जगातील नवलपूर्ण, सर्वश्रेष्ठ व उल्लेखनीय बाबींचा तसेच विश्वाच्या निर्मितीबाबतचा शोध घेण्याची जिज्ञासा मानवाला प्राचीन काळापासून आहे. या जिज्ञासेतूनच आश्चर्यचकित किंवा

सात आश्चर्ये

नवलपूर्ण गोष्टींची नोंद ठेवण्यास प्रारंभ झाला. इ. स. पू. दुसऱ्या शतकापासून अशा नोंदी ठेवलेल्या आढळतात. ॲलेक्झांड्रियन किंवा ग्रीकांश संस्कृती (हेलेनिस्टिक) काळातील प्रवासी मार्गदर्शक पुस्तिकांमध्ये तत्कालीन वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचनांचा उल्लेख केलेला आढळतो. यांवरून सात आश्चर्यांची परंपरा ॲलेक्झांड्रियन काळापासून सुरू झाल्याचे दिसते. समाज जसजसा बदलत गेला, तसतसे त्याचे दृष्टिकोनही बदलत गेले; परिणामी प्रारंभापासून आजपर्यंतच्या आश्चर्यांची सूचीही वारंवार बदलत गेली.

पूर्वेतिहास : आश्चर्यांची सूची तयार करताना जगभरातील ‘सात’ आश्चर्ये निश्चित करण्यात आली. आश्चर्यांची संख्या सातच का? असा प्रश्न उपस्थित होतो. यासंदर्भात काही खुलासे दिले जातात. पायथॅगोरस यांनी (इ. स. पू. सहावे शतक) सात अंक पवित्र मानून आश्चर्यांसाठीही तोच अंक वापरला असावा. पूर्वीच्या चिनी संकेतपद्घतींमध्ये हा अंक महत्त्वाचा मानला आहे. ग्रीक, हिब्रू व ख्रिश्चन संस्थापकांचे तत्त्वज्ञान, गूढात्मकता तसेच विविध प्रकारच्या कलांमधून ‘सात’ या अंकाची वैशिष्ट्ये प्रतिबिंबित होतात. काहींच्या मते, सात हा अंक परिपूर्ण वाटतो; कारण त्यामध्ये तीन आणि चार या पूर्ण अंकांचा समावेश आहे. पूर्ण अंक अशासाठी की, त्रिकोण आणि चौकोन यांच्या वापरातून देशीपणाचे प्रदर्शन घडते. बायबलमधील नवा करार (न्यू टेस्टामेंट) या भागात सात अंकाचा अनेकदा वापर केलेला आढळतो. तत्कालीन विविध उदाहरणांतून सात अंकाचे महत्त्व मान्य केलेले दिसून येते. उदा., ग्रीसमधील सात शहाणे, रोममधील सात द्रष्टे, तसेच सात टेकड्या इत्यादी. शेक्सपिअर यांनीही माणसाच्या वयाचे सात भिन्न प्रकार मानले आहेत. भारतीयांनीसुद्घा प्राचीन काळापासून सात या आकड्याला महत्त्व दिलेले आहे. उदा., सप्तर्षी, सप्तरत्ने, सप्तकिरण, सप्तछंद, सप्तस्वर, सप्तयज्ञ, सप्तपदी इत्यादींची संख्या सातच आहे. केवळ आश्चर्यांच्या निवडीमागील निकष बदलत गेलेले आहेत.

