चाणक्य :  (इ. स. पू. सु. चौथे शतक). प्राचीन भारताच्या राजकीय विचारपरंपरेत चाणक्याचे म्हणजे कौटिल्याचे विशिष्ट व महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्याने अर्थशास्त्रसंज्ञक  हा राज्यशास्त्रावर ग्रंथ लिहिला. मात्र त्या ग्रंथात कोठेही चाणक्य म्हणून नामनिर्देश येत नाही, तर कौटिल्य असाच वारंवार नामनिर्देश येतो. त्याचा काल अजमावण्याचे निश्चित साधन उपलब्ध नाही. काही त्याला मनूच्या अगोदरचा समजतात, तर काही त्याला महाभारतकालानंतरचा समजतात.

चंद्रगुप्त मौर्याचा पंतप्रधान या नात्याने चाणक्याचा उल्लेख अनेकदा येतो. तो काळ इ. स. पू. ३२१ च्या सुमाराचा आहे. अशोकाच्या शिलालेखात अर्थशास्त्राप्रमाणे क्वचित सूचना आणि अधिकाऱ्यांची नामे सापडतात. महामहोपाध्याय पां. वा. काणे यांच्या मते कौटिल्याचा काल इ. स. पू. ३०० च्या अगोदर मानता येत नाही.

 

चाणक्याने मगध देशाचा राजा धननंद याला सिंहासनावरून पदच्युत करून चंद्रगुप्त मौर्याची  स्थापना शस्त्राच्या आणि शास्त्राच्या आधारावर केली. चाणक्य हा विष्णुगुप्त, कौटिल्य इ. नावांनीही ओळखला जातो. कौटिल्यास भारतीय मॅकिआव्हेली म्हणण्याचा प्रघात आहे.

चाणक्याच्या नावावर चाणक्यसूत्रे, चाणक्यनीति, वृद्धचाणक्य, लघुचाणक्य   इ. अनेक नीतिग्रंथ प्रसिद्ध आहेत.

 

 

 

संदर्भ :

  • Saletore, B. A. Ancient Indian Politica Thought and Institutions, Bombay, 1963.
  • विशाखदत्त, मुद्राराक्षस, निर्णयसागर प्रेस, मुंबई, १९१८.

 


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.