ज्ञानेंद्रिये ही संकल्पना इतकी महत्त्वाची आहे की, संस्कृतसाहित्यातील सहा दर्शनग्रंथांतून आणि श्रीमद्भगवद्गीतेतून या संकल्पनेचा उल्लेख आढळतो.

ज्ञान देणारी इंद्रिये म्हणजे ज्ञानेंद्रिये हे अर्थावरून स्पष्ट होत असले, तरी त्यातील ‘इंद्रिय’ हा शब्द ‘इंद्र’ या शब्दापासून निर्माण झालेला आहे. ‘इंद्र’ या शब्दाचे अनेक अर्थ असून या शब्दाची व्युत्पत्तीऐतरेयोपनिषदातील पहिल्या अध्यायातील तृतीय खंडात ‘इदंद्र’ (इदं+द्र) अशी दिली आहे. गुरुदेव रानडे म्हणतात “इंद्र हे इदंद्रचे संक्षिप्त रूप आहे”. अगदी पहिल्यांदा ज्याने ब्रह्माला पाहिले (इदं), म्हणजेच अनुभवले (द्र), म्हणजे पहिल्या ज्ञानेंद्रियामार्फत पाहण्याची क्रिया जगाच्या इतिहासात ज्याने सर्वप्रथम केली, तो इंद्र किंवा इदंद्र. इंद्रिय हा शब्द इंद्र या शब्दाच्या वरील अर्थाला अनुसरून तयार झाला आहे, असे म्हणता येते. त्यामुळे इंद्रिय या शब्दाचा अर्थ अनुभवणारे, जाणीव जाणवून घेणारे साधन असा लावावा लागतो. मानवाला एकूण ११ इंद्रिये असतात, असे मानले गेले आहे. त्यांपैकी डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये असून हात, पाय, वाणी, उपस्थ, गुद ही पाच कर्मेंद्रिये आहेत. मन हे अकरावे स्वतंत्र इंद्रिय मानले गेले आहे.

संकल्पनेचा उगम : इंद्रिय या शब्दाचा उगम सर्वप्रथम भारतातील वेद-उपनिषदांत केलेला दिसून येतो. उदा., ऐतरेयोपनिषदातील शान्तिपाठात ‘इंद्रियाणि च सर्वाणि’ (‘आणि सर्व इंद्रिये’) असा उल्लेख आढळतो. कठोपनिषद आणि ऐतरेयोपनिषद यांसारख्या इतरही अनेक उपनिषदांत या शब्दाचा उल्लेख दिसून येतो.

ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये या अनुषंगाने हिंदू धर्मातील सांख्य विचारधारा असे मानते की, अहंकारामुळे प्रकृतीला बहुजिनसीपणा येण्यास सुरुवात झाली. म्हणजेच प्रथम त्या अहंकारापासून पाच सूक्ष्म ज्ञानेंद्रिये, पाच सूक्ष्म कर्मेंद्रिये आणि मन मिळून ११ भिन्न भिन्न शक्ती किंवा गुण मूळ प्रकृतीतच स्वतंत्रपणे एकदम निर्माण होऊन त्यांपासून पुढे स्थूल सेंद्रिय सृष्टी होत असते. मन हे उभयविध असे अकरावे इंद्रिय मानले आहे. उपनिषदांतून या इंद्रियांनाच ‘प्राण’ म्हटले आहे आणि त्यांच्या म्हणजे इंद्रियांच्या संख्येबद्दल सर्व उपनिषदांत एकवाक्यता नाही. पण उपनिषदांतील या संदर्भातील वाक्यांची एकवाक्यता केली, तर सर्व इंद्रियांची एकूण संख्या ११ आहे हे सिद्ध होते, असे वेदांतसूत्रांच्या आधारे आद्य शंकराचार्यांनी निश्चित केले आहे.

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्या तन्मात्रा म्हणजे अत्यंत शुद्ध अशा या प्रत्येक गुणाची निरनिराळी अशी अतिसूक्ष्म मूलस्वरूपे ही निरींद्रिय सृष्टीची मूलतत्त्वे असून मनासह अकरा इंद्रिये ही सेंद्रिय सृष्टीची बीजे होत. या सर्व संदर्भात सांख्य विचारवंतांनी प्राचीन काळी सखोल मांडणी केलेली आहे.

संकल्पनेची व्याख्या : दृश्यमान सजीवसृष्टीतील मानव व मानवेतर सजीवांना ज्या सूक्ष्म व स्थूल शारीरिय, आंतरिक, स्थूल किंवा सूक्ष्म साधनांद्वारे बाह्य सृष्टीतील पदार्थांचे ज्ञान व अनुभव प्राप्त करून घेणे शक्य होते, त्या साधनांना, त्या इंद्रियांना ‘ज्ञानेंद्रिये’ असे म्हणतात. ज्ञानेंद्रिये एकूण पाच असून ती सामान्यतः प्रत्येक व्यक्तीला जन्मतः प्राप्त झालेली असतात. त्यांच्या साहाय्याने बाह्य जगाचे ज्ञान प्राप्त करता येऊ शकते.

