जलशुद्धीकरण केंद्रामधील स्वच्छतागृहे व प्रयोगशाळा यांमधून निघणाऱ्या सांडपाण्याव्यतिरिक्त उत्पन्न होणारे सांडपाणी मुख्यतः निवळण टाक्या आणि निस्यंदक येथे होते. निवळणामुळे टाक्यांच्या तळामध्ये बसलेला गाळ आणि निस्यंदकाच्या माध्यमात अडकलेले आलंबित पदार्थ नियमितपणे बाहेर काढावे लागतात, त्यासाठी पाण्याचा वापर केला जातो.  तसेच पाण्याचे निष्फेनिकरण करताना लोह, मंगल (मँगॅनीज) फ्ल्युओराईड, आर्सेनिक इ. दूषितके काढताना अणि पाण्याचे प्रतिआयनीभवन व विरुद्ध परासरण करताना उत्पन्न होणारा गाळ आणि रसायनयुक्त पाणी हीसुद्धा सांडपाण्याच्या यादीमध्ये अंतर्भूत होतात.  वरील सर्व प्रकारच्या सांडपाण्याची मात्रा शुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेच्या साधारणपणे ४% ते ६% असते, पण ह्यामधील निवळण आणि निस्यंदन येथील सांडपाण्याचा पुनर्वापरासाठी विचार केला जातो.  ही टक्केवारी पाण्याची गढूळता, त्यातील आलंबित पदार्थाचे प्रमाण दूषितकाचे प्रमाण, ती काढण्यासाठी वापरण्याच्या रसायनाचे प्रमाण ह्यांवर अवलंबून असते.

पुनर्वापराचे फायदे : १) पाण्याचा एक अतिरिक्त स्रोत उपलब्ध होतो आणि २) नैसर्गिक पाण्याचे प्रदूषण काही अंशी कमी होते.

पुनर्वापरापूर्वी ह्या सांडपाण्यावर फक्त निवळण किंवा किलाटन, कणसंकलन आणि निवळण ह्या प्रक्रिया केल्या जातात. त्यानंतर ते पाणी केंद्रामध्ये येणाऱ्या पाण्यामध्ये किंवा निस्यंदकामध्ये जाणाऱ्या पाण्यामध्ये मिसळले जाते. ते वरीलपैकी कोठे मिसळावे हे मुख्यतः ह्यासाठी होणाऱ्या वरील प्रक्रियांच्या एकूण खर्चावर अवलंबून असते. निवळण टाक्यांमधील गाळ २४ तासांमध्ये एकदा किंवा दोनदा काढला जातो, पण प्रत्येक निस्यंदकाचे माध्यम २४ तासामध्ये एकदा धुतले जाते, त्यामुळे ह्या सांडपाण्याचा प्रवाह त्याच्या शुद्धीकरण केंद्रावर थांबून येत असतो.  ह्या शुद्धीकरण प्रक्रिया प्रभावीपणे होण्यासाठी येणारे सांडपाणी प्रथम साठवण टाकीत घेऊन तेथून ते नियमित (Uniform) प्रवाहाच्या रूपात पंप केले जाते, त्यामुळे त्यावरील शुद्धीकरण प्रक्रिया व्यवस्थितपणे होते.

समीक्षक : सुहासिनी माढेकर