जडेजा, जनरल राजेंद्रसिंहजी : (१५ जून १८९९‒१ जानेवारी १९६४). भारताचे दुसरे भूसेनाप्रमुख (१९५३–५५). सौराष्ट्रातील सरोदर येथे एका राजघराण्यात जन्म. राजकुमार कॉलेज (राजकोट); मॅलव्हर्न कॉलेज (इंग्लंड); रॉयल मिलीटरी कॉलेज (सॅन्डहर्स्ट) येथे औपचारिक व सैनिकी शिक्षण. १९२१ मध्ये किंग्ज कमिशन मिळाल्यानंतर त्यांनी ‘६० रायफल्स्’ ह्या ब्रिटिश रेजिमेंटमध्ये काम केले. पुढे ते रॉयल लान्सर्स या हिंदी पलटणीत (१९२२–३९) होते. ‘ब्रेव्हेट मेजर’ हा हुद्दा मिळविणारे ते पहिले भारतीय होते.
पहिल्या महायुद्धात रॉयल लान्सर्सचे ते एक स्क्वाड्रन कमांडर होते. उत्तर आफ्रिकेच्या लढाईतील कामगिरीबद्दल त्यांना डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस ऑर्डर (डी.एस्.ओ.) हे शौर्य पदक बहाल करण्यात आले. १९४२ मध्ये जनसंपर्क खात्यात उपसंचालक व १९४३ मध्ये रॉयल लान्सर्सचे ते कमांडर होते. अमेरिकेत वॉशिंग्टन डि. सी. येथे काही काळ ते मिलीटरी ॲटॅची म्हणून होते (१९४५). तेथे त्यांना ‘लीजन ऑफ ऑनर’ हा पुरस्कार राष्ट्राध्यक्ष ट्रूमन यांचा हस्ते मिळाला. तेथून भारतात परतल्यानंतर ते ब्रिगेडियर बनले (१९४६) आणि त्यांची एका उपविभागावर निवड झाली.
दिल्ली येथे १९४६ मध्ये त्यांची आर्मर्ड कोअरचे संचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली. १९४७ मध्ये ते मेजर जनरल झाले. त्यानंतर दिल्ली व पूर्व पंजाब भागावर ‘जनरल ऑफिसर कंमाडिंग’ (जी.ओ.सी.) म्हणून त्यांची नेमणूक झाली. पुढे लेफ्टनंट जनरल व त्यानंतर पूर्व कमांड व दक्षिण कमांडचे ते कमांडिंग इन चीफ ऑफिसर (जी.ओ.सी.इनसी) होते. सप्टेंबर १९४८ मध्ये तत्कालीन हैदराबाद संस्थानातील पोलिसी कारवाई त्यांनीच पार पाडली. राजेंद्रसिंहजींना क्रिकेट, टेनिस व फुटबॉल या खेळांची विशेष आवड होती.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.