आश्चर्यांचे वर्गीकरण : इ. स. पू. दुसऱ्या शतकापासून सुरू झालेल्या आश्चर्ये नोंदविण्याच्या पद्घती आजही चालू आहेत; मात्र कालानुरूप त्यात बदल घडत गेले. मानवाने निसर्गात हस्तक्षेप करावयास सुरूवात केली, तसतसे मानवास निसर्गाच्या भव्यतेचा आणि सौंदर्याचा प्रत्यय आला. नवनवीन शोध लावले गेले. विज्ञान-तंत्रज्ञान विकसित होऊन अकल्पित गोष्टी अनुभवास येऊ लागल्या. यातील अभूतपूर्व गोष्टींचा उल्लेख माणसाने आश्चर्यांत केला. निसर्गनिर्मित व मानवनिर्मित असे आश्चर्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत. निसर्गनिर्मित आश्चर्ये ही स्थायी स्वरूपाची असतात. अगदी क्वचितच, निसर्गातील प्रचंड घडामोडींमुळे त्यांमध्ये बदल होऊ शकतो. मानवनिर्मित आश्चर्ये मात्र कालांतराने बदलत असतात. मानवनिर्मित आश्चर्यांत विविध प्रकारच्या वास्तुरचना, विज्ञान-तंत्रज्ञानातील नवनवे शोध यांचा समावेश होतो. आश्चर्यांचे वर्गीकरण काळानुसारही केले जाते. प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा काळांत हे वर्गीकरण करण्यात येते. यांपैकी मध्ययुगीन व अर्वाचीन आश्चर्यांमधील काही आश्चर्यांत साम्य दिसून येते.

प्राचीन आश्चर्ये : प्राचीन आश्चर्यांची सर्वांत अलीकडची सूची इ. स. पू. दुसऱ्या शतकात सिडॉनच्या अँटिपेटर या ग्रीक लेखकांनी आपल्या प्रवास मार्गदर्शक पुस्तिकेत दिलेली आहे. त्यानंतर याच शतकात एका अज्ञात निरीक्षकाने अँटिपेटर यांच्या यादीत काही बदल करून अंतिम यादी तयार केली. ही व्यक्ती बहुधा बायझंटिन गणिती फिलॉन असावी, असे मानले जाते. जागतिक सात आश्चर्यांच्या पहिल्या यादीमध्ये तत्कालीन जगातील सर्वाधिक छाप पाडणाऱ्या कलाकौशल्यपूर्ण वास्तूंचा समावेश होता. यांतील बहुतांश आश्चर्ये भूमध्यसागरी प्रदेश व मध्यपूर्वेत स्थित आहेत. यांतील काही वास्तू काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत व काहींची पडझडही झाली आहे. ही आश्चर्ये पुढीलप्रमाणे :

(१) कूफूचा पिरॅमिड : ईजिप्तमधील कैरोच्या नैर्ऋत्येस पाच किमी.वरील गीझा येथे कूफूचा पिरॅमिड आहे. वास्तुरचनेतील कलात्मकता आणि भव्यता दाखविणाऱ्या या पिरॅमिडचे आज केवळ अवशेष शिल्लक आहेत.

(२) बॅबिलनच्या झुलत्या बागा : बॅबिलोनिया या प्राचीन साम्राज्याची राजधानी असलेल्या बॅबिलन येथे बॅबिलोनियाचा राजा दुसरा नेबुकॅड्नेझर यांनी आपल्या कारकीर्दीत (कार. इ. स. पू. ६०५ – ५६२) या झुलत्या बागांचे बांधकाम करवून घेतले. या झुलत्या बागांचा आणि भिंतींचा कालांतराने हळुहळू नाश होत गेला.

(३) झ्यूसचा पुतळा : ग्रीसमधील ऑलिंपिया या प्राचीन स्थळी ग्रीक शिल्पकार फिडीयस यांनी ग्रीक देवतासमूहामधील सर्वश्रेष्ठ देव झ्यूस याचा पुतळा तयार केला. इ. स. पू. सु. ४६२ मध्ये या १२·२५ मी. उंचीच्या पुतळ्याची आकृती पूर्ण झाली. सिंहासनाधिष्ठित झ्यूसची मूर्ती हस्तिदंत आणि सोने यांपासून तयार केली होती. सहाव्या शतकातील भूकंपामध्ये झ्यूसचा पुतळा उध्वस्त झाला असावा.

(४) डायना किंवा आर्टेमिसचे मंदिर : रोमन देवतासमूहातील डायना ही एक स्त्रीदेवता आहे. प्राचीन आशिया मायनर प्रदेशातील इफसस येथील हे मंदिर होय. इ. स. पू. चौथ्या शतकात पेअरिअन प्रकारच्या संगमरवरात बांधकामास सुरुवात झालेल्या या मंदिराची लांबी अंदाजे १०४ मी., तर रुंदी १०५ मी. होती. १८ मी. पेक्षा उंच असलेल्या १२७ दगडी स्तंभांमुळे हे मंदिर तत्कालीन रचनांमध्ये सुप्रसिद्घ होते. इ. स. २६२ मध्ये गॉथ या रानटी जर्मन जमातीने ते नष्ट केले.

