मानवी आरोग्य, आजार, आरोग्य व्यवस्था आणि जैविक-सांस्कृतिक घटकांचा आरोग्याबरोबरचा संबंध यांचा अभ्यास म्हणजे वैद्यक मानवशास्त्र होय. यामध्ये स्थानिक समूहाचे आरोग्य आणि त्यांचा संस्कृतीशी प्राचीन काळापासून चालत आलेला संबंध यांचे विश्लेषण आणि तुलना केली जाते.
१९६० च्या मध्यापासून वैद्यक मानवशास्त्राची तीन वेगवेगळ्या विषयांपासून उत्पत्ती झाली. यांमध्ये परिस्थिती विज्ञान, उपयोजित मानवशास्त्र आणि सांस्कृतिक मानवशास्त्र यांचा समावेश होतो. परिस्थिती विज्ञानामध्ये लोकांचा जैविक तसेच सांस्कृतिक घटक म्हणून विचार केला जातो. पर्यावरणीय प्रणाली, आरोग्य यांचा उत्क्रांतीनुरूप एकत्रित अभ्यास केला जातो. ‘इथ्नोमेडिसिन’ म्हणजेच मानवजाती वैद्यकशास्त्र. ज्यामध्ये वनस्पती आणि प्राणी यांच्यावर आधारित पारंपारिक वैद्यक दृष्टीने अभ्यास होतो. एखादा आजार बरा होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध सांस्कृतिक पद्धती, आजारांबाबत लोकांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या समजुती आणि त्यावरील उपाययोजना यांचा उहापोह केला जातो. उपयोजित वैद्यक मानवशास्त्रामध्ये आजारांचा प्रतिबंध करणे, त्यासाठी कार्यक्रम व धोरण ठरविणे, सामाजिक आणि आर्थिक घटक या सगळ्यांच्या प्रभावाखाली लोक आजारासाठी मदत घेण्यावर विचार करतात. सांस्कृतिक मानवशास्त्र हे मानवजाती वैद्यकशास्त्राशी खूपच जवळचे शास्त्र आहे.
मानवशास्त्रज्ञ हे आजारांकडे पर्यावरणीय दृष्टीकोनातून पाहतात. माणूस हा जैविक तसेच सांस्कृतिक घटकांनी बनलेला प्राणी आहे. रिव्हर्स, विल्यम हॉल्स रिव्हर्स हे पहिले मानवजातीशास्त्रज्ञ होते. सुरुवातीच्या काळात फोरेस्ट ई. क्लीमेंत्स आणि एर्विन एच. एकेरनेक्ट यांनी आदिम वैद्यक समजुती आणि प्रथा-परंपरा यांचा अभ्यास केला. बेन्जामिन डी. पॉल यांनी आरोग्य, संस्कृती आणि समुदाय तसेच आरोग्य कार्यक्रमांवर लोकांच्या प्रतिक्रियांवर महत्त्वपूर्ण सविस्तर अभ्यास केला. या अभ्यासाकडे वैद्यक मानवशास्त्रातील पहिले लेखन म्हणून पहिले जाते. विल्यम्स कौडील यांनीही या विषयामध्ये अभ्यास केला आणि स्टिवन पोल्गार आणि नॉर्मन स्कोच यांनी त्याचे समीक्षण केले. १९६७ मध्ये विडमॅन यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यक मानवशास्त्रासाठी एक गट स्थापन केला, जो ‘सोसायटी फॉर अप्लाइड अँथ्रोपॉलॉजी’शी संलग्न होता.
माणूस हा एक जीव आहे, तसेच तो एक सामाजिक प्राणीसुद्धा आहे. त्यामुळे मानवशास्त्रज्ञ मानवाच्या आजारांमधील विविधतेचा अभ्यास करतात. ज्यामध्ये पर्यावरणाशी निगडीत समस्यांना सांस्कृतिक दृष्टीने कसे हाताळले जाते, ते बघणे जरुरीचे होते. शिवाय जनुकीय आणि शारीरिक बदलांनाही तितकेच महत्त्व असते. परिस्थितीशी जुळवून घेणे ही ‘वैद्यक परिस्थितिविज्ञान’ (मेडिकल इकॉलॉजी) या विषयातील महत्त्वाची संकल्पना आहे. ज्यामध्ये माणूस स्वतःला परिस्थितीशी जुळवून घेतो आणि त्यानुसार स्वतःमध्ये बदल करून आपल्या अस्तित्वाची शक्यता वाढवून आपली पिढीसातत्य राखतो. अलेक्झांडर अल्लांड ज्यु. यांनी वैद्यक मानवशास्त्रामध्ये पहिल्यांदा ‘जुळवून घेणे किंवा अनुकुलीत होणे’ ही संकल्पना वापरली. जनुकीय बदल, शारीरिक वाढ, सांस्कृतिक ज्ञान आणि रूढी-परंपरा या सगळ्यांशी मानवसमूह जुळवून घेत असतो. आरोग्य म्हणजे पर्यावरणाशी जुळवून घेणे आणि आजार म्हणजे असंतुलन. यांमधील दुसरा सिद्धांत असा की, आजार उत्पन्न होणे हे मानवी जीवशास्त्रीय आणि सांस्कृतिक उत्क्रांतीशी संलग्न आहे. शेती करणारा समूह आणि औद्योगिकीकरण करणारा मानवी समूह यांना असणारी जोखीम ही वेगवेगळी असते. तसेच प्रत्येकाचे आजारी पडण्याचे प्रमाण हे त्या त्या मानवी समूहाचे पर्यावरण, अन्नाची उपलब्धता, पाळीव प्राणी आणि इतर रोगकारक घटक यांमधील परस्पर संबंध इत्यादींवर अवलंबून असतात.
