ॲबसिसिक अम्ल या संजीवकामुळे वनस्पतींची वाढ खुंटते. विपरीत वातावरणामध्ये बियांना सुप्तावस्थेत ठेवण्याचे काम हे संजीवक करते. त्याचप्रमाणे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्यास पर्णरंध्रे (stomata) बंद करण्याचे कामही हे संजीवक करते.
उत्पादन व वहन : जिबरेलिक अम्लाप्रमाणेच ॲबसिसिक अम्लही टर्पिनॉईड प्रकारच्या संयुंगामध्ये समाविष्ट केले जाते. पेशींना ज्याप्रमाणे गरज असेल त्याप्रमाणे ॲबसिसिक अम्ले निर्माण केली जातात अथवा त्यांना काही काळापुरते निष्क्रीय केले जाते. संवहनी ऊतींमधूनच या अम्लाचे वहन केले जाते. उदा., मुळांच्या आसपासच्या मातीत जेव्हा पाण्याचे प्रमाण कमी होते, त्यावेळेस मुळे ॲबसिसिक अम्लांची निर्मिती करतात व ती संवहनी ऊतींमार्फत पानांकडे पाठविली जाते. तिथे गेल्यावर पर्णरंध्रे बंद केली जातात, जेणेकरून उत्सर्जनामुळे होणारा पाण्याचा अपव्यय थांबविला जातो.
ॲबसिसिक अम्लाची कार्ये : १) बिया व कुक्षी कोंबांमध्ये सुप्तावस्था निर्माण करणे. यामध्ये जिबरेलिक अम्ले व ॲबसिसिक अम्ले यांमधील तुलनात्मक गुणोत्तर महत्त्वाची भूमिका बजावते; २) पाण्याच्या दुर्भिक्ष्यामध्ये पर्णरंध्रे बंद करण्याचे महत्त्वाचे काम ॲबसिसिक अम्ल करते, जेणेकरून बाष्पीभवनातून होणारा पाण्याचा अपव्यय थांबवता येतो; ३) जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाल्यास, ॲबसिसिक अम्ल हे मुळांची व खोडांची वाढ रोखून धरते. जेव्हा पाण्याची पातळी वाढते तेव्हा परत मुळे व खोडांच्या वाढीला चालना देण्यात येते; ४) ॲबसिसिक अम्लामुळे पानगळीची प्रक्रिया सुरू होते; ५) जिबरेलिक अम्ल व एथिलीन या संजीवकांच्याविरुद्ध कार्य ॲबसिसिक अम्लामुळे केले जाते.
व्यापारी उपयोग : ऊतीसंवर्धनाने तयार केलेल्या कायिक भ्रूणांमध्ये (Somatic embryos) सुप्तावस्था निर्माण करण्यासाठी ॲबसिसिक अम्लांचा उपयोग केला जातो.
समीक्षक : डॉ. बाळ फोंडके