(५) हॅलिकार्नसस येथील कबर : आशिया मायनरमधील कारीआचा राजा मॉसोलस (मृत्यू इ. स. पू. ३५३) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांची पत्नी – राणी आर्टिमिझिया हिने ही कबर बांधून घेतली. तिची उंची ४३ मी. होती. शुभ्र संगमरवरामुळे ही कबर लक्षवेधक झाली. या कबरीचा शिखरावरील भाग इ. स. १४०० पूर्वी भूकंपामध्ये नष्ट झाला.

(६) रोड्झ येथील पुतळा : ग्रीसच्या इजीअन समुद्रातील रोड्झ या बेटावरील रोड्झ बंदराजवळ हीलीऑस या सूर्यदेवतेचा भव्य पुतळा इ. स. पू. २९२ – २८० या कालावधीत उभारण्यात आला. ब्राँझ धातूच्या या पुतळ्याची उंची ३२ मी. होती. इ. स. पू. २२४ मध्ये झालेल्या भूकंपामध्ये हा नष्ट झाला. प्रचलित दंतकथेनुसार याचे अवशेष अनेक वर्षे त्या बेटावर होते. त्यांचे जतन करण्यासाठी इ. स. ६७२ मध्ये ते अवशेष एका मुस्लिम सेनापतीने एमझा येथील एका ज्यू गृहस्थास विकल्याचे सांगितले जाते.

(७) ॲलेक्झांड्रियाचे दीपगृह : ईजिप्तमधील ॲलेक्झांड्रिया बेटाच्या प्रवेशद्वारावर ईजिप्तचा राजा दुसरा टॉलेमीच्या कारकीर्दीत (इ. स. पू. ३०९ – २४६) हे दीपगृह बांधण्यात आले. त्यांची रचना ग्रीक वास्तुशिल्पज्ञ सॉस्ट्राटस यांनी केली. दीपगृहाची रचना तीन वेगवेगळ्या आकारांत केली असून तळाचा आकार चौकोनी, मधला भाग अष्टकोनी, तर शिखरावरचा भाग वर्तुळाकृती आहे. वर्तुळाकृती भागात सातत्याने आगीच्या ज्वाळा धगधगत असत. त्यामुळे संपूर्ण दीपगृह उजळून निघे. तेराव्या शतकात ते भूकंपात कोसळले.

मध्ययुगीन आश्चर्ये : सहाव्या शतकात टुअरच्या सेंट ग्रेगरी यांनी जगाच्या तत्कालीन ज्ञात माहितीच्या आधारे जगातील सात आश्चर्यांची नव्याने सूची तयार केली. ग्रेगरी यांनी आश्चर्यांची जी दुसरी यादी तयार केली, तिच्यातील आश्चर्यांना देवाच्या हातांनी निर्मिलेली आश्चर्ये म्हटले होते. मध्ययुगातील सर्वमान्य झालेली सात आश्चर्ये पुढीलप्रमाणे :

(१) कॉलॉसिअम : रोम येथे हे जगप्रसिद्घ प्राचीन कॉलॉसिअम (रंगमंडल) असून त्यास ‘प्लेव्हिअन अँपिथिएटर’ असेही म्हणतात. आजही ते अवशिष्ट आहे.

(२) भूमिगत थडगी (कॅटकोम) : ईजिप्तमधील ॲलेक्झांड्रिया येथे अशी भूमिगत थडगी अस्तित्वात होती. नवव्या शतकात तुर्कांनी त्यांचा पूर्णपणे विध्वंस केला.

(३) चीनची भिंत : वास्तुशास्त्र दृष्ट्या जगातील सर्वांत लांबीची चीनची भिंत अजून आजही ती सुस्थितीत आहे.

(४) स्टोनहेंज : इंग्लंडमधील सॉल्झबरी येथील प्रचंड दगडी शिळांचे हे वर्तुळाकृती अवशेष आहेत. प्रागैतिहासिक काळात सूर्यमंदिर किंवा थडगे म्हणून स्टोनहेंजची उभारणी केल्याचे मानले जाते.

