पृथ्वीच्या विषुववृत्तापासून दक्षिणेस २३° ३०’ एवढ्या कोनीय अंतरावर व त्यास समांतर असलेल्या काल्पनिक रेषेला म्हणजे अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणतात. मकरवृत्ताचे अक्षांश सुमारे २३° २७’ दक्षिण असेही मानले जाते. दक्षिण गोलार्धात हिवाळी किंवा डिसेंबर अयनदिनी म्हणजे २२ डिसेंबर रोजी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे कललेला असतो. त्या वेळी सूर्य मकरवृत्तावर खस्वस्तिकी (थेट माथ्यावर) आलेला असतो. त्या दिवशी तेथे सूर्यकिरणे लंबरूप पडतात. मकरवृत्त ही सूर्याच्या दक्षिणायणाची कमाल मर्यादा असून पृथ्वीवरील उष्णकटिबंधाची ती दक्षिण सीमा आहे. मकरवृत्ताच्या दक्षिणेस सूर्यकिरणे कायमच तिरपी पडतात. या वेळी सूर्य धनू राशीच्या तारकासमूहांत असतो व त्याच्या क्रांतिवृत्तावरील सर्वांत दक्षिणेकडील क्रांती असलेल्या ठिकाणी पोहोचलेला असतो; परंतु सुमारे २,००० वर्षांपूर्वी जेव्हा तारकासमूहांना नावे देण्यात आली, तेव्हा दक्षिण अयनदिनी किंवा दक्षिण संस्तंभाच्या वेळी सूर्य मकर राशीच्या तारकासमूहांत दिसत होता. त्यामुळे या वृत्ताला मकरवृत्त हे नाव देण्यात आले. पृथ्वीच्या भ्रमणाक्षाची दिशा सावकाशपणे बदलत असल्याने सुमारे २४,००० वर्षांनंतर सूर्य पुन्हा मकर राशीच्या तारकासमूहांत दिसेल.
पृथ्वीचे मकरवृत्त हे दक्षिण अमेरिकेतील चिली, अर्जेंटिना, पॅराग्वाय व ब्राझील; आफ्रिकेतील नामिबिया, बोट्स्वाना, दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक, मोझँबिक व मादागास्कर आणि ऑस्ट्रेलियाचा साधारण मध्यभागातून गेल्याचे दिसते.
कॅप्रिकॉर्न (Capricorn) हा शब्द लॅटिन कॅपर (Caper) म्हणजे बोकड (Goat) आणि कोर्न (Cornu) म्हणजे शिंग (Horn) या शब्दांवरून आलेला असून त्याद्वारे मकर राशीच्या तारकासमूहांतील ताऱ्यांचा उल्लेख करतात. खगोलावरील याच्याशी तुल्य वृत्तालाही मकरवृत्त म्हणतात. खगोलीय विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील २३° ३०’ एवढी क्रांती असलेले बिंदू खगोलीय मकरवृत्तावर येतात व ही सूर्याची सर्वाधिक दक्षिण क्रांती आहे.
समीक्षक : वसंत चौधरी