न्यायदर्शनातील पहिले व महत्त्वाचे प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष होय. प्रमाण म्हणजे यथार्थ ज्ञान मिळविण्याचे साधन. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द या चार प्रमाणांची चर्चा न्यायदर्शन करते.

‘इन्द्रियार्थसन्निकर्षजं ज्ञानं प्रत्यक्षम्।’ अशी प्रत्यक्षज्ञानाची व्याख्या केली जाते. ज्ञानेंद्रिये व अर्थ म्हणजेच वस्तू यांच्या संपर्कातून होणारे ज्ञान म्हणजेच प्रत्यक्षज्ञान होय. म्हणजेच साक्षात्कारस्वरूपी ज्ञान. डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहणे, कानांनी मधुर गीत ऐकणे, नाकाने एखाद्या फुलाचा सुगंध हुंगणे, जिभेने एखाद्या पदार्थाची चव घेणे आणि एखाद्या वस्तूला स्पर्श करून तिचे स्वरूप जाणून घेणे, हे सगळे अनुभव प्रत्यक्षज्ञानाच्या कक्षेत येतात.

पूर्वोल्लेखित उर्वरित तीन प्रमाणांना ज्ञानप्राप्ती करवून देण्यासाठी प्रत्यक्षप्रमाणाची अपेक्षा असते. म्हणजेच ज्ञानसंपादनाच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष ही पहिली पायरी होय. अनुमानप्रमाणासाठी आवश्यक असलेली व्याप्ती किंवा साहचर्य ही प्रत्यक्षप्रमाणाच्या आधारेच जाणून घ्यावी लागते. उदा., काळ्या रंगाच्या आणि कर्कश आवाजात ओरडणार्‍या पक्ष्याला कावळा म्हणतात, हे प्रथमत: खराखुरा कावळा पाहून कळते आणि तशाच प्रकारचा कर्कश आवाज ऐकल्यानंतर हा कावळा ओरडतॊ आहे, असे अनुमान आपण करतो. शब्दप्रमाणाच्या बाबतीत शब्दांचे प्रथम ग्रहण प्रत्यक्षानेच होते. उपमानप्रमाणाच्या संदर्भातही सादृश्याचे ज्ञान हे प्रत्यक्षप्रमाणाद्वारेच हॊते. म्हणूनच ‘न हि प्रत्यक्षम् अनुपपन्नं नाम।’ (प्रत्यक्षप्रमाणाने जे ज्ञान प्राप्त होते, ती वस्तू अस्तित्वात असतेच) असे शंकराचार्य म्हणतात.

प्रत्यक्षज्ञानाचे मुख्य दोन प्रकार पडतात, ते असे :

निर्विकल्पक प्रत्यक्ष : विकल्प म्हणजे गुणधर्म. एखाद्या गोष्टीचे ज्ञान होताना प्रथम ती गोष्ट बाह्यत: आहे तशी प्रतीत होते. तिच्या कोणत्याही अंतर्गत गुणधर्मांचे ज्ञान सुरुवातीस होत नाही. म्हणजेच ‘हे काहीतरी आहे’ इतकेच ज्ञान प्रथम होते. यालाच निष्प्रकारक प्रत्यक्ष असेही म्हणतात. उदा., एखाद्या व्यक्तीस पाहिल्यानंतर ‘हा पुरुष आहे’ किंवा ‘ही स्त्री आहे’, असे होणारे ज्ञान.

सविकल्पक प्रत्यक्ष : एखाद्या वस्तूच्या गुणधर्मांचे होणारे ज्ञान हे सविकल्पक प्रत्यक्ष होय. उदा., ‘हा गोपाल आहे. हा स्थूल आहे’, हे ज्ञान. यालाच सप्रकारक प्रत्यक्ष असेही म्हणतात.

थॊडक्यात, निर्विकल्पक प्रत्यक्ष ही ज्ञानप्रक्रियेतील पहिली अवस्था, तर सविकल्पक प्रत्यक्ष ही नंतरची अवस्था होय. वस्तूचे द्रव्य, जाति, गुण आणि क्रिया अशा चार विकल्पांनी युक्त असे हॊणारे ज्ञान म्हणजेच सविकल्पक प्रत्यक्ष. याउलट, निर्विकल्पक ज्ञान हे अभेदात्मक, एकजिनसी असते.

