क्लॅरंडन, एडवर्ड हाइड : (१८ फ्रेब्रुवारी १६०९–९ डिसेंबर १६७४). एक ब्रिटिश मुत्सद्दी व इतिहासकार. विल्टशरमधील जमीनदार घराण्यात जन्म. कायद्याचे शिक्षण घेऊन त्याने काही दिवस वकिली केली आणि १६४० मध्ये तो इंग्लंडच्या संसदेवर निवडून आला.
तो राजाच्या पक्षाचा होता आणि चर्चच्या अधिसत्तेचा संसदेत बचाव करण्याचा त्याने यत्न केला. एवढेच नव्हे, तर दुसऱ्या चार्ल्सच्या वर्तणुकीचे त्याने समर्थनही केले. यादवी युद्धात त्याने समझोता करण्याचा अयशस्वी यत्न केला. पुढे काही दिवस तो राजाच्या हद्दपारीत आणि नंतर त्याचा खास सल्लागार होता. क्रॉमवेलच्या पराभवानंतर १६६० मध्ये तो लॉर्ड चान्सेलर झाला. १६६१ मध्ये क्लॅरंडनचा पहिला ‘अर्ल’ झाला. १६६७ पर्यंत तो राजाचा मुख्यमंत्री होता. त्याचा परंपरागत राजेशाहीवर विश्वास असल्यामुळे सुधारणावादी लोकांवर त्याने कडाडून हल्ला चढविला. डच-इंग्रज युद्धात संसदेत त्याच्या कार्यपद्धतीवर व धोरणावर टीका होऊन त्याच्यावर महाभियोग लादण्यात आला आणि त्याला हद्दपार केले. तो फ्रान्समध्ये पळाला व तिथेच मरण पावला. त्याने लिहिलेला हिस्टरी ऑफ द रिबेलियन ॲड सिव्हिल वॉर्स इन इंग्लंड (१८८८) हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याच्या मेरी व ॲन ह्या दोन मुली राजघराण्यात दिल्या होत्या, त्यांना इंग्लंडच्या राण्या होण्याचा मान मिळाला.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.