जिबरेलिक अम्ल सर्वप्रथम एका  बुरशीमध्ये आढळले. जिबरेल्ला फ्युजिकुरोई (Gibberella fujikuroi) नावाची बुरशी ज्या भाताच्या रोपावर आक्रमण करायची, त्या रोपांची उंची इतर रोपांपेक्षा खूप जास्त वाढायची. त्यावरूनच शास्त्रज्ञांनी  असा अंदाज व्यक्त केला की, या बुरशीमधील कोणत्या तरी संयुगामुळे  रोपांची अनियंत्रित वाढ होते आहे, त्यामुळे हे संयुग ‘संजीवक’ प्रकारातील असले पाहिजे. त्यानंतर जपानी शास्त्रज्ञ याबुता आणि वाय्. सुमिकी यांनी या बुरशीमधून जिबरेलिक अम्ल नावाचे संजीवक पृथक केले. बियांच्या रुजण्याच्या क्रियेतही या संजीवकाचे महत्त्वाचे योगदान आहे.

उत्पादन व वहन : ज्या पेशींमध्ये जिबरेलिक अम्लाची गरज आहे, तेथेच त्यांची निर्मिती केली जाते. ऑक्सिजनप्रमाणे त्यांचे वहन केले जात नाही. जवळपास १०० प्रकारची जिबरेलिक अम्ले आजपर्यंत शोधली गेली आहेत.

जिबरेलिक अम्लांचे कार्य : १) खोडांच्या लांबीत भरपूर वाढ घडविणे (Bolting of  length of internodes); २) पेशींची लांबी व विभाजनक्षमता वाढविणे; ३) झाडांच्या बाल्यावस्थेतून प्रौढावस्थेतील प्रवास सुखकर बनविणे; ४) ऑक्सिजन संश्लेषणाला चालना देणे; ५) दीर्घ-दिवस वनस्पतीच्या फुलण्यास उत्तेजन देणे; ६) पराग व परागनलिका तयार होण्यास मदत करणे; ७) निर्बीज फलधारणेसाठी उपयुक्त; ८) बियांच्या सुप्तावस्था थांबवून, अंकुरण प्रक्रियेला मदत करणे.

व्यापारी उपयोग :१) फळधारणेसाठी व निर्बीज फळधारणेसाठी  उपयुक्त; २) बीअर व्यवसायात बार्ली आंबविणे यासाठी उपयुक्त; ३) उसामधील साखरेचे प्रमाण वाढविण्यासाठी उपयुक्त; ४) जिबरेलिक अम्ल बनविण्याच्या प्रक्रियेचे विरोधक संयुग वापरल्यास  पिकांची उंची कमी राहते. त्यामुळे यंत्राद्वारे काढणी सुलभ होते. तसेच शोभेच्या झाडांची उंची खुंटते, परंतु जास्तीच्या फांद्या बाजूने येऊन झाडाचा आकार डेरेदार दिसतो; ५) बियांची सुप्तावस्था दूर करून लवकर अंकुरण्यासाठी उपयुक्त.

                                                                                                                                                                                                                                           समीक्षक : डॉ.बाळ फोंडके


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.