सांख्यदर्शनातील एक महत्त्वाची संकल्पना.तन्मात्र या शब्दाची व्याख्या ‘तदेव इति’ किंवा ‘सा मात्रा यस्य’ अशी सांगितली आहे. साम्यावस्थेत असणाऱ्या प्रकृतीत सत्त्व-रज-तम या त्रिगुणांचा क्षोभ झाल्यावर सत्त्वगुण किंचित वरचढ होऊन महत् किंवा बुद्धी हे तत्त्व तयार होते. बुद्धीनंतर अहंकार हे तत्त्व उत्पन्न होते. यापुढे सेंद्रिय आणि निरिन्द्रिय सृष्टी निर्माण व्हायला सुरूवात होते. अहंकारातील रजोगुणापासून ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांची निर्मिती होते. तसेच अहंकारातील तमोगुण प्रभावी होऊन त्यास रजोगुण बलिष्ठ झालेल्या अहंकाराच्या अवस्थेकडून-तैजस अहंकाराकडून-चालना मिळाली की अहंकाराची ‘भूतादि’ ही अवस्था प्राप्त होते. या भूतादिपासून श्रोत्र (कान), त्वक् (त्वचा), चक्षुस् (डोळे), जिह्वा (जीभ) आणि घ्राण (नाक) या पंचज्ञानेंद्रियांचे विषय सूक्ष्म स्वरूपात उद्भूत होतात. यांना ‘तन्मात्रे’ असे म्हणतात, ती पुढीलप्रमाणे : १) शब्दतन्मात्र, २) स्पर्शतन्मात्र, ३) रूपतन्मात्र, ४) रसतन्मात्र आणि ५) गंधतन्मात्र.
तन्मात्रे ही शुद्धस्वरूपात असतात. आकाशादी सूक्ष्म भूतांमध्ये इतर अंशही असतात; पण तन्मात्रात केवळ तेच तत्त्व असते. (तत्+मात्र, निव्वळ तेवढेच). म्हणजे रसतन्मात्र याचा अर्थ केवळ रस. त्यात चवींचे भेद नाहीत, जाती नाहीत. स्पर्शतन्मात्र म्हणजे निव्वळ स्पर्श. त्यात उष्ण, शीत इ. भेद नाहीत. याचाच अर्थ शब्दतन्मात्र म्हणजे शब्दत्व, स्पर्शतन्मात्र म्हणजे केवळ स्पर्शत्व, रूपतन्मात्र म्हणजे केवळ रूपत्व, रसतन्मात्र म्हणजे केवळ रसत्व, गंधतन्मात्र म्हणजे केवळ गंधत्व. या तन्मात्रांपासून पुढील सूक्ष्म भूते उत्पन्न होतात : १) शब्दतन्मात्र-आकाश, २) स्पर्शतन्मात्र-वायु, ३) रूपतन्मात्र-तेजस्, ४) रसतन्मात्र-जल आणि ५) गंधतन्मात्र-पृथ्वी.
संदर्भ :
- Jha, Ganganath, Trans., Vachaspatimisra’s Comentary on the Sankhya-karika, Pune, 1965.
- Larson, Gerald James, Classical Sankhya : An Interpretation of its History and Meaning, Delhi, 2005.
- कुमठेकर, उदय, सांख्यदर्शन, पुणे, २००७.
- दीक्षित, श्री. ह. भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापूर,२०१४.
- ‘श्रीमाधवाचार्य’ कंगले, र. पं. सर्वदर्शनसंग्रह, मुंबई, १९८५.
समीक्षक : ललिता नामजोशी