मानवाचा देह (पिंड, क्षेत्र किंवा शरीर) हे एक अद्भुत अस्तित्व आहे. सृष्टीतील पंचभौतिक पदार्थांचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्याची पाच ज्ञानेंद्रिये उपयोगी पडतात, हे जसे खरे आहे त्याचप्रमाणे हेही खरे की, त्याची पाच कर्मेंद्रियेही त्याला जीवन जगण्यासाठी, तसेच आवश्यक असलेली विविध प्रकारची कर्मे करण्यासाठी उपयोगी पडतात.
सांख्यदर्शनानुसार सृष्टीच्या उत्पत्तीक्रमानुसार सात्त्विक अहंकाराला रजोगुणाची जोड मिळाल्यावर ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये उत्पन्न होतात. तसेच स्थूलदेहाप्रमाणे सूक्ष्मदेहातही ती दोन्ही असतात. कर्मेंद्रिये ही संकल्पना समजून घेण्यापूर्वी ‘कर्म’ म्हणजे काय आणि ‘कर्माचे प्रकार’ किती व कोणते हे समजून घेणे आवश्यक ठरते. अन्नंभटविरचित तर्कसंग्रह या ग्रंथात ‘चलनात्मकं कर्म।’ अशी कर्माची व्याख्या केलेली आहे. याचा अर्थ असा की, हालचाल हे ज्याचे स्वरूप आहे ते कर्म होय. यात ‘कर्मेंद्रिये’ पाच प्रकारची वर्णिलेली आहेत. ती कर्मेंद्रिये म्हणजे वाणी, हात, पाय, पायु (गुद) आणि उपस्थ होत.
तर्कसंग्रह या ग्रंथातीलच ‘उद्देश ग्रंथ’ या पहिल्या प्रकरणात पाच प्रकारची कर्मे वर्णिलेली आहेत : वर फेकणे, खाली फेकणे, संकुचित करणे, पसरणे आणि गमन करणे. या कर्मांव्यतिरिक्त गोल फिरणे, रिक्त होणे, वाहाणे, पेटून उठणे, तिरके जाणे इत्यादी कर्मांचा समावेश ‘गमन’ या कर्मातच केलेला आहे. ही व अशी इतर अनेक कर्मे पंचकर्मेंद्रियांकडून पार पाडली जातात.
मानवी देह जर एक मोठा वस्तूनिर्मितीचा कारखाना मानला, तर जसा बाहेरचा माल (ज्ञान) आत आणण्यासाठी ज्ञानेंद्रियांचा उपयोग केला जातो, तसा आतील विचार, ज्ञान, भावभावना इत्यादींना अभिव्यक्त करण्यासाठी, म्हणजे एकाअर्थी आतला माल (ज्ञान) बाहेर पाठविण्यासाठी कर्मेंद्रिये उपयोगी पडतात. तसेच ‘मन’ या अकराव्या उभयात्मक इंद्रियाने घेतलेल्या विविध प्रकारच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी कर्मेंद्रियांचा त्याच्याकडून उपयोग केला जातो.
दोन हातांच्या साहाय्याने विविध प्रकारची दैनंदिन कामे केली जातात. दोन पायांच्या साहाय्याने व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ-येऊ शकते. वाणी या इंद्रियामार्फत व्यक्ती आपल्या मनातील विचार व भावभावना अभिव्यक्त करू शकते. त्यामुळे जीवनात सुलभता येते. पायु (गुद) या इंद्रियाद्वारे शरीरातील नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. उपस्थ या कर्मेंद्रियामार्फत प्रजोत्पादनाचे कार्य केले जाते.
पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये यांच्यामध्ये मन हे उभयात्मक मानले गेलेले अकरावे इंद्रिय असते. मनाच्या आदेशानुसार ही पाच कर्मेंद्रिये आपले काम पार पाडीत असतात. दुसरे असे की, मन हे इंद्रिय कर्मेंद्रियांबरोबर कर्मेंद्रियांप्रमाणे आणि ज्ञानेंद्रियांबरोबर ज्ञानेंद्रियांसारखे वागते.
उपनिषदातील पंचकोश ही संकल्पना समजून घेताना कर्मेंद्रिये ही संकल्पना आधी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते; कारण वेदांतसार या ग्रंथात वर्णिल्याप्रमाणे ‘अन्नमय’ आणि ‘प्राणमय’ कोशांत कर्मेंद्रियांचा अंतर्भाव होतो. स्थूल आणि सूक्ष्म शरीरातही कर्मेंद्रियांचा अंतर्भाव होतो. त्यामुळे प्राचीन आणि आधुनिक शरीरशास्त्रातही ही संकल्पना महत्त्वाची ठरते.
संदर्भ :
- चाफेकर, नलिनी, अनु. अन्नंभट्टाचा तर्कसंग्रह, ठाणे, १९९४.
- टिळक, बाळ गंगाधर, श्रीमद्भगवद्गीतारहस्य, कोल्हापूर, २०१३.
- साने, जनार्दन भालचंद्र, वेदांतसार आणि त्याचा मराठी अनुवाद, वाशिम, १८६९.
समीक्षक : ललिता नामजोशी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.