माणसाची जीवनशैली, संस्कृती, परंपरा, इत्यादींचा अभ्यास छायाचित्रण-चित्रफितीच्या साहाय्याने केला जातो, त्या अभ्यासपद्धतीस दृक मानवशास्त्र असे म्हणतात. छायाचित्र व चित्रफित या यंत्रांचा शोध लागल्यानंतर दृक मानवशास्त्रामुळे छायाचित्रे किंवा चित्रफितीच्या माध्यमांतून मानवाच्या विविध प्रकारच्या परंपरा, राहणीमान, संस्कृती, लोकगीते, नृत्य, धार्मिक विधी इत्यादी पद्धतींचा वारसा जतन करण्यासाठी मदत होऊ लागली. अभ्यासक, मानवशास्त्रज्ञ, संशोधक यांना काही ठिकाणच्या मानवी भाषांचे आकलन होत नसल्यामुळे किंवा भाषेच्या अपुऱ्या आकलनामुळे निर्माण होणारे अडथळे छायाचित्रांमुळे दूर होण्यास मदत झाली. छायाचित्रांच्या साहाय्याने प्रसंगाचे वर्णन स्पष्ट होऊ लागले.
दृक मानवशास्त्रात माहिती संकलित करण्याच्या साधनांमध्ये छायाचित्रे तसेच चित्रफिती ही प्राथमिक साधने म्हणून ओळखली जातात. सामाजिक मानवशास्त्रातही क्षेत्र भेटींद्वारे समाजाची माहिती संकलित केली जाते. छायाचित्रणाद्वारे घरामध्ये वापरले जाणारे साहित्य, त्याची उपयुक्तता, वापरण्याची पद्धत या गोष्टींवर विशेष प्रकाश पडतो. बांबूच्या पट्ट्या किंवा वेतापासून केल्या जाणाऱ्या वस्तू, टोपल्या, बास्केट आणि धान्य साठविणाऱ्या कणग्या हे आदिम संस्कृतीचे वैशिष्य होते; परंतु या वस्तू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, वस्तू तयार करण्याची पद्धत, कोण तयार करते, कोठे तयार होतात इत्यादींचे वर्णन करण्यासाठी तसेच त्यांविषयचे आकलन अधिक सोप्या पद्धतीने आणि विस्तृतपणे होण्यासाठी छायाचित्रे अथवा चित्रफितींची मदत होते.
कोणत्याही संस्कृतीचा अभ्यास करताना वेगवेगळे पैलू महत्त्वाचे असतात. जसे की, एखाद्या समाजाच्या वसाहत रचनेचा अभ्यास करताना त्यातील विविधता दिसून येते. शहरी भागात घरे, इमारती वसविताना जागेअभावी बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते; परंतु खेड्यांत आणि जमांतींमध्ये घर बांधण्यापूर्वी आणि घर बांधताना काही विधी केले जातात किंवा सामुहिक पद्धतीने घर बांधणी होते. घर बांधताना घराचे दार कोणत्या दिशेस असावे, दारावर किंवा दाराजवळ काय असावे, स्वयंपाक करण्याची जागा कोठे असावी, देव-देवतांची जागा कोठे असावी इत्यादींचा विचार केला जातो. या सर्वांची मानवशास्त्रीय सर्वेक्षणात नोंद घेतली जाते; परंतु असे काॽ अथवा कशासाठीॽ याचे उत्तर लोकांकडून सांगितले जाईलच असे नसते. अशा वेळी या गोष्टींचा पुरावा छायाचित्रणातून पहावयास मिळतो. त्याच प्रमाणे संशोधकाने एखाद्या जमातीच्या धार्मिक किंवा इतर नैतिक विषयाबाबची मुलाखत घेतली असता तिची गोपनीयता ठेवली जाते. अशा वेळी काढलेल्या छायाचित्रांचा खूप उपयोग होतो. या शास्त्रात राजकारण, अर्थव्यवस्था, नातेसंबंध, सौंदर्यशास्त्र इत्यादीसंदर्भातही छायाचित्रे व चित्रफित तयार केली जातात. आज दृक मानवशास्त्र भौतिक दृष्टीकोनातून आणि सकारात्मकतावादी विश्लेषणापासून प्रतीकात्मक अर्थ लावण्यास मदत करते.
