दुसऱ्या महायुद्धानंतर क्यूबात घडलेली महत्त्वाची क्रांती. ३१ डिसेंबर १९५८ रोजी क्यूबाचे त्यावेळचे हुकूमशहा बातीस्ता यांनी देशांतर केले, बातीस्ता राजवट कोसळून पडली व नवीन वर्षारंभापासून क्यूबामध्ये क्रांतिकारक राजवट अस्तित्वात आली. फिडेल कास्ट्रो (१९२६—२०१६) हे या क्रांतीचे प्रमुख नेते होते.

क्यूबन क्रांतीचा प्रमुख नेता फिडेल कास्ट्रो.

फ्रेंच व अमेरिकन या लोकशाही राजक्रांत्यांप्रमाणे अथवा रशियन आणि चिनी या साम्यवादी क्रांत्यांप्रमाणेच क्यूबाची क्रांती, ही लॅटिन अमेरिकेच्या इतिहासाला नवीन वळण लावणारी युगप्रवर्तक घटना आहे. या क्रांतीने लॅटिन अमेरिकेत पहिली आणि एकमेव साम्यवादी सत्ता अस्तित्वात आली. तरीही ती साम्यवादी नेतृत्वाखाली अथवा पक्षाने घडवून आणलेली क्रांती नव्हती. या क्रांतीचा विजय हा जवळजवळ फिडेल कास्ट्रो यांचा वैयक्तिक विजय म्हणावा लागेल. ही राष्ट्रीय भांडवलदारांची, शेतकऱ्यांची आणि कामगारांची क्रांती नव्हती. मात्र या प्रत्येक वर्गाच्या जीवनात कास्ट्रोच्या क्रांतिकारक शासनाने संपूर्ण परिवर्तन घडवून आणले. ही क्रांती गनिमी तंत्राने झाली, यामुळे प्रत्यक्ष लढाईत रक्तपात अथवा प्राणहानी फार झाली नाही. कास्ट्रोच्या बंडखोर सैन्याचे संख्याबळ एक हजारापेक्षा अधिक नव्हते. क्यूबाची जमीनधारणा पद्धतही भांडवलशाही स्वरूपाची होती, पण सरंजामशाही अस्तित्वात नव्हती. जमीनदार व शहरी भांडवलदार यांचे घनिष्ठ संबंध होते आणि भांडवलदारांचा क्रांतिपूर्व शासनावर विशेष प्रभाव होता. सामाजिक व राजकीय संस्थाचे स्वरूपही भांडवलशाहीच होते. बाह्य शक्तींचेही क्यूबाच्या एकूण समाजजीवनावर विशेष वर्चस्व नव्हते. कामगारवर्गाने बातीस्ताविरोधी लढ्यात विशेष भाग घेतला नाही. यामुळे या क्रांतीत कामगारवर्गाचे विशेष असे स्थान नव्हते. छोट्या शेतकऱ्‍यांनी बड्या जमीनदारांविरुद्ध केलेले बंड असेही या क्रांतीचे स्वरूप नव्हते. म्हणून तिला शेतकरी क्रांती म्हणणेही योग्य ठरणार नाही.

क्रांतीचे घोषित उद्देश दोन होते : एक प्रातिनिधिक शासनपद्धतीची पुनःस्थापना आणि १९४० च्या संविधानाचे पुनरुज्जीवन. फिडेल कास्ट्रो व त्याच्या सहकारी क्रांतिकारकांना जो विजय मिळाला, तो मुख्यतः नैतिक विजय होता. बातीस्ता शासन भ्रष्टाचाराने आणि अत्याचाराने इतके सडले होते, की कास्ट्रोच्या छोट्या परंतु निश्चयी प्रतिकारापुढे ते टिकले नाही. सैन्यातही भ्रष्टाचार व कारस्थाने होती. त्यामुळे त्याचे नैतिक धैर्य नष्ट झाले होते.

कास्ट्रो हा विरोध करणारा पहिला नेता नव्हता. दुसरेही गट या अगोदरच बातीस्ताविरोधी लढ्यात उतरले होते. पहिला लढा विद्यार्थ्यांनी दिला. बातीस्ताने लष्करी कारस्थान करून १९५२ मध्ये सत्ता काबीज केली, तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी निदर्शने करून जनतेला बातीस्ताविरोधी लढ्याची हाक दिली. विद्यार्थ्यांच्या पोलिसांशी चकमकी झाल्या आणि अनेक गुप्त संघटना अस्तित्वात येऊ लागल्या. माजी मंत्री आरागो याच्या नेतृत्वाखाली एक, आणि माजी राष्ट्राध्यक्ष कार्लोस प्रायो सोकारास याच्या नेतृत्वाखाली एक, असे दोन बेकायदेशीर गट स्थापन झाले. गार्सीआ बार्सीना याने सरकारविरुद्ध १९५३ मध्ये एक अयशस्वी उठाव केला.

