नगरकर, किरण : ( २ एप्रिल १९४२ – ५ सप्टेंबर २०१९ ). भारतीय इंग्रजी कादंबरीकार, नाटककार आणि पत्रकार. त्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. पुण्याचा फर्ग्यूसन महाविद्यालयातून पदवी तर मुंबईच्या एसआयइएस महाविद्यालयातून इंग्रजी विषयात पदव्यूत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यांचे कुटुंब ब्राम्हो समाजाची तत्वे मानणारे होते. १९७० च्या दशकात भारतीय इंग्रजी कादंबरीचा प्रवाह आटून जातो की काय असा एक टप्पा आला होता. परंतु सलमान रश्दींच्या मिडनाईट्स चिल्ड्रन  पासून भारतीय इंग्रजी कादंबरीने भरभराटीचा कालखंड अनुभवला आहे. या उत्तर–मिडनाईट्सचिल्ड्रन किंवा १९८० नंतरच्या कालखंडातील किरण नगरकर हे एक महत्वाचे भारतीय इंग्रजी कादंबरीकार आहेत. मुंबई शहराचे व्यामिश्र दर्शन आणि त्यायोगे आधुनिक कालखंडातील सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि नैतिक आवर्तनात अडखळणाऱ्या मानवी संवेदनांची सखोल चिकित्सा हा नगरकरांच्या कादंबरीचा स्थायीभाव आहे.

अशा प्रकारच्या चिकित्सेसाठी नगरकर निवेदनाची विविध तंत्रे आणि डार्क ह्युमरचा प्रभावीपणे वापर करतात. भारतीय सामाजिक जीवनाचे विविधांगी पैलू रेखाटतानाच नगरकर धर्मसंस्थांचीही परखड चिकित्सा करतात आणि त्याद्वारे त्यांच्या नायकांचा वैयक्तिक व सामाजिक पातळीवरील संघर्ष मांडतात. नगरकरांच्या कादंबऱ्यातून डोकावणारा हिंदू-ख्रिश्चन दृष्टीकोन हा एकूणच भारतीय साहित्यामध्ये अपवादाने आढळणारा आहे. नगरकरांची कादंबरी ही प्रामुख्याने भारतीय वाचकाला उद्देशून लिहिलेली कादंबरी आहे.

किरण नगरकरांची पहिली कादंबरी १९६७-६८ च्या सुमारास अभिरुची या नियतकालिकात प्रसिद्ध झाली होती. जाहिरात क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या नगरकरांनी एकूण सात कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांचे साहित्य पुढीलप्रमाणे : कादंबरी –  सात सक्कं त्रेचाळीस  (१९७६, मराठी), रावण अँड एडी (१९९५), ककल्ड (१९९७), गॉड्स लिटल सोल्जर (२००६), प्रतिस्पर्धी (२००८), दि एक्स्ट्रॉज (२०१२), रेस्ट इन पीस (२०१५), जसोदा (२०१७);  नाटक – बेडटाईम स्टोरी, कबीराचे करायचे काय आणि स्ट्रेंजर अमंग अस. 

मराठी साहित्यातील दिलीप चित्रे, अरुण कोलटकर आणि विलास सारंग यांच्या पिढीशी थेट नाते जोडणारे किरण नगरकर हेही एक द्विभाषिक लेखक आहेत. नगरकरांनी आपल्या साहित्यिक कारकीर्दीची सुरुवात ही सात सक्कं त्रेचाळीस  या मराठी कादंबरीपासून केली. विस्कळीत कथासूत्र, भाषांची सरमिसळ आणि डार्क ह्युमर ही या कादंबरीची प्रमुख वैशिष्ट्ये होत. आत्मविनाशाची वाट जाणीवपूर्वक निवडणारा नायक आणि त्याद्वारे घडणारे मृत्यू आणि वेदना यांचे विस्मयकारी दर्शन हे मराठी कादंबरीच्या कक्षा रुंदावणारे होते. कथावस्तू संकल्पनेची पुनर्मांडणी, वास्तववादाचे अनोखे दर्शन, भाषेचा अफलातून सजग वापर, विनोद, निवेदन तंत्र इत्यादी गोष्टींमुळे सात सक्कं  आजही मराठी साहित्यातील एक महत्त्वाची कादंबरी मानली जाते. १९८० साली या कादंबरीचा सेव्हन सिक्सेस आर फॉर्टी थ्री या शीर्षकाने इंग्रजीतून अनुवाद केला गेला.

