इब्न सौद (? १८८० ? – ९ नोव्हेंबर १९५३). सौदी अरेबियाचा संस्थापक व पहिला राजा. पूर्ण नाव अब्दुल अझीझ इब्‍न अब्द रहमान इब्‍न फैसल अस् सौद. तो रियाद येथे जन्मला. त्यावेळी हा भाग ऑटोमन साम्राज्याच्या आधिपत्याखाली होता.

त्याचे वहाबी कुटुंबाशी जुने रक्ताचे नाते होते आणि वहाबी चळवळीत त्याचे कुटुंब प्रमुख होते. त्याने तुर्कस्तानच्या सुलतान खलीफाविरुद्ध बंड केले. १९१२ पर्यंत त्याने नेज्दच्या आसपासचा भाग काबीज करून संघटित सैन्य उभारले व पुढे रियाद काबीज केले. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी त्यास मैत्रीचे आमिष दाखविले, परंतु त्याचा शत्रू हेजॅझचा हुसैन ह्यास मदत केली. १९२४-२५ मध्ये इब्‍न सौदने हुसैनचा पराभव केला आणि हेजॅझ व नेज्दचा राजा म्हणून स्वतःस जाहीर केले. नंतर शेजारील राष्ट्रांबरोबर त्याने मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून अरबी द्वीपकल्पावर आपली सत्ता दृढ केली आणि आपल्या देशाचे १९३२ मध्ये ‘सौदी अरेबिया’ असे नाव ठेवले. पुढे येमेनचाही त्याने युद्धात पराभव केला. नंतर त्याने अंतर्गत सुव्यवस्थेकडे लक्ष पुरविले.

सौदी अरेबियामधील भटक्या लोकांतील कलह मोडून त्यांच्यात सुधारणा घडवून आणल्या. मक्का व मदीनेच्या यात्रेकरूंना होणाऱ्या चोरांच्या उपद्रवाचा बंदोबस्त केला. १९३९ मध्ये त्याने अमेरिकेच्या तेलकंपन्यांना सवलती देऊन उत्पन्न वाढविले आणि त्यातून नवीन रस्ते, बंदरे आणि लोहमार्ग बांधले व रुग्णालये सुरू केली. दुसऱ्या महायुद्धात सौदी अरेबिया तटस्थ होता. इब्‍न सौदने सौदी अरेबियास संयुक्त राष्ट्रांत स्थान मिळवून दिले आणि अरबांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अरब लीगची स्थापना केली.

मक्केजवळ तो मरण पावला. त्यास सौदी अरेबियाचा शिल्पकार म्हणतात.

 

संदर्भ :

  •  Philby, H. St. J. B. Arabian Jubilee, London, 1953.