मिल्कमॅन :  ॲना बर्न्स या उत्तर आयर्लंडमधील लेखिकेची २०१८ चा मॅन बुकर पुरस्कार प्राप्त झालेली इंग्रजी कादंबरी. फेबर अँड फेबर या प्रकाशन संस्थेने ही कादंबरी प्रकाशित केली आहे. प्रस्थापित चौकटींच्या पलीकडे जाऊन स्वतःचा असा एक स्वतंत्र आवाज उठवणारी; अनन्वित छळ, लैंगिक अतिक्रम व विद्रोहाचे व्यामिश्र संयोजन म्हणजे ही कादंबरी होय, असे मत या कादंबरीविषयी पुरस्कार समितीने मांडले आहे. बुकर पुरस्कार मिळालेल्या उत्तर आयर्लंडमधील ॲना बर्न्स ह्या पहिल्या लेखिका होत. अना बर्न्स यांचा जन्म १९६२ साली उत्तर आयर्लंड मधील बेलफास्ट या शहरातला. सध्या त्या ईस्ट ससेक्स येथे इंग्लंडमध्ये राहतात. ५८ वर्षांच्या असलेल्या ॲना बर्न्स यांची ही तिसरी कादंबरी. नो बोन्स (२००१) ही त्यांची पहिली कादंबरी. या कादंबरीत नॉर्थ आयर्लंडमधील राष्ट्रीय व वांशिक हिंसाचाराच्या काळाच्या पार्श्वभूमीवर बेलफेस्ट प्रदेशात घडणारी एका मुलीच्या वयात येण्याची मनाची पकड घेणारी कथा होती. त्यातील भाषेच्या वापराबद्दल त्यांचे खूप कौतुक झाले आणि त्या कादंबरीची तुलना महान कादंबरीकार जेम्स जॉईस यांच्या एका कादंबरीशी करण्यात आली. लिटल कन्स्ट्रक्शन्स (२००७) ही दुसरी कादंबरी. या कादंबरीत बंदुका, बलात्कार, कौटुंबिक व्यभिचार, हत्या आदींचे अतिवास्तववादी रेखाटन आहे. मोस्टली हिरो  ह्या लघुकादंबरीनंतर मिल्कमन  ही त्यांची कादंबरी प्रकाशित झाली.

१९६० ते १९९० दरम्यान आयर्लंड मुक्तीसंग्रामाच्या (या काळाला ट्रबल्स असेही म्हटले जाते) युद्धाच्या काळात बेलफास्टमधे मिल्कमन  ह्या कादंबरीचे कथानक घडते. इंग्लंड मधील प्रोटेस्टंट व आयर्लंडमधील कॅथलिक यांच्या मधील संघर्षाचा हा काळ. आयर्लंड हा इंग्लंडपेक्षा सांस्कृतिक दृष्ट्या वेगळा असून त्याची स्वायत्तता मागण्यासाठी बाराव्या शतकापासून संघर्ष सुरू असून तो १९९० पर्यंत सुरू होता. या पार्श्वभूमीवर ही कादंबरी आकाराला येते. उत्तर आयर्लंडच्या ह्या मुक्ती संग्रामाच्या धुमश्चक्रीच्या काळात स्त्रियांच्या मनोविश्वाचे दर्शनही ही कादंबरी घडवते. या कादंबरीतील शहराला नाव नाही, त्यातील पात्रांनाही नावे नाहीत. या अनामिक शहरात, लक्षवेधक, आकर्षक असणे धोकादायक आहे, अशी समजूत असलेली आणि सगळे लपवू पाहणारी मधली बहीण (मिडल सिस्टर) ही या कथेची नायिका आहे. घाटात्मक पातळीवर ती सोपी वाटत असली तरी त्यातील अपरिहार्यता, छोट्या समुदायांचे दबाव, कुचाळक्या, आणि लैंगिक शोषण आदींचा मर्मभेदक विनोदाद्वारे उत्कट आविष्कार या कादंबरीत झाला आहे. या कादंबऱीद्वारे न सांगितल्या गेलेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या सांगितल्या गेल्या आहेत. मिल्कमॅन ही अनिर्बंध राजसत्तेचा खरा चेहरा दर्शविणारी अशी डिस्टोपीअन कादंबरी आहे, पण ती नुसतीच गंभीर नाही. काहीशा विक्षिप्त विनोदाला त्यात स्थान आहे.