दुसरेही विरोधी गट होते आणि त्यांचे क्रांतिकारक उठाव होत होते, परंतु त्यांना यश मिळत नव्हते. या गटांत परस्परसहकार्य नव्हते. शिवाय त्यांना निश्चित अशी विचारप्रणाली नव्हती. त्यामुळे बातीस्ताविरोधी सशस्त्र बंड करण्याची त्यांची योजना फिसकटली व त्याचा सरकारला मागमूस लागला. अन्य विरोधी पक्ष व गट यांच्यातील हा गोंधळ, ऐक्याचा व सुसूत्र योजनेचा अभाव, निश्चित धोरण व विचारप्रणाली घडविण्यात त्यांना आलेले अपयश यांमुळे कास्ट्रोला आपल्या नेतृत्त्वाचे श्रेष्ठत्व स्थापन करता आले.

कास्ट्रोने आपली क्रांतिकारक मोहीम २५ जुलै १९५३ रोजी सुरू केली. सांत्यागो दे कूव्हा येथील लष्करी छावणीवर हल्ला करून तेथील शस्त्रास्त्रे काबीज करावयाची व मग त्याच्या साहाय्याने सत्ताकेंद्रे ताब्यात घ्यावयाची, अशी ती योजना होती. कास्ट्रोच्या या पहिल्या क्रांतिकारक हल्ल्यात फक्त १६० तरुण सामील झाले. हा हल्ला अयशस्वी झाला. बरेचसे तरुण मारले गेले वा जखमी झाले. खुद्द कास्ट्रोला पंधरा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

या क्रांतिकारक उठावाच्या काळात कास्ट्रोने दोन ऐतिहासिक दस्तऐवज तयार केले. हे महत्त्वाचे दस्तऐवज म्हणजे या उठावाचा जाहीरनामा होता. त्यात अशी घोषणा होती की, या क्रांतीतून क्यूबाचे संपूर्ण शुद्धीकरण होईल आणि सर्व जनतेला स्वातंत्र्य व सुबत्ता प्राप्त होईल. साखर व काही प्रमाणात तंबाखू या पिकांवर अवलंबून असणाऱ्‍या अर्थव्यवस्थेत परिवर्तन करून औद्योगिकीकरणाने तिला बहूद्देशी बनविणे, नियोजित अर्थव्यवस्था अंमलात आणणे हाही क्रांतीचा एक उद्देश होता. या जाहीरनाम्याशिवाय कास्ट्रोने स्वतःच्या बचावाचा म्हणून ‘इतिहास मला निर्दोष ठरवील’ (हिस्टरी वुईल ॲबसॉल्व्ह मी)  हा प्रबंध लिहिला. फिडेलचे तत्त्वज्ञान ग्रथित करणारा हा दस्तऐवज क्रांतीच्या प्रचारास विशेष उपयोगी पडला. मार्च १९५५ मध्ये बातीस्ताने सर्वक्षमा जाहीर केली, त्यावेळी फिडेलचीही तुरुंगातून सुटका झाली.

हाव्हॅना शहरातील निषेध फेरीत सहभागी विद्यार्थी (१९५६).

१९५६ मध्ये कास्ट्रोने ‘२६ जुलै चळवळ’ ही संघटना स्थापन केली. मेक्सिकोत जाऊन त्याने काही तरुण सहकारी मिळविले आणि निधी गोळा केला. या सहकाऱ्‍यांत अर्नेस्ट गेव्हारा हाही होता. वर्षाच्या अखेरीस कास्ट्रोने पुन्हा एक क्रांतिकारक उठाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ‘ग्रॅनमा’ नावाच्या बोटीतून आपल्या ८१ सहकाऱ्‍यांसह क्यूबाच्या दक्षिण-पूर्व किनाऱ्‍यावर शस्त्रास्त्रांसह उतरावयाचे व त्याच वेळी अन्यत्र उठाव घडवून आणावयाचे, असा त्याचा डाव होता. परंतु सरकारला त्याची माहिती मिळाली व कास्ट्रोबरोबर असलेले बहुतेक सहकारी पकडले गेले. अन्यत्र उठाव विशेष झालेच नाहीत. स्वतः फिडेल मात्र यावेळी राऊल कास्ट्रो आणि चे गेव्हारा यांच्यासह निसटून सिएरा माएस्ट्राच्या डोंगरी जंगलप्रदेशात गेला. तेथे त्याने गनिमी लढ्याची संघटना मजबूत केली व अखेरचा यशस्वी हल्ला करून सत्ता काबीज केली.

