विष्णू प्रभाकर : (२१ जून १९१२ –११ अप्रैल २००९). प्रसिद्ध भारतीय हिंदी लेखक. प्रगतीवाद कालखंडातील एक महत्त्वाचे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. हिंदी साहित्यात कथा, नाटक व कादंबरी हे साहित्यप्रकार त्यांनी विशेषत्वाने हाताळले आहेत. बालसाहित्य लेखनातही त्यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांचा जन्म उत्तरप्रदेश मधील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील मीरापूर येथे झाला. विष्णू प्रभाकर यांचे वडील दुर्गाप्रसाद हे अतिशय धार्मिक वृत्तीचे होते. त्यांची आई महादेवी एक सुशिक्षित व सुसंस्कारी स्त्री होती. त्यांच्या आईने त्याकाळात पडदा पद्धतीला विरोध केला होता. आईच्या या बंडखोर विचारांचा विष्णू यांच्यावर पुढे चांगलाच प्रभाव पडला व त्यांनी आपल्या लेखनीतून सामाजिक समस्यांवर प्रहार केला.
विष्णू प्रभाकर यांचे प्रारंभिक शिक्षण जन्मगावीच झाले. पुढील शिक्षण त्यांनी अत्यंत अडचणीसह मामाच्या गावी पंजाब प्रांतातील हिसार येथे घेतले. मामाच्या घरची परिस्थिती ठिक नसल्यामुळे त्यांच्या शिक्षणात अडथळा आला. कौटुंबिक जबाबदारी निभावण्यासाठी त्यांनी शासकीय नोकरी स्वीकारली. चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करीत असताना त्यांना १८ रुपये महिना पगार मिळत असे. बुद्धीने अतिशय तल्लख असलेल्या विष्णू यांनी अशाही परिस्थितीत काम करीत असताना आपले शिक्षण सुरुच ठेवले. हिंदी भाषेत त्यांनी प्रभाकर व हिंदीभूषण या पदव्या प्राप्त केल्या. सोबतच संस्कृतमध्ये प्रज्ञा व इंग्रजीत बी. ए. ची पदवी प्राप्त केली. विष्णू यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच तत्कालीन काँग्रेस पक्षाकडे त्यांची ओढ होती. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात त्यांनी आपल्या लेखनीचे ध्येय निश्चित केले व स्वातंत्र्यासाठी ते सतत संघर्ष करीत राहिले. सुरुवातीला त्यांचे नाव दयाला होते ; परंतु त्यांना एका संपादकाने प्रभाकर हे टोपण नाव ठेवण्याचा सल्ला दिला आणि नंतर ते विष्णू प्रभाकर झाले. देश स्वातंत्र्य झाल्यावर विष्णू प्रभाकर दिल्लीला आले व इथे त्यांनी सुरुवातीला आकाशवाणीवर नाट्य दिग्दर्शक म्हणून काम केले.
विष्णू प्रभाकर हे हिंदीतील सिद्धहस्त लेखक होत. मुख्यत: ते कथाकार म्हणून ओळखले जातात. याशिवाय त्यांनी चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, बालसाहित्य व नाटक लिहून देखील आपला ठसा हिंदी साहित्यात उमटविला आहे. त्यांचे लेखन पुढीलप्रमाणे : कादंबरी – निशिकांत (१९५१), अर्धनारीश्वर, धरती अब भी घूम रही है, स्वप्नमयी (१९५६), दर्पण का व्यक्ती , पाप का घडा,(१९६८), कोई तो (१९६८); लघुकथा – आदि और अंत (१९४५), संघर्ष के बाद (१९५३),मेरी कथायात्रा ( १९८४), एक और और कुंती (१९८५); नाटक – नव प्रभात (१९५१), समाधि (१९५२), डाक्टर (१९६१), युगे – युगे क्रान्ति (१९६९), टूटते परिवेश (१९७४), कुहासा और किरण (१९७५), टगर (१९७७), बन्दिनी (१९७९), सत्ता के आर पार (१९८१),अब और नहीं (१९८१), गान्धार की भिक्षुणी (१९८२), श्वेतकमल (१९८४), केरल का क्रान्तिकारी (१९८७), विष्णु प्रभाकर : संपूर्ण नाटक भाग 1 , 2 , 3 ( १९८८ ), विष्णु प्रभाकर : संपूर्ण नाटक भाग 4, 5, 6 (१९८९ ), नाट्य रूपान्तर – चन्द्रहार ( १९५२ ), होरी (१९५५), सुनन्दा (१९८४) ; एकांकिका – इन्सान और अन्य एकांकी (१९४१), प्रकाश और परछाई (१९५६), बारा एकांकी (१९५८) उँचा पर्वत गहरा सागर (१९६६). याबरोबरच प्रवासवर्णने, ललितलेख आणि विपुल प्रमाणात बालसाहित्य या साहित्यप्रकारात त्यांनी लेखन केले आहे. त्यांची पंखहीन नावाची आत्मकथा तीन भागात प्रसिद्ध झाली आहे. त्यांची आवारा मसीहा हे चरित्र आणि ज्योतीपुत्र हिमालय व जमुना गंगा के नैहर मै हे प्रवासवर्णनपर पुस्तके देखील प्रसिद्ध आहेत.
समाजातील विविध सामाजिक समस्यांना त्यांनी वाचकांसमोर आणले आहे. स्त्रीचे स्थान त्यांनी नेहमीच आपल्या लेखनातून अधोरेखित केले आहे. आपल्या कथांमधून त्यांनी व्यक्ती आणि समाज यामधील संघर्षाची मांडणी केली आहे. जातीयता आणि धर्मभेद यावर त्यांनी आपल्या कथांमधून प्रकाश टाकला आहे. विष्णू प्रभाकर यांच्या नाटकांमध्ये सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनातील संगती आणि विसंगतीचे चित्र अधोरेखित झाले आहे. युगचेता साहित्यिक अशी त्यांची ओळख निर्माण झाली ती यामुळेच की त्यांनी युगानुरूप /काळानुरूप प्रश्नांना आपल्या नाटकातून वाचकांसमोर मांडले आहे. कुहासा और किरण आणि तुटा परिवेश या नाटकांतून स्वातंत्र्यानंतरचा भ्रमनिरास त्यांनी चित्रित केला आहे.
विष्णू प्रभाकर यांच्या लेखनाची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सोव्हिएत लॅन्ड नेहरू पुरस्कार (१९७६), आंतरराष्ट्रीय मानवता पुरस्कार (१९७५), राष्ट्रीय एकता पुरस्कार (१९८०), उत्तर प्रदेश हिंदी साहित्य सन्मान (१९८५), मुर्तीदेवी पुरस्कार (१९९०), भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार (१९९३) इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. मुंशी प्रेमचंद, यशपाल, जैनेंद्र कुमार तसेच अज्ञेय यांसारख्या मोठ्या साहित्यिकांचे समकालीन असलेल्या विष्णू प्रभाकर यांनी हिंदी साहित्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
त्यांचा मृत्यू न्युमोनिया व छातीत आणि लघवीत संसर्ग झाल्यामुळे झाला. त्यांचे मरणोपरांत देहदान करण्यात आले.
संदर्भ : डोमदिया डी.एम.; मेहता शैलेश, हिंदी साहित्य का विश्वकोश, रावत प्रकाशन, नई दिल्ली, २०१७.