वृक्षासन

योगासनाचा एक प्रकार. वृक्ष म्हणजे झाड. झाडाला एकच बुंधा असतो. ज्याप्रमाणे वृक्ष एकाच खोडावर उभा असतो तसे या आसनात एका पायावर उभे रहावयाचे असते व एकूणच शरीराचा आकार वृक्षासारखा भासतो म्हणून या आसनाला वृक्षासन हे नाव प्राप्त झाले. हे आसन करावयास सोपे आहे. ते मज्जासंस्थेवर तत्काळ परिणाम करते त्यामुळे मनाला स्थिरता येते. शास्त्रीय नृत्य करणाऱ्यांसाठी हे आसन फारच उपयोगी आहे.

कृती : घेरंडसंहितेप्रमाणे या आसनाची कृती पुढील प्रमाणे आहे. “उजवा पाय डाव्या मांडीवर वरच्या बाजूला ठेवावा आणि जमिनीवर वृक्षाप्रमाणे उभे रहावे याला वृक्षासन असे म्हणतात.” जमिनीवर ताठ उभे राहावे. उजवा पाय वर उचलून गुडघ्यात वाकवून उजवे पाऊल डाव्या मांडीच्या आतल्या बाजूस, जास्तीत जास्त वर असे ठेवावे. दोन्ही हात छातीसमोर नमस्काराच्या स्थितीत ठेवावे. डाव्या पायावर तोल सांभाळावा. दृष्टी सरळ समोर असावी. श्वसन शांतपणे चालू ठेवावे. ३० सेंकद, १ मिनिट किंवा त्याहीपेक्षा अधिक वेळ हे आसन करता येते. आता हीच कृती उजव्या पायावर तोल सांभाळून करावी. काही साधक हात नमस्काराच्या स्थितीत न जुळविता वर नेऊन एकमेकांना नमस्काराप्रमाणे जोडतात व तोल सांभाळतात. काही जण पाऊल मांडीला न लावता पद्मासनाप्रमाणे मांडीवर समोरच्या बाजूने ठेवतात. अर्थातच या आसनात तोल सांभाळणे महत्त्वाचे आहे.

लाभ : या आसनात शरीराचा तोल सांभाळावा लागतो. त्यामुळे सर्व जाणीवा सजग ठेवाव्या लागतात. अन्य विचार दूर सारले जातात. म्हणून या आसनामुळे मानसिक शांतता व संतुलन उत्तम तऱ्हेने राखले जाते. मनाची चंचलता कमी होते. एकाग्रता वाढते. मानसिक स्थैर्य, संतुलन व एकाग्रता या तिन्ही गोष्टी देणारे हे आसन स्मरणशक्ती उत्तम ठेवण्यासाठीही उपयुक्त आहे. शरीराची तोल सांभाळणारी यंत्रणा, पावले, डोळे व कान यावर अवलंबून आहे. या आसनामुळे ही यंत्रणा चांगल्याप्रकारे कार्यक्षम होते. त्यामुळे रक्तदाब व इतर कार्ये संतुलित होतात.

विधिनिषेध : सुरुवातीला हे आसन ५—१० सेंकदही जमणे कठीण असले, तरी नंतर सरावाने हळूहळू जमू शकते. प्रारंभी भिंतीचा किंवा खुर्चीचा आधार घेऊन हे आसन करता येते. तीव्र मानसिक अस्वस्थता, तोल जाणे, लठ्ठपणा वा अशक्तपणा असेल तर हे आसन करू नये.

समीक्षक : साबीर शेख