पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अथवा पृष्ठभागासंबंधित कोणत्याही भौगोलिक माहितीचे संग्रहण, संकलन, संघटन आणि विश्लेषण, विशेष आज्ञावलीच्या साहाय्याने करणाऱ्या संगणकीय प्रणालीला भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) म्हणतात. रॉजर टॉम्लिन्सन यांनी १९६० मध्ये कॅनडाच्या शासनासाठी पहिली भौगोलिक प्रणाली विकसित केली. हे तंत्रज्ञान १९६१ पासूनच जगभरात उपयोगात येत आहे. मोठ्या प्रमाणावरील अंकिय सांख्यिकीचे व्यवस्थापन व विश्लेषण करणारे प्रगत तंत्रज्ञान म्हणून वैज्ञानिक जगतात आता याची गणना होऊ लागली आहे. ही सांख्यिकी माहिती अभिक्षेत्रीय / अवकाशिक (Spatial)  असावी हा त्यातला महत्त्वाचा भाग आणि त्याचबरोबर ही माहिती स्थान आकलनाच्या दृष्टीने भूसंदर्भीय (Geo – referenced) असणेही आवश्यक आहे.

हे तंत्रज्ञान नकाशाशास्त्र, संगणकशास्त्र, अभियांत्रिकी, पर्यावरणशास्त्र, भूस्थापत्य, दूर संवेदन, संख्याशास्त्र व सर्वेक्षण अशा अनेकविध विदयाशाखांतील संकल्पना व विचार यांचा अभ्यास करून तयार केलेले तंत्र आहे. अशा सर्व भूसंदर्भीय माहितीचे एकत्रीकरण करणे, तिचा संचय करणे, पृथ:करण करणे आणि त्यावरून प्रदेशांतील परिस्थितीचे प्रारूप तयार करणे या सर्व गोष्टींचा समावेश भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये होतो. त्यांचा वापरही विविध क्षेत्रात परिणामकारकपणे केला जात असून एकाच वेळी अनेक घटकांचे पृथ:करणही या तंत्राची मोठी ताकद आहे.

         भौगोलिक माहिती प्रणाली : कार्यपद्धती प्रारूप

भारतामध्ये १९८० पासून भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर सुरू झाला. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्रतिमा मिळविण्यासाठी भारतात इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट (IRS) आणि संलग्न सुधारित श्रेणींचे कृत्रिम उपग्रह वापरतात. त्यासोबतच स्थलरूपी अभिव्यक्ती (Topographic Expressions), सागर, हवामान व  नैसर्गिक संसाधनासंबंधी तसेच भारतीय सरहद्दीवरील अतिक्रमण आणि संशयास्पद हालचालींचा अंधारातही रडारद्वारे मागोवा घेऊन अचूकतेने विशेष माहिती मिळविण्यासाठी अनुक्रमे कारटोसॅट (Cartosat), ओशनसॅट (Oceansat), मेटसॅट (Metsat), रिसोर्ससॅट (Resourcesat) आणि रडार इमेजिंग सॅटेलाइट या वैशिष्ट्यपूर्ण विशेष उपग्रहांची मदत घेतली जाते. प्रसंगी हवाई छायाचित्रांचेही (Aerial photographs) साहाय्य घेतले जाते. कृषिक्षेत्र, आपत्ती-व्यवस्थापन, ई-प्रशासन, हवामान, आरोग्य, परिस्थितिकी, पर्यावरण, मृदा, जल-व्यवस्थापन, पांणलोट विकास, शहर नियोजन, विकास व शहरांची वाढ, लोकसंख्या, शिक्षण, दळणवळण, वने, ग्रामीण विकास, वन्यजीव व्यवस्थापन, स्थानिक प्रदेशांचा विकास, पर्यटन, भूमी आलेख, लष्करी व संरक्षण विषयक, इतर समाजोपयोगी घटक आणि सेवा इत्यादींसंबंधी माहिती व सूचना उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे या प्रणालीचा वापर केला जातो आहे. भारतात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (भारत सरकार) अंतर्गत राष्ट्रीय भौगोलिक (भू) माहिती केंद्राच्या (National Centre of Geo-informatics;NCoG) वतीने त्या प्रणालीच्या वापरासंबंधीची कार्यपद्धती ठरविली जाते आणि ती अंमलात आणली जाते.

