भातखंडे पद्धतीनुसार रूढ असलेल्या रागवर्गीकरणातील काफी हा थाट, त्यातून निघणार्‍या रागांच्या मोठ्या संख्येमुळे सर्व थाटांत मोठा मानला जातो. दाक्षिणात्य संगीतपद्धतीवरील ग्रंथांत त्याला ‘खरहरप्रिया’ ‘हरप्रिया’ किंवा ‘श्रीराग मेल’ अशी नावे आहेत. गंधार, निषाद हे दोन स्वर कोमल व बाकीचे शुद्ध असे या थाटाचे सर्वसामान्य स्वरूप असले, तरी या थाटातील काही रागांत गंधार, निषाद यांचे शुद्ध भेद व धैवत या स्वराचा कोमल भेद यांचा उपयोग झालेला आढळतो.

काफी थाटीतील प्रमुख राग : (१) काफी (२) सैंधवी किंवा सेंधवी अथवा सिंदूरा (३) धनाश्री (४) धानी (5) भीमपलासी (६) हंसकिंकणी किंवा हंसकंकणी (७) पददीपकी किंवा प्रदीपकी (८) पटमंजरी (९) बागेश्री (१०) शहाना, शाहना किंवा सहाना (११) नायकी (१२) सूहा (१३) सुघराई (१४) देवसाख किंवा देवसाग (१५) पीलू (१६) बहार (१७) बिंद्रावनी सारंग (१८) मधमाद सारंग किंवा मध्यमादी सारंग (१९) बडहंस सारंग (२०) सामंत सारंग (२१) मियां की सारंग (२२) शुद्ध सारंग (२३) लंकादहन सारंग (२४) मल्लार (शुद्ध) (२५) गौड मल्हार (२६) मेघ मल्हार (२७) मियां की मल्हार (२८) मीरा की मल्हार (२९) नट मल्हार (३०) सूर मल्हार (३१) चरजू की मल्हार (३२) चंचलसस मल्हार (३३) रामदासी मल्हार.

रागांग पद्धतीनुसार या रागांचे वर्गीकरण करता येते व ते पुढीलप्रमाणे :

(१) काफी अंग : काफी, सैंधवी, पीलू.

(२) धनाश्री अंग : धनाश्री, धानी, भीमपलासी, हंसकिंकिणी, पटदीपकी.

(३) कानडा अंग : बहार, बागेश्री, सूहा, सुघराई, नायकी, सहाना, देवसाख

(४) सारंग अंग : शुद्ध सारंग, मधमाद सारंग, बिंद्रावनी सारंग, बडहंस सारंग, सामंत सारंग, मियां की सारंग, लंकादहन सारंग, पटमंजरी (काफी मेलजन्य प्रकार).

(५) मल्हार अंग : शुद्ध मल्हार, गौड मल्हार, मियां की मल्हार, सूर मल्हार, मेघ मल्हार, रामदासी मल्हार, चरजू की मल्हार, चंचलसस मल्हार, मीरा की मल्हार, नट मल्हार.

संदर्भ :

  • भातखंडे, वि. ना., भातखंडे संगीतशास्त्र,( भाग चौथा), हाथरस, १९५७.

समीक्षक : सुधीर पोटे