या सर्व ज्ञानेंद्रियांमध्ये खास प्रकारच्या पेशींचे जाळे असते. मज्जातंतूही असतात. बाह्य जगात प्रत्येक क्षणी नवनवीन परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे त्या परिस्थितीचे आकलन व ज्ञान या पेशींना व मज्जातंतूंना होत असते. मज्जातंतू ते ज्ञान मेंदूतील त्या त्या ज्ञानेंद्रियांच्या केंद्रात पाठवतात. त्यामुळे मानवी मेंदूला अनुक्रमे रूप, गंध, शब्द, रस (चव), स्पर्श यांचे ज्ञान होत असते.

ज्ञानेंद्रिये आणि प्रत्यक्षप्रमाण : ज्ञानेंद्रिये आणि प्रत्यक्षप्रमाण किंवा प्रत्यक्षपणे होणारे ज्ञान यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. अन्नभट्ट (१६२५—१७००) विरचित तर्कसंग्रह या ग्रंथातील ‘चतुर्विध प्रमाण विचार’ या चवथ्या प्रकरणात ‘प्रत्यक्षप्रमाण’ आणि ‘प्रत्यक्ष ज्ञान’ म्हणजे काय? यावर ग्रंथकर्त्याने विशेष प्रकाश टाकला आहे. पाच ज्ञानेंद्रियांपैकी त्या त्या इंद्रियाचा आपापल्या विषयाशी संयोग झाल्यामुळे व्यक्तीला ‘प्रत्यक्षप्रमाण’ अनुभवास येते. या प्रत्यक्षप्रमाणापासून व्यक्तीला जे ज्ञान प्राप्त होते, ते प्रत्यक्ष ज्ञान होय. म्हणजेच केवळ पंचेंद्रियांमार्फतच प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष, अनुभवजन्य ज्ञान होत असते. सारांश, विश्वातील पदार्थांचे ज्ञान प्राप्त करून घेण्याचे साधन म्हणजे प्रमाण होय.

या ठिकाणी प्रत्यक्षप्रमाण आणि प्रत्यक्ष ज्ञान यांमधील फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्षप्रमाण हे कारण असून प्रत्यक्ष ज्ञान हे कार्य (परिणाम) आहे. पंचज्ञानेंद्रियांचा आपापल्या ज्ञान विषयाशी संयोग झाल्यामुळे आणि संयोग झाल्यानंतरच तत्क्षणी प्रत्यक्षप्रमाणाच्या साधनामुळे प्रत्यक्ष ज्ञानाची प्राप्ती होते, असे इंद्रियजन्य ज्ञानाचे वर्णन तर्कसंग्रहात केलेले आहे.

न्यायशास्त्रामध्येही इंद्रियजन्य ज्ञान होण्याची प्रक्रिया वर्णिलेली आहे. आत्म्याचा मनाशी संयोग होतो, मनाचा इंद्रियाशी, इंद्रियाचा अर्थाशी म्हणजे आपापल्या विषयाशी संयोग होतो आणि त्यामुळे व्यक्तीला ज्ञान प्राप्त होते.

ज्ञानेंद्रियांची विशेषता : सर्व प्रकारच्या जीवित सृष्टीतील प्राणिमात्रांना ज्ञानेंद्रिये असली, तरी मानव वगळता इतर योनींमध्ये काही ज्ञानेंद्रियांचा अभाव आढळतो. त्याचप्रमाणे मानवप्राण्यांसह सर्व योनींमध्ये ज्ञानग्रहण क्षमतेमध्ये फार मोठी, दीर्घ व स्थूल-सूक्ष्म स्वरूपाची विविधता दिसून येते. आणखी एक विशेषता म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या क्षमता या ईश्वरदत्त/निसर्गदत्त आहेत, त्या मानवनिर्मित नाहीत. त्याचप्रमाणे त्यांच्या क्षमता आणि त्यांची ज्ञानग्रहणाची क्षेत्रे पृथक पृथक आहेत. म्हणजे डोळे हे कानांचे श्रवणकार्य करू शकत नाहीत आणि नाक हे त्वचेचे ज्ञानग्रहणाचे कार्य करू शकत नाही.

संदर्भ :

  • चाफेकर, नलिनी, अनु. अन्नंभट्टाचा तर्कसंग्रह, ठाणे, १९९४.
  • टिळक, बाळ गंगाधर, श्रीमद्भगवद्गीतारहस्य, कोल्हापूर, २०१३.
  • रानडे, रा .द.; अनु. गजेंद्रगडकर, कृ. वें. उपनिषद्रहस्य, निंबाळ, २००३.

                                                                                                                                                                समीक्षक : ललिता नामजोशी