चिनी भाषा : चिनीभाषा ही सिनो-तिबेटी भाषासमूहाची एक शाखा आहे. या समूहाची दुसरी शाखा तिबेटो-ब्रह्मी ही आहे. चिनी ही बहुतांश चीनची भाषा असून तिच्यात अनेक पोटभेद आहेत. त्यांतील सर्वांत महत्त्वाचा भेद उत्तरेकडील अर्ध्या भागात असून त्याला ‘मँडरीन चिनी’ हे नाव आहे. त्यातही अनेक बोली आहेत. यांगत्से नदीच्या मुखाभोवती ‘वू’ बोली बोलल्या जातात आणि त्यांपैकी ‘सुचाउ’ ही विशेष प्रसिद्ध आहे. दक्षिणेकडे किनाऱ्याच्या बाजूला बोलींची फार विविधता आढळते. या सर्व बोलींना ‘कूक्येन’ हे समूहवाचक नाव असून प्रत्येक बोली तिच्या प्रदेशातील महत्त्वाच्या शहराच्या नावाने ओळखली जाते. मध्यवर्ती प्रदेशात ‘हाक्का’ ही बोली असून तिच्या दक्षिणेकडील बोली ‘कँटनीज’ या नावाने ओळखल्या जातात. चिनी भाषा ही चित्रलिपी आणि उच्चारांवर आधारित भाषा आहे. ती जगातील सगळ्यात जुनी लिखित स्वरूपात असलेली भाषा असे पुष्कळ काळ सर्वमान्य असलेले मत आहे. पुरातत्त्वीय कालमापनाच्या नव्या निकषांनुसार सिंधुलिपीचा काळ इसपूर्व पाचव्या शतकापर्यंत मागे जातो. ते गृहित धरल्यास चिनी ही सर्वात प्राचीन लिपी आहे असे म्हणता येणार नाही. चिनी भाषेला औपचारिकपणे मँडरिन असे संबोधले जाते. मँडरिनला हानयु असेही म्हणतात. इसवीसन पूर्व २०६ मध्ये हान नावाचा वंश चीन मध्ये होता. यु म्हणजे भाषा. हान वंशात बोलली जाणारी भाषा म्हणजे हान यु. या भाषेला ६ हजार वर्षांचा इतिहास आहे. खरे तर ही बोली भाषा आहे, पण भाषा अभ्यासकांनी चिनी भाषेला स्वतंत्र भाषेचा दर्जा दिला आहे. कालखंडानुसार चिनी भाषेच्या विकासाचे  ३ भाग पडतात १) प्राचीन चिनी भाषा २) मध्ययुगीन चिनी भाषा ३) आधुनिक चिनी भाषा

१) प्राचीन चिनी भाषा : प्राचीन चिनी भाषेला अप्रचलित किंवा आदिम चिनी भाषा म्ह्णून संबोधले जाते. चिनी भाषेचा लिखित पुरावा इसवी सन पूर्व १२५० मध्ये शांग (shang) राजवंशाच्या काळात आढळून आला . प्राण्यांच्या हाडांवर चित्रलिपीच्या स्वरूपात ती आढळून आली. इसवीसन पूर्व १०४६ ते ७७१ या चुओ राजवंशाच्या काळात धातूवर लिहिलेली चित्रलिपी आढळून आली आहे. प्राचीन चिनी भाषेत फारसे बदल झाले नाहीत. तेव्हा भाषा उच्चरणाची वेगळी पद्धत पण अस्तित्वात होती. आताच्या भाषेत शब्द उच्चारणासाठी  विशिष्ट पद्धत विकसित करण्यात आली आहे.

२) मध्ययुगीन चिनी भाषा:  १० व्या शतकापासून चिनी भाषेत बदल होण्यास सुरूवात झाली याचे काही पुरावे उपलब्ध आहेत. या काळात बोली भाषांमध्ये बदल होत गेल्याच्या नोंदी आहेत. चिनी भाषा शास्त्रज्ञानी शब्द उच्चारणासाठी शब्दकोश तयार केला होता. परकीय भाषांमधील उच्चारांचे चिनी भाषेत रूपांतर करण्यात आले होते. या दरम्यान भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे भाषेवर व भाषेच्या उच्चारणावर पण परिणाम झाले. यातूनच वेगवेगळ्या प्रांतात शब्द उच्चारणात फरक पडत गेला. या प्रक्रियेतूनच चीनमध्ये आज विविध प्रांतात बोलल्या जाणाऱ्या बोली भाषांचा जन्म झाला. प्रमाण चिनी भाषा किंवा आधुनिक चिनी भाषा पण याच प्रक्रियेतून उदयाला आली.

