एकविसाव्या शतकातील औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे निसर्गातील माती, पाणी व वातावरणातील प्रदूषण वाढत आहे. औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणार्‍या मातीच्या प्रदूषणाचे निवारण करण्यासाठी सूक्ष्मजीवाणूंचा वापर हा एक प्रभावी उपाय आहे. हा उपाय जागच्या जागी किंवा प्रदूषित माती इतरत्र नेऊन करता येतो. सूक्ष्मजीवाणू प्रदूषक  रसायनांचे रूपांतर कमी घातक किंवा निरुपद्रवी रसायनांमध्ये करतात. घातक रसायनांमध्ये  किरणोत्सारी घटक, अतिसूक्ष्म प्रमाणातील मूलद्रव्ये, जडधातूंची कार्बनी संयुगे, तेल, कोळसा, डांबर यांना वेगवेगळ्या करण्याच्या प्रक्रियेतून तयार झालेले पदार्थ, पीएएच (PAH) द्रव्ये, विद्युत रोहित्रामध्ये  वापरली जाणारी शीतलीकरण द्रव्ये, पीसीबी (PCB) आणि डायऑक्सीनसारखी द्रव्ये यांचा समावेश होतो.

सूक्ष्मजीवांपैकी फ़क्त बुरशी या जीवांचा वापर या पद्धतीमध्ये केला जातो. जीवाणूंपेक्षा बुरशी सर्वात प्रभावी ठरतात, कारण त्यांच्यामध्ये उत्पादित होणार्‍या विकरांचा (Enzyme) पाझर पेशींच्या (कोशिकांच्या) बाहेर होतो. ही विकरे घातक रसायनांवर प्रक्रिया करतात. या पद्धतीत बुरशीचे कवकजाल  प्रदूषित मातीमध्ये एकत्र केल्याने त्यांचा एक थर मातीवर जमा होतो. काही बुरशींमध्ये घातक रसायने शोषून त्यांचा साठा करण्याचीही क्षमता असते. अळंबीसारख्या बुरशीचे फुटवे मातीतील जड धातू शोषून साठवून ठेवतात. त्यांमध्ये व्हाईट रॉटिंग बुरशी (White Rotting Fungi) या जास्त प्रभावी ठरल्या आहेत.

तेलगळती झालेल्या भागात किंवा औद्योगिक रसायनांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी या तंत्राचा उपयोग होऊ शकतो. औष्णिक व रासायनिक प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी या पद्धती कमी प्रभावी ठरत असताना मायकोरेमिडीएशन हे तंत्र अधिक प्रभावी ठरले आहे.                                                                        समीक्षक : डॉ.बाळ फोंडके