जोगिंदर पाल : (५ सप्टेंबर १९२५ – २३ एप्रिल २०१६). प्रसिद्ध भारतीय उर्दू लेखक. लघुकथा आणि कादंबरीकार म्हणून प्रमुख ओळख. जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे. त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. त्यामुळे शिक्षण घेत असताना अडचणी आल्या. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब १९४७ साली भारतात पंजाबमधील अंबाला येथे स्थायिक झाले. काही काळ त्यांनी वडिलांच्या दुधाच्या व्यवसायात त्यांना मदत केली. त्यांना परिस्थितीशी बराच संघर्ष करावा लागला. भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि भारताची फाळणी या घटनांचा त्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला.

त्यांची मातृभाषा पंजाबी होती. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उर्दूतून झाले. कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे आणि इच्छेमुळे त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. भारतीय स्वातंत्र्य चळवळ, फाळणी आणि तत्कालीन वातावरणात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी १९४९ साली केनिया देशाच्या शिक्षणखात्यात त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. त्यांना भारतात परतण्याची तीव्र इच्छा होई; परंतु केनियात मिळत असणाऱ्या रोजगारामुळे ते भारतात परतु शकले नाहीत. केनियात राहत असताना तेथील आफ्रिकन जंगल, तेथील समाजात असणाऱ्या अंधश्रध्दा, रुढी, परंपरा, वसाहतवाद, पर्यावरणाची होणारी हानी, जंगलतोड, अवैध शिकार व आफ्रिकन मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्तीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. या सर्व अनुभवांचे प्रतिबिंब त्यांच्या लघुकथांमध्ये उमटले आहे. आफ्रिकेतील हराम्य या लोककथा मिथकांचा त्यांनी अभ्यास केला व त्यांचे संकलन केले. पुढे १९६४ साली जोगिंदर पाल भारतात पूर्ण वेळ लेखन कार्य करण्यासाठी परतले.औरंगाबाद येथील महाविद्यालयात त्यांना प्राचार्य पदी नेमणूक मिळाली. त्यानंतर १९७८ साली ते दिल्लीत स्थायिक झाले.

जोगिंदर पाल यांची पहिली लघुकथा “त्याग से पहले” शहीद अहमद देहलवी संपादित करीत असलेल्या साकी  या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. जोगिंदर पाल यांचे लेखनकार्य :  लघुकथासंग्रहधरती का काल (१९६१),मै क्यो सोचूं (१९६८), मट्टी का इद्रक (१९७०), लकन लखनौ (१९७७), बे मुहावरा (१९७८),बे इरादा (१९८१), खुलता (१९८९); कथा – सिलवटे (१९७५),कथा नगर (१९८६),परिंदे (२०००); कादंबरी – एक बुंद लहु की (१९६३),अमादो रक्त (१९७५),बयानात (१९७५),नादीद (१९८३); समीक्षा – राबता (१९९७), बे एस्तेलाह (१९९८) इत्यादी.

जोगिंदर पाल यांची मातृभाषा पंजाबी होती, त्यांचे शिक्षण हे मुख्य इंग्रजी भाषेमधून झाले; मात्र लेखन त्यांनी उर्दू भाषेतून केले आहे. त्यांच्या लघुकथा ह्या भारतीय समाजजीवन आणि आफ्रिकेतील समाजजीवनाचा अन्वयार्थ प्रकट करतात. जे जे अनुभव त्यांच्या वाट्याला आले ते ते अनुभव त्यांनी जीवंतपणे आपल्या कथांतील पात्रांमधून उभे केले. आयुष्यातील तरुण वयात फाळणीमुळे झालेले स्थलांतर आणि उमेदीच्या काळात देश सोडून परदेशात केलेले वास्तव्य यामुळे त्यांच्या आयुष्यात आलेली नैराश्याची भावना व अपयशाची भावना या सर्वांतून मुक्त होण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नातूनच त्यांना लेखन प्रेरणा मिळाली. स्थलांतरामुळे आलेल्या परात्मतेचे, नैराश्यमय भाव भावनांचे पडसाद त्यांच्या कथांमधून व कथेतील पात्रांमधून उमटले आहेत. त्यांच्या मते भाषा ही सर्जनशिलतेलाकधीच अडसर ठरु शकत नाही, त्यांनी त्यांच्या समकाळात ज्या वेळी उर्दू भाषा केवळ काव्यासाठी वापरली जात होती त्यावेळी उर्दू भाषेतून लघूकथा लिहून त्या कथांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.

पूर्णवेळ लेखन कार्य करण्यासाठी केनिया येथील शिक्षकी पेशातून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. नंतर त्यांनी पाकिस्तानला भेट दिली. लाहोर आणि कराची येथील अनुभवांवर त्यांनी यात्रा पाकिस्तान हे पुस्तक लिहिले (१९८७). १९८८ साली त्यांनी आफ्रो  एशियन लेखकांच्या परिसंवादामध्ये लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी सहभाग नोंदविला. मास्को आणि ट्युनेशिया येथे साहित्य महोत्सवात निमंत्रित म्हणून उपस्थिती नोंदविली.

त्यांचे साहित्यिक योगदान लक्षात घेवून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. गालिब पुरस्कार (१९८३), शिरोमणी साहित्यकार पुरस्कार (१९९१), अखिल भारतीय बहादूर शहा जफर पुरस्कार (१९९६), उर्दू अदब पुरस्कार (१९९९), इक्बाल सन्मान (१९९९) इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.

नवी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/joginder_paul.pdf