हरिप्रसाद गोरखा राय  :  (१५ जुलै १९२४ – १४ नोव्हेंबर २००५ ). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध नेपाळी साहित्यिक. नागालँड राज्यातील कोहिमा हे त्यांचे जन्मस्थान. त्यांना हिंदी, इंग्लिश, ओडिया, नेपाली भाषेचे ज्ञान होते. वयाच्या आठव्या वर्षीच त्यांच्या वडिलांनी त्यांना रामायण महाभारत सांगितले. त्याचबरोबर देवनागरी आणि आसामी लिपी शिकविणे सुरु केले.

नागा हिल्स येथील मिडल इंग्लिश स्कुलमधील शिक्षण १९३० ला पूर्ण केले. त्यांनी सगळ्या विषयात ८० टक्क्याहून अधिक मार्क घेऊन प्रथम श्रेणी मिळविली. पशुपती संघ (१९२९) आणि तरुण संघ (१९३०) या दोन प्रमुख साहित्य संघटनांशी ते दीर्घकाळ संबंधित होते.  एक शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. गुवाहाटी व कटक येथील ऑल इंडिया रेडिओ मध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले. आमची जन्मभूमी कोहिमा सगळ्या जमिनीची राणी आहे, आमचे राष्ट्र आहे मानव, आम्ही सर्व जागतिक मित्र आहोत हा संदेश देशवासियांप्रती ज्या भावना दर्शवितात, त्यावरून त्यांचे मातृभूमीचे प्रेम व वैश्विक बंधुत्वाची भावना प्रभावित करते. माझ्या साहित्याला प्रेरणा देणारे घटक म्हणजे माझे वडील, माझी आई, माझे घर, माझे शिक्षक, ज्यांना मी धर्मगुरु मानतो हे आहेत, असे हरिप्रसाद गोरखराय यांनी म्हटले आहे.

कविता, लघुकथा, दीर्घकथा, कादंबरी, निबंध, प्रवासवर्णन, रेडिओसाठी एकपात्री नाटक (एकांकिका) आदी वाङ्मय प्रकारात त्यांनी लेखन आहे. त्यांचे साहित्य हिमाद्री गोरखा सेवक दिवालो, गोरखा, भारती, कथा धरती, उलानं  इ. नेपाळी नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहे. हरिप्रसाद गोरखा राय यांची साहित्यसंपदा : काव्यसंग्रहबाबरी  (१९७४), नागा हिल्स तोसोवई (१९३३), मन चरिको बोली  (मनातील आवाज,१९७८) ; लघुकथा संग्रह- यहम बदनम हुनचो (मै यहाँ बदनाम हूँ,१९७४), मदन (१९८५), मेरी इति नागा हुकी (माझा एक नागा मित्र); एकांकिका –  एक तुकारा रोटी (१९३६), कृष्ण जनम (१९३६), जनन जन्मभूमी (१९५७), नाटक –  पुरुष सिवंदर (१९३६), जोमोलार्जून (१३३६), कृष्ण जनम (१३३६), सत्यवान सावित्री (१३३६), शिव पारबती , पीर साहब की कोई डायरी ,संतावना, बैक पासबुक, दिन रा राते ; कादंबरी- हेमाद्री ; दिर्घकथा कांची भाईया  (१९३२),  तुराको  स्मृती (१९३६), नेपालिको माया (१९३६),  दुखमई इतिहास (१९३९), नारी को  मन (१९३९), भानुपो सकीना (१९४०),मेरी अपरिचित साथी (१९४४); प्रवासवर्णनपरसुम यात्रा (१९३०), आसाम को चेऊकुना (१९३१), ओरिसाको हेरणू पारने थोन होरु (१९६१) इ. लोकगीत आणि लोककथा संबंधीही त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. आसामी समुह लोकगीत व लोककथा या नेपाळी भाषेत अर्थासहित प्रसिद्ध केलेल्या आहेत. माऊदे तसेच उत्तरांचल अनुष्ठान हा नेपाळी भाषेतील लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम त्यांनी सुरू केला.

त्यांच्या कवितांतून स्वच्छंदवादी, देशभक्ती, उपहासात्मक काव्यदृष्टीचा प्रत्यय येतो. सांस्कृतिक व्यंगाबरोबरच राजनैतिक व्यंगही त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. त्यांच्या काही कविता गीतात्म शैलीत प्रकट झालेल्या आहेत. मेरे सपने में आणि सुंदर दुनिया ही दोन गीते मनचेरी को बोली या काव्यसंग्रहातील सर्वात प्रभावशाली मानली जातात. रॉय यांच्या बहुतेक लघुकथा या आसामी सामाजिक व सांस्कृतिक जीवन यापासून प्रभावित झालेल्या आहेत. दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये झालेल्या कोहिमाचा विनाश या गोष्टींचा त्यांच्या लेखनावर परिणाम झालेला दिसतो. नागालँड येथील प्राकृतिक सौंदर्य पर्यावरण, नेपाळी लोकजीवन, तेथील सामाजिक आर्थिक वास्तव हरिप्रसाद  गोरखा राय यांच्या लघुकथांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरतो.

त्यांच्या साहित्यिक कार्याबद्दल त्यांना वातोनव प्रमाणपत्र (१९४४), असोम साहित्य सभा गौरव (१९७५), जगदम्बा श्री पुरस्कार,नेपाळ (१९९६), पुलचंद खाडेल संघटी बारस पुरस्कार (१९९९),कलिम्पोग नेपाळी साहित्य विशेष समिती तर्फे पारसमणि पुरस्कार (२०००) इत्यादी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

संदर्भ : http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/hariprasad_gorkha_rai.pdf