एलिझाबेथ, दुसरी : (२१ एप्रिल १९२६ ). इंग्लंड व उत्तर आयर्लंड यांची सध्याची राणी. हिचा जन्म लंडन येथे झाला. सहाव्या जॉर्जची ही ज्येष्ठ मुलगी. १९३६ मध्ये आठव्या एडवर्डने (ड्यूक ऑफ विंझर) राजत्याग केल्यामुळे सहावा जॉर्ज यास गादी मिळाली. त्याच्यानंतर ६ फेब्रुवारी १९५२ रोजी ती गादीवर आली. ती इंग्लंडच्या गादीवर येणारी सहावी स्त्री सम्राज्ञी.
२० नोव्हेंबर १९४७ ला लेफ्टनंट फिलिप माउंटबॅटन (पूर्वीचे ग्रीसचे राजकुमार) ह्यांच्याबरोबर तिचा विवाह झाला. १४ नोव्हेंबर १९४८ ला तिला पुत्र झाला, तोच इंग्लंडच्या गादीचा भावी वारस प्रिन्स चार्ल्स-प्रिन्स ऑफ वेल्स. याशिवाय तिला राजपुत्र अँड्र्यू व राजकन्या ॲन अशी दोन अपत्ये आहेत.
वडिलांच्या हयातीत तिने दक्षिण आफ्रिका, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इ. देशांना भेटी देऊन इंग्लंडबद्दल सदिच्छा निर्माण केली. तिचा राज्याभिषेक मात्र २ जून १९५३ या दिवशी झाला. राणी या नात्याने तिने न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, स्वीडन, कॅनडा, अमेरिका, हॉलंड इ. देशांना भेटी दिल्या. तिने भारतास दिलेली भेट (१९६१) संस्मरणीय ठरेल. दीडशे वर्षांच्या ब्रिटिश अंमलामुळे ब्रिटिश राष्ट्रकुल आणि लोक यांविषयी भारतीयांच्या मनात कडवटपणा निर्माण झाला होता. तरीसुद्धा भारताने तिचे न भूतो न भविष्यति अशा थाटाचे स्वागत केले.