पील, रॉबर्ट : (५ फेब्रुवारी १७८८ – २ जुलै १८५०). इंग्लंडचा एक सुधारणावादी पंतप्रधान व हुजूर पक्षाचा संस्थापक. त्याचा जन्म चेंबर हॉल (लँकाशर) येथे एका सधन कुटुंबात झाला. हॅरो व क्राइस्ट चर्च (ऑक्सफर्ड) या ख्यातनाम शिक्षणसंस्थांत अध्ययन करून प्राचीन अभिजात वाङ्मय व गणित या विषयांत त्याने पहिला क्रमांक पटकाविला. त्यानंतर तो १८०९ साली टोरी पक्षातर्फे ब्रिटिश संसदेत निवडून आला. सुरुवातीची काही वर्षे युद्ध व वसाहती या खात्यांचा उपसचिव म्हणून त्याने काम केले. लिव्हरपूल पंतप्रधान झाल्यानंतर गृहखात्यातील आयर्लंडविषयक मुख्य सचिव म्हणून त्याची नियुक्ती झाली (१८१२). यानंतरच्या सु. सहा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने आयर्लंडमध्ये कार्यक्षम प्रशासनाद्वारे अनेक सुधारणा केल्या; कॅथलिकांनी सुरू केलेली कॅथलिकांच्या स्वातंत्र्याची चळवळ निपटून काढून आयर्लंडच्या राजकीय असंतोषास आळा घातला व प्रॉटेस्टंटांचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्याकरिता १८१४ चा शांतता कायदा अंमलात आणला आणि राष्ट्रीय पोलीस दलाची स्थापना केली. ती पुढे रॉयल आयरिश कॉन्स्टेब्युलरी म्हणून प्रसिद्धीस आली. आयर्लंडमधील १८१७ च्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी त्याने खास प्रशासकीय व्यवस्था केली. या त्याच्या कार्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली.

त्यास १८२२ साली गृहखात्याचा सचिव करण्यात आले. तत्पूर्वी सर जॉन ल्फॉइड या लष्करी अधिकाऱ्याच्या ज्यूल्या नावाच्या मुलीशी त्याचा विवाह झाला (१८२०). त्यांना सात मुले झाली. गृहखात्यात त्याने आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. त्यांपैकी जुन्या फौजदारी कायद्यात मानवी दृष्टीकोनातून केलेल्या सुधारणा महत्त्वाच्या होत. कैद्यांच्या सुखसोयी विचारात घेऊन तुरुंगाची वास्तू व वातावरण यांत त्याने सुधारणा केल्या. याशिवाय त्याने लंडनच्या पोलीस दलात सुधारणा केल्या आणि कॅथलिकांना संसदेत प्रवेश देण्याचा ठराव मांडला. हे सर्व करीत असता सुरुवातीला त्याने टोरी पक्षाच्या हिताचे रक्षण केले; परंतु टोरी पक्षाच्या दृष्टीकोनात बदल होणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊनच त्याने कॅथलिकांसंबंधीचा ठराव मांडला. तो १८३२ मध्ये संमत झाला. या ठरावामुळे टोरी पक्षाचा त्याला असणारा पाठिंबा काहीसा डळमळीत झाला. तेव्हा त्याने टोरी पक्षाचा कायापालट करण्याचा निश्चय केला आणि जुना अनुदार व गतानुगतिक वृत्तीचा टोरी पक्ष बदलला. त्याकरीता त्याने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला व अनेक सभासदांची सहानुभूती मिळवून टोरी पक्ष अधिक उदारमतवादी व लोकानुवर्ती केला. तथापि त्याची मूळ चौकट तीच होती; म्हणून त्यास काँझर्व्हेटिव्ह पक्ष हे नाव दिले. या सुमारास राजाचे व्हिग (लिबरल) पक्षाशी मतभेद झाले. तेव्हा राजाने पीलला मंत्रिमंडळ बनविण्यास सांगितले आणि तो पंतप्रधान झाला (१८३४- ३५); पण शंभर दिवसांतच त्याच्या मंत्रिमंडळाचा कॉमन्स सभेत पराभव झाला. यानंतर त्याने काँझर्व्हेटिव्ह पक्षाची बांधणी मजबूत केली. ग्लॅडस्टन व डिझरेली यांसारखी मातब्बर मंडळी आपल्या बाजूला वळविली आणि १८४१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचे मताधिक्य प्रस्थापित करून तो पुन्हा पंतप्रधान झाला (१८४१–४६).

पील पंतप्रधान झाल्यानंतर त्याने इंग्लंडमध्ये अनेक मौलिक सुधारणा केल्या. त्याने सुरुवातीस परकीय मालावर जकात बसवून कर्जबाजारी इंग्लंडची आर्थिक स्थिती सावरली. तसेच स्थानिक उत्पादनास उत्तेजन देऊन उद्योगधंद्यास संरक्षण दिले. बाहेरचा कच्चा माल कमी जकातीने आयात होऊ लागला. उत्पन्नातील तूट भरून निघावी, म्हणून त्याने प्राप्तिकर बसविला. यामुळे उत्पन्न वाढले. चार्टर ॲक्ट करून त्याने बँकिंग पद्धतीत सुधारणा केल्या; तसेच आयरिश कॅथलिक चर्चला मदत दिली व आयर्लंडमध्ये जमीनसुधारणा घडवून आणल्या; परंतु १८४५ मध्ये इंग्लंमध्ये अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला आणि आलेली पिके, विशेषत: आयर्लंडमधील बटाट्याचे पीक, वाहून गेली. तेव्हा बाहेरील धान्य इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात आयात करणे आवश्यक होते; पण धान्यावरील जकातीमुळे ते काम अवघड झाले. तेव्हा त्याने धान्यावरील जकात कायदा रद्द केला आणि खुल्या व्यापारास परवानगी दिली. यामुळे काँझर्व्हेटिव्ह पक्षास जमीनदार वर्गाचा जो पाठिंबा होता तो साहजिकच कमी झाला. पीलने स्वपक्षाशी विश्वासघात केला, असे डिझरेली व बेंटिंकसारखे काँझर्व्हेटिव्ह पुढारी बोलू लागले आणि पक्षात फूट पडून पीलचा पराभव झाला (१८४६).

यानंतरचे त्याचे उर्वरित आय़ुष्य विरोधी पक्षाचा नेता म्हणून गेले. त्याने व्हिग पक्षाच्या काही धोरणावर प्रसंगोपात्त कडाडून टीका केली. एक दिवस संसदेमधून घरी परत जात असता तो घोड्यावरून पडला व त्याच्या पाठीला जबर मार बसला आणि त्या दुखण्यातच त्याचे पुढे लंडन येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Gash, Norman, Sir Robert Peel, (his) Life after 1830, Totowa, 1972.