ओर्लांदो, व्हीत्तॉर्यो एमान्वेअले : (१९ मे १८६०—१ डिसेंबर १९५२). प्रसिद्ध इटालियन मुत्सद्दी व विधिज्ञ. पालेर्मो येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. कायद्याचे शिक्षण घेतल्यावर तो १८९७ मध्ये सिसिलीतील संसदेवर निवडून आला. पुढे तो १९०३ ते १९०५ च्या दरम्यान जोलीत्तीच्या मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री होता. त्यानंतर सालांद्रा व बोसेलीच्याही मंत्रिमंडळांत तो अनुक्रमे विधिमंत्री व अंतर्गत खात्याचा मंत्री होता.

बोसेलीच्या मंत्रिमंडळाच्या राजीनाम्यानंतर १९१७ ते १९१९ च्या दरम्यान तो पंतप्रधान झाला. ११ नोव्हेंबर १९१८ च्या शांतता तहानंतर पॅरिसला भरणाऱ्या शांतता परिषदेत त्याने इटलीच्या प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व केले. तथापि इटलीच्या सर्व मागण्या ह्या परिषदेत धुडकावण्यात आल्यामुळे तो स्वदेशी परतला आणि त्याला आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देणे भाग पडले. पुढे काही दिवस त्याने संसदेच्या अध्यक्षाचे काम केले व मुसोलिनीस पाठिंबा दिला, पण पुढे मात्तेऑत्तीच्या खुनाच्या (१९२४) निषेधार्थ त्याने संसद त्याग केला. त्यानंतरचे उर्वरित आयुष्य त्याने लेखन-वाचनात व्यतीत करण्याचे ठरविले. दुसऱ्या महायुद्धानंतर त्याने पुन्हा राजकीय जीवनात पदार्पण केले व नॅशनल डेमॉक्रॅटिक युनियनचा पुढारी, संविधान समितीचा अध्यक्ष व सीनेटचा सभासद इ. पदांवर काम केले. मे १९४८ च्या प्रजासत्ताक इटलीच्या अध्यक्षीय निवडणुकीत त्याचा पराभव झाला. तो वयाच्या ब्याण्णवव्या वर्षी रोममध्ये मरण पावला.