चेंबरलिन, आर्थर नेव्हिल : (१८ मार्च १८६९ – ९ नोव्हेंबर १९४०). ब्रिटिश मुत्सद्दी आणि १९३७ ते १९४० या काळातील  इंग्लंडचा पंतप्रधान. एजबॅस्टन (बर्मिंगहॅम) येथे जन्म. धातुविज्ञान, वाणिज्य व अभियांत्रिकी ह्या विषयांचे शिक्षण घेऊन त्याने काही वर्षे अँड्रॉस बेटावर आपल्या वडिलांच्या सु. ८,००० हे. जमिनीची देखभाल केली; पण या व्यवसायात त्याला फारसे यश आले नाही. म्हणून त्याने बर्मिंगहॅम येथे स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.

१९११ साली बर्मिंगहॅमच्या महानगरपालिकेत तो निवडून आला. त्याच साली ॲनी कोल या युवतीशी तो विवाहबद्ध झाला. पुढे १९१५ मध्ये तो महापौर झाला. १९१८ मध्ये तो हुजूरपक्षातर्फे संसदेवर निवडून आला. पहिल्या महायुद्धकाळात त्याची मजुरसेवा आणि सैन्यभरती खाते यांच्या संचालकपदी नियुक्ती झाली. तथापि लॉइड जॉर्जशी न पटल्याने त्याने राजीनामा दिला. पुढे त्याने संयुक्त मंत्रिमंडळास पाठिंबा दिला, पण कोणतेही मंत्रिपद स्वीकारले नाही मात्र लॉइड जॉर्जनंतर तो मंत्रिमंडळातील पोस्टमास्टर जनरल, मास्टर जनरल, अर्थमंत्री, आरोग्यमंत्री इ. पदांवर १९३७ पर्यंत होता. या काळात त्याने विधवा, वृद्ध यांची निवृत्तिवेतने, बेघरांना घरे, बेकारांना नोकऱ्या वगैरे प्रश्न समाधानकारक रीत्या हाताळले. त्यामुळे बाल्डविननंतर त्याला नेतृत्व प्राप्त होऊन तो इंग्लंडचा पंतप्रधान झाला.

या वेळी जर्मनी आणि इटली यांनी चढाईचे धोरण स्वीकारल्याने यूरोपातील शांतता भंग पावली होती. म्हणून त्याने म्यूनिक येथे फ्रान्स, इटली, इंग्लंड व जर्मनी यांची परिषद बोलावून एक महत्त्वाचा करार घडवून आणला. त्यान्वये जर्मनीच्या मागण्या मान्य करण्यात आल्या; तथापि जर्मनीने हा म्यूनिक करार मोडून युद्ध पुकारले आणि पोलंड, नॉर्वे हे देश पादाक्रांत केले. तेव्हा चेंबरलिनने युद्धाची घोषणा केली, पण ही युद्धजन्य परिस्थिती त्याला यशस्वी रीत्या हाताळता येईना. म्हणून १० मे १९४० रोजी त्याने राजीनामा दिला. पुढे तो काही दिवस चर्चिल यांच्या मंत्रिमंडळात होता; पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे लवकरच राजकारणातून निवृत्त झाला.

हेकफिल्ड येथे तो मरण पावला.

संदर्भ :

  •  Feiling, Keith, The Life of Naville Chamberlain, London, 1946.
  • Taylor, A. J. P. English History, 1914 –1965, London, 1965.