१९५८ सालात सर्वत्र घातपाताचे प्रकार होत होते, त्यामुळे पोलिसांचे अत्याचार वाढले होते. एप्रिलमध्ये कास्ट्रोने सार्वत्रिक संपाचा आदेश दिला, परंतु त्याला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. नोव्हेंबर १९५८ मध्ये बातीस्ताने सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. पण कास्ट्रोने त्यावर बहिष्कार घालण्याचा आदेश दिला. जे निवडणुकीला उभे राहतील, त्यांना ठार मारण्याची व मतदान करतील त्यांना कडक शासन करण्याची धमकी दिली. अमेरिकेने काळजीवाहू सरकार स्थापन करून नव्याने निवडणुका व्हाव्यात असा प्रयत्न केला, पण तोही फसला. यावेळी कास्ट्रोच्या सैन्याच्या तुकड्या अन्य प्रांतांत शिरल्या होत्या. बातीस्ताने निर्वाणीचा लढा देण्याचे ठरविले, परंतु त्याचे सैन्य शरण गेले अथवा पळून गेले. तो स्वतः ३१ डिसेंबरला देश सोडून गेला. १ जानेवारीला गेव्हाराने हाव्हॅनात प्रवेश केला. कास्ट्रोची क्रांती यशस्वी झाली होती.

प्रवाहपतितत्व, भ्रष्टाचार, अकुशलता हे शासकीय कारभारातील ठळक दोष होते. नोकरशाही अकार्यक्षम होती, संसद कृत्रिमपणे तयार केलेली अंदाजपत्रके मंजूर करीत होती, हिशोबतपासणी नव्हती व नियंत्रणही नव्हते. शासनाच्या अकार्यक्षमतेमुळे क्यूबाच्या अनेक संधी व्यर्थ जात होत्या. डॉ. रूमनग्राऊ हे जहाल विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आणि साध्या राहणीचे पुरस्कर्ते समाजवादी म्हणून राष्ट्राध्यक्षपदावर निवडून आले होते; पण त्यांच्याही राजवटीत विलासी हॉटेले, जुगाराचे अड्डे, नाइट क्लब्ज, आलिशान निवासस्थाने यांचीच वाढ झाली. शासन कोणाचेही असले, तरी अमर्याद भ्रष्टाचार आणि राज्यकर्त्यांची विलासी उधळपट्टी हे स्थायी गुण होते. त्यामुळे तरुण वर्गांत राजकीय पुढारी व भौतिकतावादी यांच्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला. फिडेल कास्ट्रो अशा तरुणांपैकीच होता.

कास्ट्रो हा जहाल, साम्राज्यशाहीविरोधी आणि राष्ट्रवादी होता. सर्व पददलित, शोषित आणि गरीब जनतेचे आपणच प्रतिनिधी आहोत, असे तो समजत असे. जुलूम, सामाजिक अन्याय आणि भ्रष्टाचार यांपासून मुक्त असा नवीन क्यूबा निर्माण करण्याच्या दुर्दम्य महत्त्वाकांक्षेने तो प्रेरित झालेला होता. कोणत्याही प्रकारचा संधिसाधूपणा आणि तडजोड त्याला सर्वथा मान्य नव्हती. बंडखोरांच्या लहान गटाने प्रत्यक्ष प्रतिकार करावा आणि त्यातून मोठ्या शहरांतून क्रांतीचा वणवा पेटविला जावा, मात्र तसे न झाले तरी बंडखोरांनी स्वतःच्या शक्तीवर क्रांती यशस्वी करावी, ही त्याने आपली क्रांतीची पद्धत निश्चित केली होती. याच मार्गाने तो खंबीरपणे पुढे गेला आणि यशस्वी झाला.

