चित्रकथी ही महाराष्ट्रातील एक मर्यादित पण महत्त्वपूर्ण लोककला-चित्रपरंपरा आहे. तिचा कथन आणि चित्रण (दृक्श्राव्य) असा दुहेरी आविष्कार आढळतो. साधारणतः ३०×४० सेंमी.च्या कागदावर ही चित्रे काढलेली असतात. संग्रहालयांतील काही उपलब्ध चित्रे, कागदाचा आकार आणि त्यांवरील उत्थित छापाचे ठसे यांवरून ती अठराव्या शतकाचा उत्तरार्ध ते एकोणिसावे शतक या काळातील असावीत. चित्रे रंगवण्यासाठी नैसर्गिक रंग वापरले जात. पोथीचा काळ, रंगसंगती, चित्रकार आणि त्याची शैली यांमध्ये व्यक्तिसापेक्ष फरक पडलेला दिसतो. रामायण व महाभारतातील कथाविषय हे चित्रकथीचे प्रमुख विषय असून लोककथांचे चित्रणही त्यांत आढळते.

पिंगुळी (जि. सिंधुदुर्ग) येथील चित्रकथी – परंपरेतील पोथीचे एक पान : स्वयंवर कथेतील एक दृश्य.

चित्रकथी-परंपरा पैठण व पिंगुळी या दोन नावांनी ठळकपणे ओळखली जाते. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे जी चित्रे मिळाली, तिला पैठण चित्रकथी म्हणतात; तथापि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी (ता. कुडाळ) गावात ही चित्रपरंपरा अद्यापही अस्तित्वात आहे. तिला पिंगुळी चित्रकथी म्हणतात. पैठण व पिंगुळी येथील पोथ्यांतील चित्रांच्या शैली एकमेकींशी मिळत्याजुळत्या नाहीत. पूर्वी पुणे, वाई, नाशिक, धुळे इत्यादी ठिकाणी ही चित्रकथी सादर करणारे कलाकार होते. या चित्रांचे कथन करणारे कलाकार सचित्र पोथ्या घेऊन गावोगाव हिंडत असत आणि रात्रीच्या वेळी देवळाच्या आवारात चित्रकथीचे कार्यक्रम सादर करीत. नवरात्रीचे नऊ दिवस आणि अन्य महत्त्वाच्या तिथींना असे कार्यक्रम केले जात. याला जागर असेही म्हणतात. एक मुख्य कलाकार व दोन सहकलाकार कार्यक्रमाचे सादरीकरण करीत. मुख्य कलाकार मांडी घालून बसतो व मांडीला टेकवून आयताकार फळी उभी ठेवतो. त्याच्या उजव्या बाजूला चित्रपोथी ठेवलेली असते. पोथीतील एकेक चित्र फळीवर ठेवून तो कथा सांगतो आणि कथनाच्या आवश्यकतेनुसार गाणी म्हणतो. साथीदार टाळ, हुडूक (डमरू), एकतारी आदी वाद्ये वाजवतात. दोन चित्रांचे कागद एकमेकांना पाठपोट चिकटवलेले असतात. त्यामुळे एका चित्राचे निरूपण संपले की, तो कागदाच्या पाठीमागील चित्राचे निरूपण सुरू करतो. निरूपणात बोली भाषा, शुद्ध मराठी व संस्कृतप्रचुर शब्द यांचा समावेश असतो. यातील कथांमध्ये मिथककथा असतात. मिथककथेच्या माध्यमातून अनेक समकालीन विषयांना स्पर्श करण्याचे लोककलेचे वैशिष्ट्य चित्रकथीमध्येही आढळते.