या कादंबरीची नायिका एक सोळा वर्षीय तरुणी आहे. तिला कुठले नाव दिले नसून मधली बहिण या नावाने तिला ओळखतात. मधली बहिण म्हणजे आपल्या पालकांच्या अकरा मुलांमधील एक अपत्य. उरलेली  इतर भावंड एकतर परागंदा झालेली किंवा निधन पावली आहेत. आपल्या विधवा आई सोबत व तीन बहिणी सोबत ती राहते. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे काम करता करता शिकण्यासाठी रात्रीच्या शाळेत जाण्याशिवाय पर्याय नाही. एक दिवस ४१ वर्षांचा निमलष्करी जवान, ज्याला कादंबरीत मिल्कमॅन असं म्हटलं आहे, तो पांढरी गाडी घेऊन रस्त्यात तिला भेटतो व आपल्या गाडीतून घरी सोडतो. तिथे त्याची तिची ओळख होते. तिला आधीपासूनच एक प्रियकर आहे मात्र मिल्कमॅन तिच्याशी सलगी करण्‍याचा प्रयत्न करतो. तो तिच्या प्रियकराला मारण्याची धमकी देतो. तिच्या व मिल्कमॅनच्या संबंधामुळे तिला कायम भीतीच्या सावटाखाली जगावे लागते. या संबंधांमुळेच तिचा समाज तिला वाळीत टाकणार असं तिला समजतं. एक दिवस ती आपल्या प्रियकराला भेटायला जाते व तिला समजतं की त्याचे त्याच्या मित्रा बरोबर संबंध आहेत. तिला वाईट वाटतं. ती परत फिरते. वाटेत मिल्कमॅन परत भेटतो व दुसऱ्या दिवशी तिला भेटणार असे सांगतो. दुसऱ्या दिवशी तिला असं समजतं की सरकारी कर्मचाऱ्यांनी मिल्कमॅनला मारलं आहे. त्यानंतर तिच्यावरही  हल्ला होतो. तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या कुणी तरी हा हल्ला केलेला असतो. त्यातून ती स्वतःचा बचाव करते. कादंबरीच्या शेवटी ती सामान्य जीवन जगत आहे असे दाखवले आहे.

१९७० च्या कालखंडात अनामिक देशात कादंबरी घडते. लेखिका बेलफास्टच्या रहिवासी असल्याने साहजिकच त्याचे संदर्भ कथेत येतात. आयरिश रिव्हॉल्युशन आर्मीसहित अन्य संघटना व त्यांचे हेतू, त्यातला लोकसहभाग, सरकारविरुद्धचा एल्गार हे सगळं मांडत असताना दरम्यानच्या काळात केवळ किवदंती व अफवांचा आधार घेत लैंगिक अत्याचार कसे पार पाडले जातात यावर लेखिका भाष्य करते. प्रत्यक्ष अत्याचार होत असताना दोनच मानवी भूमिका राहतात, शोषक आणि पिडीत, हे त्या अधोरेखित करतात. सरकारविरुद्ध मांडलेली कोणतीही भूमिका गैरच हा जो काही दृष्टीकोन सरकारचे समर्थक मांडतात त्याला लेखिका प्रखर शब्दात झोडपून काढतात. कादंबरीत जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष चितारला गेला आहे. राजरोस पडणारे मुडदे, दडपशाही, सरकारी दमण शोषण आणि त्या आडून चालणारा सत्ताभोग व त्याला होणारा विरोध हा कादंबरीतून प्रभावीपणे डोकावतो.

गार्डियन वृत्तपत्रातील या कादंबरीच्या परिक्षणात, कादंबरीतील निवेदिका व कादंबरी दोन्हीही स्वतंत्र धाटणीची, मिश्कील विनोदांची पेरणी असलेली,  निसंकोचपणे तिरकस आणि विलक्षण आहे असे मत व्यक्त करण्यात आले आहे.  ही कादंबरी केवळ उत्तर आयर्लंड मधील धुमश्‍चक्रीचे वर्णन करत नसून एकूणच राजकीय उलथापालथीच्या काळातील ताणतणावात जगणाऱ्या समाजाचा वैश्विक अनुभव चित्रित करते. भीतीच्या सावटाखाली कायम राहणाऱ्या समाजातील मानसिक परिणामांवर भाष्य करणारी ही कादंबरी आहे. दोन राष्ट्र किंवा संप्रदायामधील विकोपाला गेलेल्या संघर्षातून स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रखर चित्रण ही कादंबरी करते.

गतिमानता आणि प्रवाहीता (स्ट्रिम ऑफ कॉन्शसनेस) या निवेदन शैलीचा वापर या कादंबरीत लेखिकेने केला आहे. लक्ष वेधणे ही बाब भलेही आकर्षक असेल मात्र लक्ष वेधणे ही बाब तितकीच धोकादायक आहे हा भाव या कादंबरीतील एक महत्वाचा भाव आहे. अत्यंत विखारी विनोदाने भरलेली व समाजाचे बहुरंगी चित्रण करणारी कादंबरी असे वर्णन द टेलिग्राफ  या वृत्तपत्राने या कादंबरीसंदर्भात केले आहे.

संदर्भ :

• https://sameerbapu.blogspot.com/2018/12/blog-post_8.html?m=1

• https://thebookerprizes.com/news/anna-burns-wins-50th-man-booker-prize-milkman

• https://www.supersummary.com/milkman/summary/

• महाराष्ट्र टाइम्स गणेश मतकरी यांचा १९ ऑगस्ट २०१८चा लेख. https://www.google.com/amp/s/maharashtratimes.com/editorial/samwad/booker-books-2018.