सविकल्पक प्रत्यक्षाचे लौकिक सविकल्पक आणि अलौकिक सविकल्पक असे दोन प्रकार पडतात. लौकिक सविकल्पक प्रत्यक्षाबाबत इंद्रिय-संनिकर्ष महत्त्वाची भूमिका बजावतॊ. पाच ज्ञानेंद्रिये आणि मन मिळून हे लौकिक सविकल्पक प्रत्यक्ष सहा प्रकारचे असते : चाक्षुष, श्रावण, घ्राणज, रासन, स्पार्शन आणि मानस. अलौकिक सविकल्पक प्रत्यक्षाचे तीन प्रकार आहेत : सामान्यलक्षणप्रत्यासत्ति, ज्ञानलक्षणप्रत्यासत्ति आणि योगज प्रत्यक्ष.

  • सामान्यलक्षणप्रत्यासत्ति : एखादी वस्तू पाहिल्यानंतर केवळ त्या वस्तुविशेषाचेच ज्ञान होते असे नाही, तर त्या वस्तुविशेषात जितक्या व्यक्तींचा समावेश होतो त्या सर्वांचे ज्ञान एकाच वेळी होऊ शकते, असे न्यायदर्शन मानते. उदा., एखादी गाय पाहिल्यानंतर समस्त गोव्यक्तिविशेषाचा बोध होऊ शकतो. यालाच सामान्यलक्षणप्रत्यासत्ति असे म्हटले आहे.
  • ज्ञानलक्षणप्रत्यासत्ति : याचे स्पष्टीकरण दोन पद्धतींनी दिलेले आढळते. एखाद्या प्रतिभावान व्यक्तीला साध्या विषयातही मोठा आशय आढळतो. याला ज्ञानलक्षणप्रत्यासत्ति म्हणतात. याचे दुसरे स्पष्टीकरण असे : आपल्यापासून खूप दूर असलेला बर्फ गार आहे याची आपल्याला जाणीव होणे किंवा देव्हार्‍यात ठेवलेल्या चंदनाच्या गंधाचे दुरूनच भान होणे, हे ज्ञान नेहमीच्या प्रत्यक्ष या सदरात मोडत नाही; कारण या ठिकाणी आपल्या त्वचेचा संपर्क बर्फाशी झालेला नाही किंवा घ्राणेंद्रियाचाही चंदनाशी संपर्क आलेला नाही. पण नित्याच्या स्पर्शप्रत्यक्षात किंवा घ्राणप्रत्यक्षात ज्या तर्‍हेचे ज्ञान असते, तसेच हे असल्यामुळे त्याचा समावेश प्रत्यक्ष या विभागात करण्यात आला आहे.
  • योगज प्रत्यक्ष : ज्या विषयाचा इंद्रियांशी संबंध घडून येऊ शकत नाही, अशा अतींद्रिय विषयाचे ज्ञान एखाद्या योगी किंवा सिद्ध माणसाला हॊऊ शकते. अशा ज्ञानात इंद्रियार्थसंनिकर्ष जरी नसला, तरी ते प्रत्यक्ष ज्ञानापेक्षा वेगळे नसते. वाक्यपदीयकार भर्तृहरीदेखील अशा प्रकारच्या ज्ञानाचा उल्लेख करतो.

आविर्भूतप्रकाशानामनुपप्लुतचेतसाम्।

अतीतानागतज्ञानं प्रत्यक्षान्न विशिष्यते॥ (वाक्यपदीय, ‘ब्रह्मकाण्ड’ ३७).

या प्रकारांच्या माहितीसाठी खालील आकृती पाहावी :

संदर्भ :

  • चाफेकर, नलिनी, अनु. अन्नंभट्टाचा तर्कसंग्रह, ठाणे, १९९४.
  • जोशी, महादेवशास्त्री, भारतीय संस्कृतिकोश, खंड ५, पुणे, २०१०.
  • दीक्षित, श्रीनिवास, भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापूर, २००२.
  • ‘ज्ञान’ अवस्थी, बच्चूलाल, भारतीय दर्शन बृहत्कोश, खंड ७, दिल्ली, २००४.

                                                                                                                                                                समीक्षक : ललिता नामजोशी