उदयप्रकाश  : (१ जानेवारी १९५२). सुप्रसिद्ध भारतीय हिंदी सहित्यिक. संपादक आणि राजकीय कार्यकर्ते अशीही त्यांची ओळख आहे. जन्म मध्यप्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील सीतापूर या गावी. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण याच गावात पूर्ण झाले. त्यांनी विज्ञान विषय घेऊन पदवी प्राप्त केली. शहडोलसारख्या छत्तीसगढजवळच्या सीमावर्ती भागात त्याचे बालपण गेले. आईवडिल दोघांचेही मृत्यू क्रमाक्रमाने कॅन्सरने झाले. तेव्हा उदयप्रकाश याचे वय उणेपुरे १८ होते. आईवडिलाच्या अकाली मृत्यूचे अनुभव त्यांच्या काव्यात उमटले आहेत. विज्ञानात पदवी प्राप्त केली असली तरी पुढील पदव्युत्तर शिक्षण त्यांनी हिंदी साहित्यात घेतले आणि एम. ए. च्या अभ्यासक्रमात सागर विद्यापीठातून सुवर्णपदक प्राप्त केले. उदयप्रकाश यांचे वडील प्रेमकुमार सिंह हे परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यांची आई गंगादेवी, संस्कारी होती. उदयप्रकाश यांच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या आईचा विलक्षण प्रभाव आहे.

काही काळ त्यांनी इंफाळ येथे हिंदीच्या प्रचाराचे कार्य केले. पुन्हा परत दिल्लीला आले. हिंदीशिवाय फ्रेंच, जर्मन, इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. १९७८ ते १९८० या काळात त्यांनी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अध्यापन केले. १९८२ ते १९९० या काळात टाईम्स ऑफ इंडियाच्या पाक्षिकात उपसंपादक म्हणून ते कार्य करीत होते. संडे मेल  या साप्ताहिकाचे संपादक पदही त्यांनी भुषविले आहे.

उदयप्रकाश यांचे प्रकाशित साहित्य –  काव्यसंग्रह –  सुनो कारागिर (१९८०), अबूतर कबूतर (१९८४), रात मे हार्मोनियम (१९९८), एक भाषा हुआ करती है (२००७); लघुकथा दरियाई घोडा (१९८२), तिरीच (१९९०), और अंत मे प्रार्थना (१९९४), पॉल गोमरा का स्कुटर (१९९७), पिली छत्री वाली लडकी (२००१), दत्तात्रय के दु:ख (२००२), मोहन दास (२००६), अरेबा परेबा (२००६).

गजानन माधव मुक्तिबोध, ऋत्विक घटक, निराला या साहित्यप्रभुतींनी त्यांच्या साहित्यातून दबलेल्या, उपेक्षित वर्गाच्या दु:खाला पाझर फोडला आहे. साधनांचे आणि संपत्तीचे विषम चित्र, या संपत्तीचे केंद्रानुवर्ती वितरण आणि त्यातून दारिद्र्याने पिळणारा सामान्य वर्ग ह्या दोन अक्षांवर या साहित्यकरांनी री ओढली आहे. उदयप्रकाश याच प्रवाहाचे प्रतिनिधित्व करतात. उदयप्रकाश हे किमान २५ वर्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. त्यामुळे त्यांच्या साहित्यकृतीवर साम्यवादाचा प्रभाव आहे. त्याच्या कवितांमधून एक राजकीय प्रवाह स्पष्टपणे परिलक्षित होतो. ज्यामध्ये भांडवलवाद, बाजारवाद या प्रवृत्तीचा विरोध आहे. त्यांच्या कथांमध्ये वेठबिगार या मजुरांचे शोषण करणार्‍या परंपरांवर प्रहार केलेले आढळतात. उदयप्रकाश यांचे अनुभवविश्व हे आदिवासी गावांपासून ते महानगरापर्यंत विस्तारलेले आहे. त्यामुळे या अनुभवविश्वात त्याच्या संवेदनशील मनाला खटकणार्‍या, त्यांच्या विचार प्रवृत्तीपेक्षा भिन्न असलेल्या बाबींचा त्यांनी त्यांच्या साहित्यातून सातत्याने विरोध केला आहे, ही बाब प्रकर्षाने प्रतीत होते.

संदर्भ : http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/uday_prakash.pdf