सात सक्कं नंतर नगरकर नाटकाकडे वळले. आणीबाणीच्या संवेदनशील काळात त्यांना महाभारतातील कर्तुत्ववान व्यक्तींचा नाकर्तेपणा आणि टाळता येण्याजोगा नरसंहार यावरती भाष्य करावेसे वाटणे त्यांच्या लेखक धर्माला साजेसे होते. नाटकाचे नाव होते बेडटाईम  स्टोरी. परंतु नाटकाच्या नावापासूनच आक्षेप घेण्यास सुरुवात झाली. प्रक्षोभक भाषेसाठी सेन्सॉर बोर्डानेही तीव्र आक्षेप घेतले. या वेळी मे. पु. रेगें सारख्या समकालीन तत्वचिंतकाने मध्यस्थी करून नाटकाचा गर्भितार्थ सेन्सॉर बोर्डाला पटवून दिला. इतके होऊनही सेन्सॉरशिप अधिक प्रभावी ठरल्याने हे नाटक रंगमंचावर सादर होऊ शकले नाही. व्यथित झालेल्या नगरकरांची साहित्यिक कारकीर्द मराठीबाबतीत तरी संपून गेली. यानंतरचे आपले सर्व लिखाण नगरकरनी इंग्रजीतून केले आहे.

रावण अँड एडी (१९९५) ही त्यांची इंग्रजीतील पहिली कादंबरी. सात सक्कं त्रेचाळीस प्रमाणे याही कादंबरीचा अवकाश मुंबईमध्येच आकाराला येतो. द्विनायकी असणाऱ्या या कादंबरीमध्ये रावण पवार आणि एडी कौटिन्हो या नायकांच्या जन्मापासून त्यांच्या तारुण्यात पदार्पण करण्यापर्यंतचा कालखंड चितारला आहे. दोन भिन्न धर्मीय नायकांच्या जोडीने कादंबरीमध्ये आकाराला येते ते मुंबईतील चाळीचे वर्णन. ही खास नगरकरांची चाळ आहे. ती मराठी साहित्याने चितारलेल्या बहुसांस्कृतिक ऐक्याचे राग आळवत नाही, तर तिच्यातील नेमके विसंवादीपण अधोरेखीत करते. मुंबईच्या चाळीतील व्यामिश्र जीवन, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारतीय समाजजीवनाचे झपाट्याने होत चाललेले विघटन, धर्मसंस्थांचे धक्के, मुलतत्ववादी शक्तींचा उदय यावर ही कादंबरी तीव्र विनोदी शैलीतून भेदक भाष्य करते.

नगरकरांच्या दि एक्स्ट्रॉज  (२०१२) आणि रेस्ट इन पीस  (२०१५) या आणखी दोन कादंबऱ्या रावण आणि एडी या नायकांच्या आयुष्यातील पुढचे टप्पे चितारतात. दि एक्स्ट्रॉजमध्ये एकमेकांचे पक्के वैरी असणारे रावण आणि एडी अगतिकतेपोटी बॉलीवूडमध्ये एकत्र संघर्ष करताना दिसतात आणि सिनेनायक व्हायला निघालेले हे दोघेजण यशस्वी संगीतकार होताना दिसतात. मानवी जीवनातील अशा प्रकारच्या विसंगतीवर मार्मिक भाष्य करताना नगरकर ‘बॉलीवूड’ रूपकाचा वापर करताना दिसतात. रावण पवारच्या अपघाती कोसळण्यापासून सुरु होणारा रावण आणि एडीचा प्रवास रेस्ट इन पीस  या कादंबरीमध्ये संपताना दिसतो. दि एक्स्ट्रॉजमध्ये यशस्वी झालेले संगीतकार रेस्ट इन पीस  मध्ये रातोरात अपयशाचे धनी होतात आणि पुन्हा एकदा रावण आणि एडीमधील चाळीकडे त्यांचा प्रवास सुरु होतो. जगण्याच्या संघर्षामध्ये दोघेही मृतदेह वाहून नेण्याची एजन्सी सुरु करतात. अशा प्रकारे मानवी जीवनाचे अनेक पातळ्यांवरील ‘कोसळणे’  ही कादंबरी अधोरेखीत करते.