पैठण व पिंगुळी चित्रकथींच्या निर्मितीविषयी तसेच स्थलकालाविषयी विश्वसनीय सबळ पुरावा आढळत नाही. भारतीय लघुचित्रपरंपरा, स्थानिक पद्धती आणि दक्षिण भारतातील चामड्याची लोकचित्रे यांपासून ही  चित्रशैली विकसित झालेली असावी, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. चित्रकथीमधील आकार ठसठशीत आणि  लयदार रेषांनी काढलेले दिसतात. आकारांना ठळक बाह्यरेषा दिसते. बहुतांश चित्ररचना आडव्या असतात. चित्रकथीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कथेशी निगडित निसर्गचित्रणाचे बारकावे (डोंगर, सूर्य, वास्तू इत्यादी) या चित्रांमध्ये सहसा आढळत नाहीत.  कथेची घटना कोणत्या पार्श्वभूमीवर घडते आहे, हे कथेकरी सांगत असल्याने असे बारकावे अपवादानेच दाखवले जात. त्यामुळे चित्राची पार्श्वभूमी बहुतांश सपाट असते. मात्र झाडे, प्राणी इत्यादी अत्यावशक प्रतिमा चित्रित केलेल्या असतात. तसेच या चित्रांच्या वर अथवा खाली किंवा दोन्ही बाजूंना सरळ, वक्र रेषांचा वापर करून पट्ट्या रंगवलेल्या दिसतात. व्यक्तिचित्रणात कपाळ रुंद, नाक टोकदार आणि कान दुहेरी वक्र रेषांनी दाखवलेले दिसतात. चेहरा व पाय बाजूने तर उर्वरित शरीर समोरून रेखाटलेले असते. या शैलीमध्ये डोळा मोठा व गोलाकार आणि संपूर्ण बुबूळ दिसते. चित्रांतील पुरुषप्रतिमा बलवान, रुंद खांदे व छाती, अरुंद कंबर तर स्त्रीप्रतिमा विविध आभूषणांनी नटलेल्या दिसतात. पैठणशैलीची प्रतिमांकन करण्याची, डोळा व इतर बारकावे दाखवण्याची पद्धत कर्नाटकातील छायाबाहुलीशी साधर्म्य दर्शविते. साधारणपणे लाल, गुलाबी, हिरवा, निळा, पिवळा हे रंग प्रामुख्याने वापरलेले दिसतात. त्यातही लाल रंगाचे आधिक्य आहे. रंगलेपन सपाट असते. काही वेळा मानवाकृतींच्या वस्त्रांवर उभ्या, आडव्या रेषा अथवा पानाफुलांच्या नक्षीचे अलंकरण दिसते. कथानकानुसार वैचित्र्यपूर्ण प्राणी, राक्षस यांच्या शरीरावर केस, त्वचा यांचे पोत दिसतात. चित्रकाराची  कल्पनाशक्ती व कसब यांनुसार चित्ररचना, प्रतिमांकन व रंगसंगती यांमध्ये बदल दिसतो.

पुणे येथील राजा दिनकर केळकर संग्रहालयात पैठणशैलीतील चित्रांचा संग्रह आहे. ब्रिटिश संग्रहालय, व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय, लंडन येथे काही चित्रे संग्रहित आहेत. या शैलीची मौखिक परंपरा कमी होत चालली आहे. प्रसिद्ध चित्रपटदिग्दर्शक मणी कौल यांनी १९७६ साली चित्रकथी नावाचा एक लघुपट केला. ज्या परिसरात या कलेची निर्मिती झाली, त्या परिसराचे चित्रण मणी कौल यांनी केले आहे. अलीकडील तुरळक चित्रकार वगळता या शैलीतील चित्रकारांची नोंद झालेली नाही; परंतु पिंगुळीतील आदिवासी ठाकर कलावंत परशुराम गंगावणे आणि गणपत मसगे यांनी पिंगुळी शैलीची मौखिक परंपरा जपली आहे. चित्रकथीचे दस्तऐवजीकरण व संशोधन करण्याच्या हेतूने परशुराम गंगावणे यांनी ‘ठाकर आदिवासी कला आंगणʼ या ठाकर कलांच्या संग्रहालयाची स्थापना केली आहे.

संदर्भ :

 • खोपकर, अरुण, चलत-चित्रव्यूह,  मुंबई, २०१२.
 • रणसिंग, एम. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर, मुंबई, (२००७).
 • Chitrakathi : folk painting of Paithan, Raja Dinkar Kelkar Museum, Pune, 1996.
 • Dallapiccola, Anna L. Ed., Jain, Jyotindra Paithan Paintings : The Epic World of the Chitrakathis Picture Showmen : Insights into the Narrative Tradition in Indian Art, Mumbai, 1978.
 • https://www.youtube.com/watch?v=HfYbEDXrFSo
 • https://www.youtube.com/watch?v=noDWzQPSoog
 • https://pingulichitrakathiart.com
 • http://rajakelkarmuseum.com/museum_overview.html

This Post Has One Comment

 1. विश्वास गोविंद गावठे

  खुपच आवडली. पल्हाळ न लावता लिहीलेली उपयुक्त माहीती. व इतकी छान परंपरा पुढिल पिढिकडे सुपुर्द करण्यात आपण कमी पडतोय याची खंतही वाटली. खरं तर आता पर्यर्टन वाढतय (करोनाच सावट सोडल्यास) त्यानुसार त्यावर थोडबहुत अर्थार्जन होऊ शकतं

प्रतिक्रिया व्यक्त करा