenty-First Century Pakistan, New York, 2007.
  • https://www.chishtiya.org/chishti-order/

                                                                                                                                                                  समीक्षक : गुलाम समदानी