१९९७ साली प्रसिद्ध झालेल्या नगरकरांच्या ककल्ड  या कादंबरीचा घाट सर्वच अर्थानी निराळा आहे. रूढार्थाने ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. संत मीराबाईंच्या आयुष्यावर बेतलेल्या या कादंबरीचा नायक आहे भोज राज, मीरेचा पती. खरे तर, भोज राजाच्या अस्तित्वाबद्दल इतिहास मूक आहे. परंतु भोज राजाचे व्यक्तित्व साकारताना नगरकर या अवकाशाचा पुरेपूर वापर करताना दिसतात. कादंबरीतील भोज राजाच्या द्रष्टेपणातच त्याच्या शोकांतिकेची बीजे रोवलेली आहेत. राजपूत युद्धपरंपरेला नाकारत स्वतःचे व्यूह रचणारा भोज राज समाजव्यवस्थेकडून नाकारला जातो, सरंजामी दडपणाखाली लाथाडला जातो. भोज राजाचे हे सामाजिक स्तरावर येणारे वैफल्य त्याच्या वैवाहिक जीवनातील असफलतेमुळे अधिकच तीव्र बनते. मीरेची कृष्णाशी असणारी निष्ठा भोज राजाच्या मनात संशय उत्पन्न करते. नायक संशयाने पछाडतो, प्रत्यक्ष परमेश्वराला तो प्रतिस्पर्ध्याच्या रूपात पाहतो. सम्राटपदाचा सशक्त दावेदार असूनही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तो अपमान आणि आत्मक्लेश यांना सामोरे जात एका महान शोकांतिकेचा नायक बनतो. संत मीराबाई आणि भोज राज यांच्यातील नातेबंधाचा वेध नगरकर अगदी अनोख्या पद्धतीने घेतात. मध्ययुगीन भारताचा विशाल पट, सरंजामी कुटुंबव्यवस्थेतील ताणेबाणे आणि भारतीय युद्धनीतीबद्दलचे सखोल विवेचन कादंबरीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. ऐतिहासिक कादंबरी असूनही नगरकरांनी जाणीवपूर्वक केलेला समकालीन भाषेचा वापर कादंबरीला वर्तमान संदर्भाचे परिमाण बहाल करतो.

धर्मसंस्थांचे सातत्याने होत असलेले विघटन हा नगरकरांच्या चिंतनाचा प्रमुख सूर आहे जो त्यांनी त्यांच्या २००६ साली प्रसिद्ध झालेल्या गॉड्स लिट्ल सोल्जर  या कादंबरीमध्ये विस्ताराने मांडलेला आहे. वर वर पाहता दहशतवादाबद्दलची वाटणारी ही कादंबरी प्रत्यक्षात मानवी स्वभावातील अतिरेकीपणा आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा विदारक परिणाम याबद्दलचेही भाष्य करते. धर्मसंस्थांना आलेल्या बेगडी स्वरूपाचे नगरकर या कादंबरीमध्ये कठोरपणे विश्लेषण करताना दिसतात. कादंबरीचा नायक स्वत्त्वाचा शोध घेताना विविध धर्मांना सामोरा जातो. परंतु धर्म बदलले तरी अंतरंग काही बदलू शकत नाहीत. जगाच्या नकाशावरील विविध प्रांतातून स्थलांतरित होत, विविध धर्मसंप्रदायांना भिडत नायकाला “आयुष्य म्हणजेच परमेश्वर” अशी जी अनुभूती होते ती थेट मरणाच्या दारातच. यातून नगरकरांची धर्म, वंश, देश, भाषा, जात-पात यांच्याही पलीकडे जाणारी जीवननिष्ठाच अधोरेखीत होते.

नगरकरांच्या कादंबरीतील सर्वच स्त्री व्यक्तिरेखा या निडर आणि बंडखोर आहेत. २०१७ मध्ये प्रसिद्ध झालेली नगरकरांची जसोदा  ही कादंबरी नायिकाप्रधान आहे. राजस्थान आणि मुंबई या दोन अवकाशामध्ये ही कादंबरी उलगडत जाते. ककल्ड प्रमाणे इथेही सरंजामी समाजव्यवस्थेचे अंतरंग दिसून येत असले तरी जसोदा ही काही सरंजामी राजवटीचा भाग नाही. ती आहे कोणत्याही भूप्रदेशामध्ये आणि कालखंडामध्ये आढळणारी, कुटुंबासाठी ढोर कष्ट उपसणारी, दारिद्रयाने पिचलेली आणि तरीही आत्मसन्मानासाठी अविरत संघर्ष करणारी अस्सल नायिका. नगरकरांचे कथा सांगण्याचे कौशल्य आणि वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याची हातोटी याही कादंबरीमध्ये अनुभवयास मिळते.

नगरकरांच्या सात सक्कं त्रेचाळीसला १९७४ चा ह. ना. आपटे पुरस्कार, तर ककल्ड  या कादंबरीला २००१ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. नगरकरांच्या बहुतांश कादंबऱ्या या अनेक युरोपियन भाषांमधून अनुवादित झाल्या आहेत. जर्मन भाषेतून त्यांच्या सर्वच कादंबऱ्या अनुवादित झाल्या आहेत. २०११ साली जर्मनीतील सर्वोच्च मानल्या गेलेल्या ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्काराने, आणि २०१५ साली टाटा लिटरेचर लाइव्ह लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने  नगरकरांना सन्मानित करण्यात आले आहे.

मुंबई येथे अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.

संदर्भ  :

  • नगरकर, किरण, सात सक्कं त्रेचाळीस, मुंबई , १९७६.