चित्रकथी : चित्रकथी म्हणजे चित्रांच्या सहाय्याने सादर केलेली कथा. आदिवासी जीवनात चित्रकलेची फार मोठी परंपरा आहे. पिंगुळीच्या ठाकर आदिवासींचा चित्रकथी हा कलाप्रकार खूप नावाजलेला आहे. एका वेगळ्या चित्रशैलीतील परंपरा पिंगुळीच्या ठाकर आदिवासींनी जोपासली आहे ; मात्र ही कला वारली कलेसारखी फक्त भिंतीचित्रांपुरतीच मर्यादित नसून ती एक प्रयोगशील कला आहे. चित्रांच्या सहाय्याने कथा सांगण्याची कला म्हणजेच चित्रकथी.

“वर्णकैः सह ये वक्ति स चित्रकथको वरः गायका यत्र गयन्ति विना तालेर्मनोहरम्” असा चित्रकथी कलेचा उल्लेख सोमेश्वराच्या मानसोल्लासमध्ये आढळतो, एवढी ही कला जुनी आहे. ठाकर आदिवासी १५ इंच लांब आणि १२ इंच रुंद आकाराच्या कागदावर एका विशिष्ट्य शैलीत चित्रे काढतात.वनस्पती आणि मातीच्या रंगाने ही चित्रे रंगवितात. रामायण,महाभारतातील एखादे आख्यान निवडून प्रसंगानुरूप चित्रे काढतात.कथानकाच्या घटनाक्रमानुसार त्यांचा क्रम ठरलेला असतो.कागदाच्या दोन्ही बाजूस ही चित्रे काढली जातात.एका कथानकाच्या चित्रांची एक पोथी तयार होते.

चित्रकथी म्हणजे चित्रांद्वारे सादर केलेली कथा. या कथा सादरीकरणाला ठाकर कलावंत पोथी सोडणे म्हणतात. हे आदिवासी कलावंत गावातील मंदिरात चित्रकथीचा खेळ करतात. कलाकार मंदिरात घोंगडीवर मांडी घालून बसतात. सूत्रधार सर्वप्रथम पोथीची पूजा करतो. सूत्रधाराच्या समोर एक लाकडी फळी उभी केली जाते. सूत्रधाराच्या उजव्या हातात तीन तारी वीणा तर डाव्या हाताच्या अंगठा आणि करंगळीमध्ये टाळ गुंतविलेला असतो. तर साथीदारांकडे डमरू आणि तुणतुणे ही वाद्ये असतात. सूत्रधार रिद्धीसिद्धीसह गणपतीचे चित्र फळीच्या आधाराने उभे करतो आणि गाऊ लागतो.

विघ्नहरासी गायो एकदंता  देवागौरीहराचिया सुता  सकट सरसी गुण गाता  तुझे चरणी नमन माझे ।। असे पद म्हणून गणपतीचे स्तवन करतो.त्यानंतर पान पलटून सरस्वतीचे चित्र समोर ठेवतो आणि सरस्वतीची आराधना करतो.रसिकांची मने जिंकू शकेन अशी रसाळ वाणी मला दे अशी सरस्वतीकडे मागणी करतो आणि मग आख्यानाला सुरुवात करतो. रामायण, महाभारत आणि पौराणिक कथांवर आधारीत आख्याने सूत्रधार सादर करतो. आख्यान सादर करताना प्रथम त्या प्रसंगाला अनुरूप असं चित्र फळीवर लावतात आणि त्याविषयी वर्णनपर ओवी गायली जाते आणि त्यानंतर त्या ओवीचं निरूपण सूत्रधार करतो. तसेच आख्यानातील पात्रांचे संवाद सूत्रधार आणि साथीदार बोलतात आणि कथानक पुढे नेतात, कथानकाच्या मागणीप्रमाणे वेगवेगळ्या प्रसंगाची चित्रे फळीवर लावली जातात. आख्यानाचे निरूपण करताना सूत्रधार मराठी भाषेसोबतच स्थानिक भाषेचा वापर विनोदासाठी करतो. तसेच काही दाखले देण्यासाठी विद्यमान घटनांचा आधार घेतात. सूत्रधाराचे निरूपण कौशल्य आणि गायनातील गोडवा रसिकांना खिळवून ठेवतो. पिंगुळीतील ठाकर आदिवासींकडे असलेल्या पोथ्यात रामायण, महाभारतातील अनेक आख्याने तसेच डांगीपुराण,नंदीपुराण, जालंदर – वध, कपिलासूर अशी अनेक आख्याने आहेत. या आख्यानातील पदे,कवने आणि संवाद एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरेने चालत असतात.

पहा : चित्रकथी, पैठण व पिंगुळी

संदर्भ : https://thinkmaharashtra.com/node/2318