(५) पॉर्सलिन टॉवर (पॅगोडा) : चीनमधील नानकिंग येथे बांधलेला हा नऊ मजली पॅगोडा (उंची सु. ७९·२५ मी.) उंच पंधराव्या शतकात उभारण्यात आला. इ. स. १८५० च्या सुमारास तो नष्ट झाला.

(६) पीसाचा झुकता मनोरा : इटलीतील पीसा या ऐतिहासिक शहरात हा झुकता मनोरा आहे.

(७) हाज सोफिया (सेंट सोफिया) : तुर्कस्तानमधील इस्तंबूल (कॉन्स्टँटिनोपल) येथे जस्टिनिअन द ग्रेट (कार. इ. स. ५२७ – ५६५) यांनी ही चर्चवास्तू बांधून घेतली. तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल काबीज केल्यानंतर इ. स. १४५३ मध्ये या चर्चचे मशिदीत रूपांतर करण्यात आले. तत्पूर्वी दहाव्या आणि चौदाव्या शतकांत या वास्तूची डागडुजी करण्यात आली. बायझंटिन वास्तुकलेचा हा एक उत्कृष्ट नमुना असून त्या ठिकाणी आता बायझंटिन कलासंग्रहालय आहे.

अर्वाचीन आश्चर्ये : जगातील सर्वमान्य झालेली आधुनिक आश्चर्ये पुढीलप्रमाणे आहेत : (१) ईजिप्तचा महापिरॅमिड, (२) कॉन्स्टँटिनोपलचे हाज सोफिया (सेंट सोफिया), (३) पीसाचा झुकता मनोरा, (४) ताजमहाल (भारत), (५) वॉशिंग्टनचे स्मारक : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डी. सी. येथे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे स्मारक आहे. हे संगमरवरी स्मारक १६९·२९ मी. उंच असून ते शंकुस्तंभ ऑबेलिस्क आकारात १८८५ मध्ये बांधले. शहराच्या कोणत्याही भागातून हे स्मारक दिसते. तसेच त्यात फिरता जिना असून त्याच्या वरच्या बाजूने शहराचे विहंगम दृश्य दिसते. (६) आयफेल टॉवर : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आयफेल टॉवर हा जगप्रसिद्घ मनोरा आहे. (७) एंपायर स्टेट बिल्डिंग : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील ही १०२ मजली इमारत १९३१ मध्ये बांधण्यात आली. या इमारतीची मूळ उंची ३८१ मी. होती. १९५१ मध्ये तिच्यावर ६८ मी. उंचीचा दूरचित्रवाणी मनोरा उभारल्यामुळे वास्तूची उंची ४४९ मी. पर्यंत वाढली. १९५४ पर्यंत ही जगातील सर्वांत उंच इमारत होती.

न्यू ओपन वर्ल्ड कॉर्पोरेशन (२००७) या महामंडळाने मतदान घेऊन नव्याने सात आश्चर्ये निवडली. ती पुढीलप्रमाणे : (१) ताजमहाल (भारत), (२) चीनची भिंत (चीन), (३) रोमचे कॉलॉसिअम (इटली), (४) पेत्रा (जॉर्डन) येथील गुलाबी खडकातील शिल्पावशेष, (५) रीओ दे जानेरो येथील ख्रिस्त पुतळा (ब्राझील), (६) माचू-पिक्चूतील इंका संस्कृतीचे अवशेष (पेरू), (७) माया संस्कृतीकालीन चीचेन ईत्सा शहर (मेक्सिको).

आश्चर्यांच्या या सूचींमध्ये वेळोवेळी विविध, नवनवीन आश्चर्यांचा समावेश केलेला दिसून येतो. पनामा कालवा, न्यूयॉर्क शहरातील हवाई वाहतूक व भुयारी लोहमार्ग, अक्रॉपलिस (ग्रीस) येथील पार्थनॉन मंदिर, सेंट पीटरचे चर्च (रोम), फ्रान्सच्या अपतट किनारी भागातील मध्ययुगीन माँ सँ मीशेल द्वीप, ॲल हॅम्ब्रा वास्तूसमूह (स्पेन), कारनॅक येथील ॲमन देवतेचे मंदिर (ईजिप्त), ख्मेर प्रजासत्ताकातील अंकोर, निकोच्या (होन्शू-जपान) राष्ट्रीय उद्यानातील मंदिरे, सॅन फ्रॅन्सिस्कोमधील गोल्डन गेट, झुलता पूल इत्यादी आश्चर्यांमध्ये गणले जातात.