गुगल अर्थ या जगभर वापरल्या जाणाऱ्या संगणकीय उपयोजनामागे अशीच भौगोलिक माहिती प्रणाली आहे. त्या उपयोजनात आंतरराष्ट्रीय उपग्रहांद्वारे आणि हवाई छायाचित्रणाद्वारे मिळविलेल्या प्रतिमांचा वापर करून सर्व स्थानिक ‍तपशिलांनी युक्त अशी आभासी पृथ्वी निर्माण करण्यात आली आहे.

भूमाहिती विज्ञान : ही माहिती विज्ञानाशी संबंधित उपयोजित विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखा आहे. भूतलावरील विविध समस्यांची उकल करण्यासाठी माहिती विज्ञानातील पायाभूत सुविधांचा वापर या शास्त्रात केला जातो. यामध्ये मुख्यत्वेकरून माहितीचे संकलन, संघटन, साठवण, वैज्ञानिक आणि सांख्यिकी प्रक्रिया, विश्लेषण, सादरीकरण आणि भौगोलिक माहितीचे प्रसारण केले जाते. काही ठिकाणी भूगर्भशास्त्र (Geomatics) ही समानअर्थी संज्ञा वापरली जाते, ज्यामध्ये अशा प्रकारे माहितीचे संकलन केले जाते. परंतु यामध्ये भौगोलिक सर्वेक्षणातून मिळविलेल्या माहितीवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. तसे पाहता भूगर्भशास्त्र आणि भूमाहितीशास्त्र ह्या दोन्ही शाखांचा माहिती मिळविण्याचा पाया हा भूपृष्ठमिती (Geodesy) शास्त्रातील सिद्धांत आणि व्यावहारिकतेशी निगडित आहे.

पृथ्वीच्या ज्या भागात निरीक्षणासाठी कोणी पोहोचू शकत नाही, अशा सर्व भागांतील प्रदेशांची सर्वांगीण माहिती, आता उपग्रहांद्वारे प्राप्त झालेल्या विविध प्रकारांच्या प्रतिमा, छायाचित्रे, नकाशे आणि अंकीय अवकाशिक माहितीच्या (Digital spatial) आधारे आणि भौगोलिक माहिती प्रणालीच्या साहाय्याने, विविधांगाने विश्लेषणासह मिळत आहे. भूविज्ञान, भूगोल आणि इतर संलग्न विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयातील, पृथ्वीच्या पृष्ठभागाशी संबंधित (वातावरण, जलावरण, शिलावरण आणि जीवावरण) अनेक उपशाखांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास या शास्त्राची मोठी मदत होते आहे.

भूमाहिती विज्ञानात इंटरनेट तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीत्या जोडलेल्या संगणकाच्या माध्यमातून (Wired and no wired / Wireless  Computers) मानव संगणक संवादाद्वारे (Man-Computer Interaction) उपग्रहांद्वारे प्राप्त भूअवकाशिय (Geospatial) माहितीचे संकलन (Database/processing), संग्रहण (Storage), शास्त्रशुद्ध रचना आणि त्याचा आराखडा (Scientific Framework and it’s design), व्यवस्थापन (Management), विश्लेषण (Analysis) आणि प्रारूप निर्मिती (Modelling) करून उद्भवलेल्या किंवा उद्भवणाऱ्या समस्येवर योग्य उपाय सुचविले जातात.

                                                                                                                                                   समीक्षक : डॉ. श्रीनिवास वडगबाळकर