इसवी सन १८६० नंतर काही पत्रकारांनी छायाचित्रणाचा उपयोग करून मानवीय माहिती जतन करायला सुरुवात केली. त्यानंतर एकोणीसाव्या शतकामध्ये मानवशास्त्रज्ञांनी छायाचित्रणाचा उपयोग करून संकृतीचे पैलू पाहण्यास सुरुवात केली. यांमध्ये बाल्डविन स्पेन्सर, ॲल्फ्रेड कोर्ट हॅडन, फेलिक्स-लुईस रेगनाल्ट, लुमिरे हे आपल्या संशोधनात छायाचित्रण यंत्र वापरणारे पहिले मानवशास्त्रज्ञ होत. फ्रँट्स बोॲस या मानवशास्त्रज्ञांनी १८९० च्या दशकात स्थिरचित्रण केले, तसेच त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटी सांस्कृतिक विश्लेषणासाठी आणि शारीरिक हालचालीचे (नृत्य, कार्य, खेळ) दस्तावेजीकरणासाठी त्यांनी चित्रफितीचा उपयोग केला. त्याचप्रमाणे मार्गारेट मीड आणि ग्रेगरी बेटसन या मानवशास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनामध्ये छायाचित्रे आणि चित्रपट यांचा वापर करण्यावर भर दिला. त्यांच्या मते, ‘लिखित स्वरूपातील वर्णनापेक्षा छायाचित्रे किंवा चित्रफितींचा वापर केल्यास एखाद्या विषयाचे अधिक स्पष्टपणे आकलन होऊ शकते’. बेटसन यांनी शेकडो छायाचित्रे आणि चित्रफिती संग्रहित करून त्या आधारे ग्रंथ लिहिले. त्यांच्या ग्रंथांमुळे सखोल सांस्कृतिक अर्थ आणि लोकांचा संबंध ओळखण्यास अधिक सोपे झाले. इ. स. १९२२ ते १९३९ या काळात फ्रान्सिस ई. विल्यम्स या मानवशास्त्रज्ञांनी पापुआ न्यू गिनी या देशामधील विविध जमातींच्या लोकांची छायाचित्रे घेतली आणि दृक मानवशास्त्राचा वापर करून माहिती संग्रहित केली.
मानवी जीवनचक्र अभ्यासताना संस्कृतीच्या विविध पैलूंचे पुरावे छायाचित्रण किंवा चित्रफिती आपल्याला पहायला मिळतात. या चित्रफिती बघताना याचा चित्रपटसृष्टीशी जवळचा संबंध आहे असे वाटते; परंतु प्रत्यक्षात चित्रपट निर्मितीपूर्वी त्याची कथा तयार असते. कल्पनेनुसार अभिनय केला जातो, तसेच चित्रपटाला पूरक वातावरण निर्मिती केली जाते; परंतु दृक मानवशास्त्रीय चित्रफित तयार करताना कोणतीही कथा तयार नसते. दृक मानवशास्त्रात एखादा प्रसंग, विधी, रूढी अथवा परंपरा, कलाकृतींची निर्मिती, दैनंदिन व्यवहार व जीवनशैली इत्यादींचे जसेच्या तसे चित्रीकरण करून प्रसंगानुरूप त्याचे वर्णन मागाहून केले जाते. यामध्ये कथानकाच्या मर्यादा प्रसंगाला नसतात, तर प्रसंगानुरूप अर्थ सांगितला जातो. त्यामुळे दृक मानवशास्त्र ही एक वेगळी आणि स्वतंत्र शाखा आहे. यासाठी सांस्कृतिक घटकांना छायाचित्रे व चित्रफिती यांमध्ये बांधण्याचे आणि त्याचा वर्णनात्मक निबंध तयार करण्याचे काम या शाखेत केले जाते. त्यामुळे मानवशास्त्रीय सर्वेक्षणात दृक मानवशास्त्र अंतर्भूत असतेच.
संदर्भ :
- कुलकर्णी, शौनक, आदिम, पुणे, २००२.
- Banks, M.; Morphy, H., Rethinking Visual Anthropology, Yale University Press, 1997.
- Birx, H. James, Encyclopedia of anthropology, London, 2006.
https://www.youtube.com/watch?v=QCo78Jthymo
समीक्षक : शौनक कुलकर्णी