जेव्हा पाण्यामधील आयन (धन आणि ऋण) काढावयाचे असतात तेव्हा ही प्रक्रिया वापरतात.  अशा प्रकारचे पाणी विविध उत्पादनांमध्ये (उदा., औषधे, शीतपेये, उच्च दाबाची वाफ इ.) वापरावे लागते.  ह्या पद्धतीमध्ये पाणी प्रथम बायकार्बोनेट, सल्फेट आणि क्लोराइड काढणाऱ्या रेझीनमधून पंप करतात आणि त्यानंतर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम काढणाऱ्या रेझीनमधून जाऊ देतात. ही दोन रेझीन्स साखळीरूपात (series) सारखी असतात.  त्यामुळे पहिल्या रेझीनची क्षमता संपली की त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी गंधाकाम्लासारख्या रसायनाचा उपयोग करतात आणि दुसऱ्या रेझीनच्या पुनरुज्जीवनासाठी कॉस्टिक सोडा वापरतात. ह्या रासायनिक प्रक्रिया पुढीलप्रमाणे होतात. (R = Resin; रेझीन)

Ca(HCO_3)_2 + H_2R \rightarrow CaR + 2H_2O + 2CO_2 \uparrow

CaSO_4 + H_2R \rightarrow CaR + H_2SO_4

CaR + H_2SO_4 \rightarrow CaSO_4 + H_2R   (पहिल्या रेझीनचे पुनरुज्जीवन)

2R(OH) + H_2SO_4 \rightarrow R_2SO_4 + 2H_2O

R_2SO_4 + 2NaOH \rightarrow 2R(OH) + Na_2SO_4 (कॉस्टिक सोडा वापरून दुसऱ्या रेझीनचे पुनरुज्जीवन.)

ह्या व्यतिरिक्त पाण्यातले सर्व धन आणि ऋण आयन काढून टाकण्याचे इतर मार्ग म्हणजे :

 • सौर ऊर्जा अथवा इंधन वापरून पाण्याचे बाष्पीभवन करणे आणि ते बाष्प थंड करणे,
 • विद्युत् अपोहन (Electrodialysis)
 • पाणी गोठवणे (Freezing)
 • विरुद्ध परासरण (Reverse Osmosis)

 

समीक्षक : सुहसिनी माढेकर