आपल्या क्रांतीबद्दल तो म्हणतो, की पंचाण्णव टक्के लोकांचा पाठिंबा मिळालेली ही इतिहासातील पहिलीच क्रांती होय. आतापर्यंतच्या सर्व क्रांत्या या क्रांतिकारक अल्पसंख्यांकांनी घडवून आणल्या आणि सामाजिक परिवर्तन घडून आणण्यासाठी त्यांना बळाचा प्रयोग करावा लागला. आम्हाला तसे करायचे नाही. व्यक्तीच्या प्रतिष्ठेला संपूर्ण मान्यता, मानवी स्वातंत्र्य आणि हक्क यांची मान्यता हा आमच्या कार्यपद्धतीचा मूलाधार आहे, असा कास्ट्रोचा दावा होता.

आपली क्रांती ही खास क्यूबन क्रांती आहे, असे कास्ट्रो म्हणतो. क्यूबाच्या ताडमाडाच्या झाडांइतकीच ती क्यूबाच्या जमिनीतून पैदा झाली आहे. पश्चिमी भांडवलशाहीने स्वातंत्र्य दिले, पण भाकरी दिली नाही. पूर्व यूरोपीय समाजवादाने भाकरी दिली, पण स्वातंत्र्य दिले नाही. क्यूबाची क्रांती जनतेला भाकरी आणि स्वातंत्र्य दोन्ही देईल. भांडवलशाही किंवा समाजवाद यांत पर्याय नाही. क्रांती किंवा क्रांतिद्रोह यांच्यात पर्याय नाही. आम्ही प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारला तो साम्राज्यशाही विरोधाचा, सामाजिक क्रांतीचा, ही संक्षेपाने कास्ट्रोची भूमिका आहे.

या क्रांतीने काय साध्य केले? खर्चाची वा आर्थिक परिणामाची पर्वा न करता अत्यंत गरीब वर्गाच्या जीवनात सुधारणा घडवून आणल्या. ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या, त्यांच्यासाठी घरे, शाळा, रस्ते व इस्पितळे बांधली. सारा रहित झाला. शहरांतील कामगारांचे पगार वाढले आणि घरभाडी व बाजारभाव कमी झाले. क्यूबातील गरीब माणसाला आता एक नवी प्रतिष्ठा प्राप्त झाली, नवे जीवन लाभले, तरुणवर्गात नवीन उत्साह निर्माण झाला आणि शेतीसुधारणा व जमिनीचे सामूहीकरण झाले. सर्व कारखान्यांचे, सर्व व्यापाराचे राष्ट्रीयीकरण झाले. शिक्षणाचा प्रसार झाला. निरक्षरतेचे निर्मूलन करण्यात आले. शिक्षकांचे पगार वाढले. फी व शिक्षणाचा खर्च सरकार देत असल्यामुळे कोणत्याही मुलाला अथवा मुलीला शिक्षण सहज प्राप्त झाले. मात्र शेती उत्पादनात विविधता आणणे आणि औद्योगिकीकरण झपाट्याने घडवून आणणे, हे दोन्ही उद्देश मागे पडले. अमेरिकेतील अवलंबित्व संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात रशिया आणि अन्य समाजवादी देशांवर आर्थिक अवलंबित्व आले. कास्ट्रोच्या क्रांतिकारकांना नवी अर्थव्यवस्था निर्माण करता आली नाही.

कास्ट्रोमध्ये वर्णभावनेचा अभाव होता. त्याने निग्रोंना सर्वत्र समान दर्जा व स्थान प्राप्त करून दिले. १९६१ नंतर क्यूबाने अधिकृतपणे साम्यवादाचा स्वीकार केला आणि तो कम्युनिस्ट गटात सामील झाला. एकपक्षीय हुकूमशाही, वृत्तपत्रस्वातंत्र्याचा अभाव, नागरिक स्वातंत्र्याची गळचेपी ही साम्यवादी शासनाची नीती क्यूबानेही स्वीकारली. प्रातिनिधिक लोकशाहीचे पुनरुज्जीवन आणि १९४० च्या घटनेची अंमलबजावणी हे मूळ उद्देश सोडून देण्यात आले.

संदर्भ :

  •  Fagg, J. E. Cuba, Haiti and the Dominican Republic, New Jersey, 1965.
  • Gerassi, John, Ed., Venceremos ! The Speeches and Writings of Ernesto Che Guevara, London, 1968.
  • Goldenberg, Boris, The Cuban Revolution and Latin America, London, 1965.
  • Matthews, T. H. Fidel Castro, New York, 1969.