३) आधुनिक काळातील चिनी भाषा:  प्राचीन काळापासून ते आतापर्यंत बोली भाषा विकसित होण्याची प्रक्रिया ही गुंतागुंतीची आहे. उत्तर चीन आणि ईशान्य चीनमध्ये विविध बोली भाषा बोलल्या जात होत्या. उत्तर चीन हा मैदानी प्रदेश असल्याने बोली भाषांमध्ये फारसा फरक नाही पण तेच दक्षिण चीनमध्ये डोंगराळ प्रदेश आणि नद्या अधिक असल्याने बोली भाषांमध्ये प्रादेशिकता जाणवते. उत्तर चीनमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेला पेचिंग (बीजिंग) मँडरिन असे म्हणतात. २० व्या शतकापर्यंत दक्षिण चीनमध्ये बोलली जाणारी म्हणजेच नानचिंग मँडरिन या भाषेचे वर्चस्व अधिक होते. १७ व्या शतकात छिंग (Qing) राजवंशाची सत्ता असताना भाषेच्या अचूक उच्चारणासाठी प्रयत्न सुरु झाले. संपूर्ण देशाची एकच प्रमाण भाषा पेचिंग (बीजिंग) मँडरिन असावी यासाठी तसेच पारंपरिक चित्रलिपी आणि सुलभ चित्रलिपीच्या कामालाही याच काळात सुरूवात झाली. पण या प्रयत्नांना फार यश आले नाही. १९ व्या शतकाच्या अखेरीला नानचिंग मँडरिन ही भाषा प्रमाण भाषा असेल असा आदेश शाही न्यायालयाने दिला होता. तरीही सामान्य नागरिक मात्र बोली भाषेचाच उपयोग करत होते. चीनमध्ये सर्वसाधारणपणे २९७ बोली भाषा आहेत. या सगळ्या भाषा भगिनींना चिनी भाषा म्हणूनच ओळखले जाते.

चिनी भाषा ही स्वरयुक्त (tonal) भाषा आहे. त्यामध्ये चार उच्चारपद्धती असतात. एकाच शब्दाचा उच्चारध्वनींच्या उच्चनीच उच्चारामुळे वेगवेगळा होतो आणि त्यानुसार त्याचा अर्थही बदलतो. सामान्यतः एकावयवी शब्द केवळ ध्वनीउच्चारणामुळे वेगळे होतात. तर अनेकावयवी शब्दातील प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र ध्वनीउच्चारण असते. जुन्या चिनी भाषेत ध्वनीउच्चारणामुळे एखादा शब्द धातू आहे का नाम हे लक्षात येत असे. आधुनिक चिनी भाषेत हा भाग सुलभ करण्यात आला आहे.

१९५० मध्ये स्थापन झालेल्या कम्युनिस्ट सरकारने चिनी भाषा सुलभ करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्याआधी ल्युफेई खुई याने १९०९ मध्ये चिनी भाषेच्या सुलभीकरणाचा प्रस्ताव मांडला होता. १९१९ मध्ये चीनमध्ये राजेशाही विरोधात चळवळ सुरु झाली आणि त्यामध्ये अनेक बुद्धिजीवी अभ्यासकांनी चिनी भाषा सुलभ करण्याची मागणी लावून धरली होती. १९३० ते १९४० या  दशकात चीनमध्ये कोमीन्गटांग पक्षाची सत्ता असताना भाषेत बदल करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये अवघड चिनी भाषा जर सोपी झाली तर चीनमध्ये साक्षरता पण वाढेल असाही विचार पुढे आला. १९६४ मध्ये अधिकृतपणे सुलभ लिपी चीनमध्ये वापरण्यास सुरवात झाली. पण हॉंगकॉंग मकाऊ आणि तैवानमध्ये मात्र नवीन सुलभ लिपी वापरण्याचे नियम लागू झाले नाहीत; त्यामुळे या भागात अजूनही पारंपरिक लिपीचा वापर केला जातो.