मानव वैद्यकशास्त्राद्वारे समाजात असणाऱ्या आरोग्यविषयीच्या प्रथा, सांस्कृतिक मूल्य आणि सामाजिक जबाबदाऱ्या यांवर प्रकाश टाकला जातो. यामध्ये सुरुवातीला आदिम जमातींच्या पारंपारिक औषधींबद्दलचा मर्यादित अभ्यास होता; मात्र कालांतराने कोणत्याही समाजाचे आरोग्य राखण्यासाठी असलेल्या विविध यंत्रणाच्या दृष्टीने या अभ्यासक्रमात वाढ झाली. आरोग्यासंदर्भात मानवशास्त्रीय नोंदी घेणे, आरोग्य तज्ज्ञ आणि सामान्य लोकांच्या आजारांबाबतच्या समजुती, ज्ञान तसेच रोग बरा करणाऱ्या व्यक्तीची भूमिका; आजारी व्यक्तीची आणि तिच्या कुटुंबाची भूमिका यांसंबंधीची यंत्रणा कशी कार्यान्वित होते; कोणते तंत्र आणि औषधे वापरली जातात; आरोग्यदायी जीवनासाठी असलेल्या कायदेशीर व आर्थिक बाजू आणि आजाराचा प्रतीकात्मक व परस्पर संबंध या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव या मानवजाती वैद्यकशास्त्रामध्ये केला जातो.
जेव्हा वैद्यकीय चिकित्सा केली जाते, तेव्हा आजारी व्यक्ती, त्याचे कुटुंबीय आणि वैद्य यांनी आजाराच्या बाबतीत सांगितलेल्या गोष्टींमध्ये तफावत जाणवते. त्यामुळे आजाराचे व्यवस्थापन होण्याच्या दृष्टीने त्याची सांस्कृतिक संकल्पना स्पष्ट होणे महत्त्वाचे असते. ही तफावत संस्कृती किंवा स्थानिक विचारधारा किंवा जीवनशैलीतील स्तर यांमुळे येऊ शकते. ही तफावत समजून घेता आली नाही, तर आजाराचे व्यवस्थापन करणे कठीण होते.
आरोग्याची काळजी घेण्याच्या कोणत्या स्थानिक पद्धती आहेत, शारीरिक प्रक्रियांचा त्या त्या समाजातील लोक काय अर्थ लावतात, आजार व शरीराची निगा यांबाबत कोणते धोके आणि जोखीम असते, त्या बाबतचा लोकांचा काय दृष्टीकोन असतो, आजार किंवा इजा होऊ नये म्हणून कोणते प्रतिबंधात्मक उपाय केले जातात, त्याचा काय अर्थ लावला जातो, या सर्वांची सामाजिक कारणे काय असतात या सगळ्यांचा अभ्यास वैद्यक मानवशास्त्रामध्ये करतात. आजार बरा होण्याची प्रक्रिया कशी होते; वैद्यकीय सेवा घेताना सामाजिक यंत्रणा कशी काम करते; नवीन वैद्यकीय पद्धती आल्यामुळे वैद्यकीय सेवा पुरविण्यामध्ये आणि स्वीकारण्यामध्ये काय फरक झाला आहे; जैव-तंत्रज्ञानाचा आणि औषध निर्मितीचा उपयोग लोक कशा प्रकारे करून घेतात; विविध वैद्यकीय सुविधा पुरविण्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती आणि आर्थिक व्यवहार कसे कार्यरत राहतात; तसेच संसर्गजन्य आणि विषाणुजन्य आजार, जुनाट स्वरूपाचे आजार, कुपोषण आणि सामाजिक हिंसाचार या सर्व बाबींच्या परस्पर संबंधांचा अभ्यास मानवशास्त्रज्ञ वैद्यक मानवशास्त्रात करतात.
समीक्षक : शौनक कुलकर्णी