बांदकर, कृष्णभट्ट : (१८४४ – १९०२). गोव्यातील एक संतकवी. डोंगरी या तिसवाडी तालुक्यातील गावात भिक्षुकाच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जगन्नाथ आणि आईचे नरसाई असे होते. कृष्णभट्ट सव्वा वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले. त्यामुळे त्यांचे चुलते मुकुंद भटजी यांनी त्यांचा सांभाळ केला. त्या काळात गावात शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे मूळाक्षरे गिरविण्याचे शिक्षण घरातच झाले. भिक्षुकीसाठी आवश्यक असलेले प्राथमिक स्वरूपाचे ब्रह्मकर्माचे शिक्षण त्यांना गावातील जाणकार हरीबाबा मुर्कुडी यांच्याकडून मिळाले.

बालपणापासूनच कृष्णभट्टांचा ओढा भक्तीमार्गाकडे होता. त्यांची बुद्धी तल्लख आणि स्मरणशक्ती तीव्र होती; परंतु त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही. मात्र रामायण, भागवत आणि भगवद्गीता यांच्या सातत्यपूर्ण वाचनाखाली त्यानी संस्कृत भाषेचे ज्ञान आत्मसात केले. मराठी भाषेतील संतवाङ्मयाचे अध्ययन करून त्यांनी मराठी भाषेवरही प्रभुत्व मिळविले. त्यांना उपजतच गोड आवाजाची देणगी लाभली होती. परमार्थाची आंतरिक ओढ होती. कला साधनेची आवड होती. त्याचा परिणाम म्हणून कृष्णभट्ट मंदिरे आणि देवस्थानातून कीर्तने करू लागले. त्यासाठी स्वतः पदे व भक्तीगीते रचू लागले. आपण रचलेले अभंग तन्मयतेेने गाऊ लागले. त्यांनी स्वात्मतत्त्वामृतशतक नावाचा एक पद्यग्रंथ रचला. त्यांनी पारिभाषिक शब्दांना कधीच महत्त्व दिले नाही. त्यामुळे वेदान्तातील सिद्धान्त त्यांनी सोप्या आणि सुलभ भाषेत सांगितले.

घरची परिस्थिची गरीबीची आणि भिक्षुकीची होती. याचक वृत्ती त्यांच्या मनाला रूचेना.त्यामुळे त्यांना वैराग्य येऊ लागले. त्यांचे संसारात मन लागेना. ते गुरूच्या शोधात निघाले. कोकणातील वेंगुर्ल्यात विष्णुबुवा नावाच्या सत्पुरूषाची भेट झाली. विष्णुबुवानी सांप्रदायिक पद्धतीने महावाक्याचा उपदेश केला. त्यावेळी संत रामदासांचे उदाहरण देऊन प्रथम प्रपंच करून नंतर परमार्थ साधावा असा व्यावहारीक सल्ला दिला. विष्णुबुवांच्या सल्ल्यानुसार कृष्णभट्टांनी रामदासी दिक्षा घेऊन घरी परतले. आता राम हे त्यांचे उपास्य दैवत झाले. १८७१ साली त्यांनी आपल्या घरातच राम-सीतेची प्रतिष्ठापना केली. तो पोर्तुगीज राजवटीचा काळ असल्याने कोणत्याही गावात मंदिर बांधण्यास सरकारी परवानगी नसे. त्यामुळे कृष्णभट्टानी बाहेरून घर आणि आतून मंदीर अशी त्या देवळाची रचना केली.

त्यांनी आपले उर्वरीत आयुष्य रामसेवेस अर्पण केले. तेथे रामनवमीचा उत्सव धूमधडाक्यात सुरू केला. मध्यंतरीच्या काळात त्यांनी भारतातल्या तीर्थस्थळांना भेटी देऊन आपली पारमार्थिक हौस पूर्ण केली. रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी शुकरंभासंवाद, लोपामुद्रासंवाद, नटसुभद्राविलास आणि अहिल्योद्वार अशी संगीत नाटके रचून त्यांचे मंचन केले. रामनवमी उत्सवातील त्यांच्या संगीत नाटकाचे मंचन पाहून मराठी रंगभूमीचे जनक मानल्या गेलेल्या अण्णासाहेब किर्लोस्करांनी स्फूर्ती घेतली असे सांगितले जाते. गोव्यातील देवस्थानातून वार्षिक उत्सवाच्या समाप्तीच्यावेळी गवळण काला करतात. त्यासाठी बांदकरानी दोन काले रचले आहेत. बांदकरांची कीर्तने, आख्याने, अभंग, स्फुट श्लोक अशा स्वरूपातील सुमारे आठशे पद्यरचना आहेत.

डोंगरी येथे त्यांचे निधन झाले.