चिनी भाषा परदेशी विद्यार्थ्यांना शिकता यावी यासाठी चिनी भाषेचे रोमन लिपीत रूपांतर करण्यात आले. या रूपांतराला फिनयिन असे म्हणतात. च्यूओ युकूआंग हे या प्रकल्पाचे प्रमुख असल्यामुळे त्यांना फिनयिनचे जनक मानले जाते. रोमन लिपित रूपांतरित करण्यात आलेली फिनयिन १९५६ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. पेचिंग (बीजिंग)मँडरिन प्रमाण भाषा म्हणून स्वीकारण्यात आली. प्रमाण भाषेला  फुथोंगहुआ (putonghua) असे म्हटले जाते.

चित्रलिपी : चिनी भाषेचे  वेगळेपण म्हणजे चित्रलिपी आणि उच्चार. चित्रलिपी ही त्या शब्दांच्या किंवा अक्षरांच्या उच्चारावर आधारित नसून वस्तूंसाठीची चित्रेच लेखनासाठी वापरली जातात. अशा चित्रांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे चीनमध्ये बराच काळ साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प होते. जपानी, कोरियन, व्हिएतनामी या भाषांमध्ये पण अशाच चित्रलिपीचा वापर केला जातो. जपानी आणि व्हिएतनामी चित्रलिपीमध्ये चिनी भाषेच्या चित्रलिपीचा उपयोग केला जात आहे. चिनी चित्रलिपी ही जगातील जुनी आणि अजूनही वापरात असलेली लिपी आहे.

हांच चित्रलिपीचा नमुना

जगातील एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोकसंख्या चिनी चित्रलिपीचा वापर करते. चिनी सुलेखन कला ही चिनी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या चिनी अक्षरांना किंवा चित्रलिपीला हांच (Hanzi   汉字) असे म्हणतात. १८व्या आणि १९ व्या शतकात तयार करण्यात आलेल्या चिनी भाषेच्या राष्ट्रीय शब्दकोशामध्ये सुमारे ५० हजार हांच किंवा अक्षरे आहेत. पण यातील बरीचशी अक्षरे अजूनही रहस्यमय आहेत. या रहस्यमय अक्षरांचे अर्थ चिनी भाषेच्या विद्वानांनाही अजून उलगडलेले नाहीत. चिनी भाषेच्या अभ्यासानुसार चिनी वृत्तपत्र आणि नियतकालिकांत वापरली जाणारी ९० टक्के चित्राक्षरे ही फक्त साडेतीन हजार आहेत. चिनी भाषा तज्ज्ञ  ८ ते १० हजार चित्राक्षरे जाणतात.

चिनी चित्राक्षरांचा विकास व्हायला हजारो वर्ष लागली. त्सांगचिये Cangjie ) या इतिहास लेखकाने चिनी चित्रलिपीचा शोध लावला अशी नोंद आहे. त्सांगचिये येलो राजाच्या दरबारात म्हणजे इ.स. पूर्व २६५० मध्ये राजदरबारी इतिहास लेखक होता. इ.स.पूर्व २२० मध्ये  त्सांगचिये शब्दकोश होता.अलीकडच्या काळात संगणकावर चिनी अक्षरे टंकलिखित करण्याची प्रणाली विकसित करण्यात आली. त्या प्रणालीला त्सांगचिये प्रणाली किंवा Cangjie method असे म्हणतात.  त्सांगचियेनी चित्रलिपीचा शोध कसा लावला याबाबत काही दंतकथा चीनमध्ये प्रचलित आहेत.

