श्री सोमनाथ संस्कृत विश्वविद्यालय : वेरावल,गीर-सोमनाथ येथील गुजरात राज्यातील एकमात्र संस्कृत विद्यापीठ. इ.स. २००५ मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. ‘पूर्णता गौरवाय’ हे विश्वविद्यालयाचे ब्रीदवाक्य आहे. संस्कृतभाषा प्रचार, मूल्यशिक्षणाद्वारे सक्षम नागरिक निर्माण, वैदिक परंपरांचे जतन व संवर्धन, प्राचीन शास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक संधी निर्माणाचा प्रयत्न ही विद्यापीठाची काही ठळक उद्दिष्टे आहेत.

वेद-वेदांग, साहित्य, व्याकरण, विज्ञान व अभिनव विद्या, पुराण, दर्शन, शिक्षाशास्त्री (B.Ed.) असे सप्त विभाग विश्वविद्यालयात कार्यरत आहेत. शास्री (B.A), आचार्य (M.A), तत्त्चाचार्य (M.Phil.), विद्यावारिधि (Ph.D.) ह्या अभ्यासक्रमांव्यतिरिक्त वास्तुशास्त्र, योग, मंदिरप्रबंध, कर्मकांड, ज्योतिष, वैदिक गणित, संगीत आदी ज्ञानशाखांमध्येही अध्ययनाची संधी उपलब्ध करुन देणारे गुजरात हे राज्यातील एकमेव विश्वविद्यालय आहे. विभागप्रमुख व तीन सहायकाचार्य अशी विभागीय संरचना आहे. विश्वविद्यालय अनुदान आयोग (यु.जी.सी)  मान्यताप्राप्त श्री सोमनाथ विश्वविद्यालयांतर्गत ३५ महाविद्यालये व शैक्षणिक संस्था, २५ पदविका केंद्रे आणि ३८ P.G.D.C.A centres कार्यरत आहेत. अक्षरधाम सामाजिक समरसता संशोधन केंद्र, गांधीनगर व तत्त्वज्ञान मंदिर संशोधन संस्था, मोडासा या संस्थांना विद्यापीठीय मान्यता आहे.

अनिवार्य संस्कृत विषयाबरोबरच इंग्रजी, हिंदी, गुजराती, राजनीतिशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल हे ऐच्छिक विषय तसेच भाषा व आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणारा P.G.D.C.A अभ्यासक्रम ही येथे उपलब्ध आहे. उच्च माध्यमिक शालांत परीक्षेला संस्कृत विषय न घेतलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा श्री सोमनाथ विद्यापीठातून संस्कृत विषयात पदवी संपादन करता येते. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन पूर्वतयारी अभ्यासक्रमाच्या (bridge course) माध्यमातून केले जाते. इ.स. २०१५ पासून Graduate and Post graduate diploma in Hindu studies हा नवीन पाठ्यक्रम सुरु करण्यात आला आहे.

१३,००० पुस्तके, २००० संदर्भग्रंथ, विविध संशोधन नियतकालिके यांनी सुसज्ज असे शारदाभवनम् हे विद्यापीठाचे ग्रंथालय आहे. सोमज्योतिः हे विश्वविद्यालयाचे षण्मासिक नियतकालिक आहे. विद्यापीठाच्या प्रकाशन विभागातर्फे अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात वेद, व्याकरण, अलंकार शास्त्रांवर आधारित मूल संस्कृत तथा अनुवादित पुस्तकांचाही समावेश आहे. संस्कृत भाषाभिवृद्धिसाठी संभाषण शिबिर, विद्यापीठाशी संलग्न सर्व संस्थांचा सहभाग असणारा भव्य युवामहोत्सव, संस्कृत सप्ताहोत्सवांतर्गत व्याख्यानमाला, वक्तृत्व, श्लोकपठण आदी स्पर्धांचे आयोजन, नवरात्र महोत्सवात संस्कृत गरबानृत्य, स्वच्छता-सामाजिक समरसता सप्ताहांतर्गत शोभायात्रा, पथनाट्याचे आयोजन, विज्ञान प्रदर्शनी, योगप्रदर्शनी अशा संकल्पनाधिष्ठित प्रदर्शनींचे आयोजन, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवाद असे उपक्रम प्रतिवर्षी विश्वविद्यालयातर्फे राबवले जातात.

संभाषण शिबिरांतर्गत इ.स.२०१० मध्ये श्री सोमनाथ विश्वविद्यालयातर्फे संस्कृत महाकुंभ हा विशेष उ्लेखनीय राज्यव्यापी उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत गुजरात राज्यातील एक लाख नागरिकांना संस्कृत संभाषणाचे प्रशिक्षण देण्यात आले. इ.स. २०१४ मध्ये वेदमंत्रोच्चारण, विभिन्न गान-स्वर पद्धतींचा परिचय करुन देणारा मन्त्रजागरणम् हा विशेष कार्यक्रम तसेच वैदिक गणित कार्यशालेचे आयोजन करण्यात आले. संस्कृत वक्तृत्वास प्रोत्साहन देणारा वाग्वर्धिनी परिषद हा अभिनव उपक्रम विश्वविद्यालयाने याच वर्षी सुरु केला. यात आपापल्या शास्त्राभ्यासानुसार प्रतिसप्ताह विद्यार्थी भाषण प्रस्तुत करतात. परिषदेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा वाग्भूषण पुरस्काराने सन्मान केला जातो. शास्त्रसेवा, छात्रलाभ, स्व-उत्कर्ष या उद्दिष्टपूर्तीसाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्राध्यापकांच्या सर्वोपयोगी विषयांवरील व्याख्यानांचा अंतर्भाव असणारा वाक्यार्थ परिषद हा प्रतिमास आयोजित होणारा विद्यापीठाचा आणखी एक अभिनव उपक्रम होय. इ.स. २०१४ पासून सुरु असलेल्या या उपक्रमांतर्गत दर महिन्याला एका सत्राचे आयोजन करण्यात येते, ज्यात तीन वक्ते (एक आचार्य व दोन सहायकाचार्य) सहभागी होतात. आचार्य सत्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतात. वर्षाच्या अखेरीस सर्व शोधनिबंध एकत्रित करुन पुस्तकरुपाने वाक्यार्थज्योति या शीर्षकाने प्रकाशित केले जातात. वाक्यार्थज्योतिचे दोन खंड उपलब्ध आहेत. गुजरात शासन आयोजित या द्विवार्षिक उपक्रमात सहभागाच्या पहिल्या दोन्ही वर्षात (२०१५, २०१७) विश्वविद्यालयास  प्रथम क्रमांक मिळाला. षोडश संस्कार, वेदांतील नीतिमूल्यबोध, वैज्ञानिकता, ज्योतिषशास्त्र अशा विविध विषयांवर आधारित श्री सोमनाथ विद्यापीठाची प्रदर्शनी विशेष कौतुकपात्र ठरली होती.

समीक्षक : सुनीला गोंधळेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.