निसर्गनिर्मित आश्चर्ये : अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच्या वाङ्‌मयामधून निसर्गाला विशेष महत्त्व दिले जाऊ लागले. तसेच प्रवासाला महत्त्व येऊ लागले. एकोणिसाव्या शतकातही हा दृष्टिकोण जाणीवपूर्वक जोपासला गेला. परिणामी पुढील काळात निसर्गातील सौंदर्यस्थळे आश्चर्यांमध्ये गणली जाऊ लागली. ती पुढीलप्रमाणे : (१) अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कोलोरॅडो नदीवरील ग्रँड कॅन्यन. (२) रीओ दे जानेरो बंदर (ब्राझील), तसेच केपटाउन बंदर (दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक). (३) ईग्वासू धबधबा (अर्जेंटिना), तसेच व्हिक्टोरिया (झँबिया-झिंबाब्वे), यलोस्टोन (संयुक्त संस्थाने), नायगारा (संयुक्त संस्थाने, कॅनडा), एंजेल (व्हेनेझुएला), ग्वाइरा (ब्राझील, पॅराग्वाय) या धबधब्यांचाही समावेश आश्चर्यांमध्ये केला जातो. (४) कॅलिफोर्नियातील योसेमिटी दरी आणि सीक्वाया हे प्रचंड पुरातन वृक्ष. (५) मौंट एव्हरेस्ट (हिमालय), मॅटरहॉर्न शिखर (आल्प्स), पेरूमधील तटासारखा उभा असलेला अँडीज पर्वत. (६) नाईल नदी. (७) उत्तर ध्रुवीय प्रकाश किंवा ऑरोरा बोरिॲलिस (नॉर्दर्न लाइट्स).

भारतातील आश्चर्ये : जागतिक स्तरावर ज्याप्रमाणे आश्चर्यांची सूची तयार केली जाते, त्याप्रमाणे भारतातील आश्चर्यांची सूची करण्यात येते. संकेतकोशामध्ये (१९६४) भारतातील पुढील सात मानवनिर्मित आश्चर्यांचा उल्लेख आढळतो. (१) ताजमहाल (आग्रा, उ. प्रदेश), (२) वेरूळची लेणी (औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र), (३) गोलघुमट (विजापूर, कर्नाटक), (४) कुतुबमीनार (दिल्ली), (५) मीनाक्षी मंदिर (मदुराई, तमिळनाडू), (६) गोमटेश्वराची मूर्ती (श्रवणबेळगोळ, कर्नाटक), (७) चितोडगढचा कीर्तिस्तंभ (राजस्थान). यांशिवाय देशातील विविध संस्थांमार्फत सात आश्चर्यांच्या याद्या प्रसिद्घ होतात. त्यांनुसार २०१० मध्ये प्रामुख्याने सुवर्णमंदिर (पंजाब), वृंदावन बाग, गिरसप्पा धबधबा, हंपी (कर्नाटक), शालिमार उद्यान (जम्मू व काश्मीर), कोनारकचे सूर्यमंदिर (ओरिसा), नालंदा (बिहार), खजुराहो (मध्यप्रदेश), अजिंठा (महाराष्ट्र) इत्यादींचा समावेश होता. राज्यस्तरावरही अशा याद्या प्रसिद्घ केल्या जातात.

जगातील आश्चर्यांच्या नोंदींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नवनवे शोध, नवीन तंत्रज्ञान यांमुळे विविध क्षेत्रांत अकल्पित गोष्टींची भर पडत आहे. त्यानुसार विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यक, वाहतूक, संदेशवहन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधील आश्चर्यांच्या स्वतंत्र सूची केलेल्या आढळतात.

समीक्षक : माधव चौंडे