चिनी चित्रलिपी वेगवेगळ्या टप्प्यात विकसित झाली. अलीकडच्या काळात पाषाण युगातील काही चित्रे सापडली आहेत. ही चित्रे आणि शांग राजवंशाच्या काळातील चित्रे यामध्ये काही संबंध आहे किंवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. या चित्रांचा उपयोग पाषाण युगात पीत नदीच्या खोऱ्यात पाषाण युगापासून ते शांग राजवंशाच्या काळापर्यंत केला जात असल्याचे म्हंटले आहे.

हाडावरील प्राचीन चिनी चित्रलिपी

प्राण्यांच्या हाडांवरील अक्षरे: चिनी चित्रलिपी किंवा अक्षरांचा प्राचीन आणि खात्रीशीर पुरावा म्हणजे शांग राजवटीत इ.स. पूर्व १२०० ते १०५० या काळातील प्राण्यांच्या हाडांवरील चित्रे. चिनी अक्षरांचा हा सगळ्यात पहिला पुरावा हनान प्रांतात सापडला. १८९९मध्ये औषधासाठी ड्रॅगनची हाडे म्हणून त्याची विक्री करण्यात आली त्यावेळी हा पुरावा प्रथम समोर आला. त्यावेळी या हाडाच्या तुकड्यावर कोरलेली चित्रे म्हणजे चिनी लिपी असल्याचा शोध लागला. १९२८ ते १९३७ या काळात यावर संशोधन झाले. शांग राजे प्राण्यांच्या हाडांवर संदेश लिहून पाठवीत असत. प्राण्यांच्या हाडांवरील लेखन पद्धती प्राचीन काळातील विकसित लेखन पद्धती होती. यावरून चिनी लेखन पद्धतीला इ.स पूर्व दुसऱ्या सहस्त्रकात सुरवात झाली असावी असा अंदाज बांधण्यात आला.

कांस्य लेखन पद्धती: शांग राजवंशानंतर सत्तेत आलेल्या चौ (zhou) राजवंशापर्यंत लेखन पद्धतीमध्ये फारसा बदल झाला नाही. प्राण्यांच्या हाडांवरून ब्रॉन्झ किंवा कांस्य धातूवर लेखनाची पद्धत आली. चौ राजवटीपासून ते छिन (Qin) राजवटीपर्यंत लेखनासाठी शिक्क्यांचा वापर सुरु झाला. पण याच काळात पूर्व चीन आणि दक्षिण चीनमध्ये लेखनाच्या शैलीमध्ये बदल होत गेला. छिन राजवंशानंतर सत्तेत आलेल्या हान (Han) राजवंशाच्या कालखंडात म्हणजे इसवी सन दुसऱ्या शतकात चित्रलिपीचा शब्दकोश तयार करण्यात आला होता. शौवन चीत्च (ShuowenJiezi) असे या शब्दकोशाचे नाव आहे. या शब्दकोशात लेखन पद्धतीमध्ये सजावट केल्याचे आढळून आले आहे. यामध्ये पक्षी आणि कीटकांच्या चित्रांचा उपयोग करण्यात आला होता शिवाय त्या चित्रांचे विश्लेषण पण करण्यात आले होते.

मुद्रा लिपी: छिन राजांनी मुद्रा लिपी ही अधिकृत लेखन पद्धती म्हणून स्वीकारली. अजूनही या मुद्रांचा वापर केला जातो. विविध चित्रांच्या किंवा चिन्हांच्या मुद्रा तयार करून लेखनासाठी त्याचा उपयोग केला जात असे. यानंतर लिपिक लेखन पद्धती आणि त्यांनतर प्रवाही किंवा cursive लेखन पद्धतीचा समावेश झाला.

चिनी भाषेत चित्रांपासून शब्द तयार होतात. एकाक्षरीं, द्विमात्रिक किंवा दोन अक्षरांचा शब्द किंवा त्यापेक्षा अधिक अक्षरे असे प्रकार आहेत. एकाक्षरी शब्द म्हणजे एकच चित्र. शब्दाच्या अर्थानुसार त्यामध्ये चित्रांचा समावेश केला जातो. प्रत्येक अक्षर हे काही मात्रांपासून (brush strokes) तयार झाले आहे. चित्राचा अर्थ जाणून घेण्यासाठी त्यावरील मात्रांचा उपयोग केला जातो. सध्या चिनी चित्रलिपी लेखनासाठी पारंपरिक आणि सुलभ असे दोन प्रकार आहेत. पारंपरिक लिपीमध्ये अधिक मात्रा आहेत तर सुलभ लिपीमध्ये मात्रा कमी करण्यात आल्या आहेत. सुलभ लिपीमध्ये फक्त प्रमुख मात्रा ठेवण्यात आली आहे.

चिनी भाषा ही उच्चार आणि चित्रलिपीचा मिलाप आहे.  त्यामुळे भाषा उच्चारणालाही महत्त्व आहे. पारंपरिक चिनी स्वर विज्ञानानुसार चिनी अक्षरांमध्ये एक आद्याक्षर आणि दुसरे अंत्याक्षर यांचा समावेश होतो. त्यानुसार त्या शब्दाचा उच्चार केला जातो आणि उच्चारावरून शब्दाचा अर्थ लावला जातो. शब्दाचे आद्याक्षर हे व्यंजन असते तर अंत्याक्षर हा स्वर असतो. यानुसार भाषेत २१ आद्याक्षरे आणि ३८ अंत्याक्षरे आहेत. या अक्षरांच्या संयुक्त रुपांवरून चिनी भाषेचे शब्द तयार होतात.संगणकावर चिनी अक्षरे टाईप करता यावीत म्हणन १९९१ मध्ये हान युनिकोड असा फॉन्ट पण तयार करण्यात आला. या फॉन्टमुळे भाषेचा वापर अधिक सोपा झाला.

इतर भाषांवर प्रभाव : बौद्ध धर्माचा प्रसार चीनमधून इतर आशियाई देशांत झाला. बौद्ध धर्माबरोबरच चिनी लिपीचा पण त्या त्या देशांच्या भाषांमध्ये समावेश झाला. इसवी सन पूर्व २ रे  शतक ते इसवी सन ५ वे शतक या कालखंडात बौद्ध धर्म चीनमार्गे कोरियामध्ये गेला. १५ व्या शतकापर्यंत कोरियामध्ये चिनी भाषेचे वर्चस्व होते. १५ व्या शतकात कोरियन लिपीची निर्मिती होण्याआधी कोरियन भाषेच्या उच्चारात स्पष्टता नसल्याने चिनी भाषेच्या उच्चारांचा उपयोग केला जात असे. अजूनही काही अंशी चिनी उच्चार वापरले जातात. काही शब्दांच्या स्पष्टीकरणासाठी चिनी लिपीचा उपयोग केला जातो.जपानी लिपीमध्ये काही चिनी चित्राक्षरांचा समावेश आहे. जपानी भाषेच्या लिपीसाठी चीनी लिपीचा आधार घेतला गेला. जपानमध्ये तीन लिपी आहेत. त्यामधील चीनी चित्रलिपी ही प्रधान आहे. जपानी शब्दांचे उच्चारही दोन प्रकार असतात. त्यापैकी एका प्रकारचा उच्चार मुलतः चिनी चित्रलिपीच्या उच्चारावर आधारित आहे. दोन्ही भाषांमधील त्या अक्षरांचे अर्थही सामान आहेत मात्र उच्चार वेगळे आहेत.

व्हिएतनाममध्ये इसवी सन १११ मध्ये चिनच्या मिंग राजांची सत्ता होती. या कालखंडात चिनी भाषेच्या वापराला सुरवात झाली. प्राचीन चिनी भाषेचा उपयोग व्हिएतनाम मध्ये केला जात असे. १३ व्या शतकात व्हिएतनामी लिपी अस्तित्वात आली त्यानंतर चिनी भाषेचा उपयोग कमी झाला. त्याआधी लेखनासाठी चिनी लिपीचाउपयोग केला जात असे. व्हिएतनामी भाषेची निर्मिती झाल्यानंतरही ६० टक्के शब्द हे चिनी भाषेतील होते. या शब्दांसाठी पर्यायी व्हिएतनामी शब्दांची निर्मिती नंतर करण्यात आली.

संदर्भ :

• ancientscripts.com

• archchinese.com

• britannica.com

• chinasage.info

• Elementary Chinese Reader

• lindamandarin.com.

• Wikipedia.com.