फिनलंडच्या आग्नेय भागातील गोड्या पाण्याची सर्वांत मोठी सरोवर प्रणाली आणि याच नावाचे एक सरोवर. या गुंतागुंतीच्या सरोवर प्रणालीत परस्परांना जोडली गेलेली सुमारे १२० सरोवरे, तसेच अनेक नद्या व प्रवाह आहेत. या प्रणालीतील सर्वांत मोठ्या भागाला ‘इसो साइमा’ किंवा ‘ग्रेट साइमा’ या नावाने ओळखले जाते. हेलसिंकी (फिनलंड) शहराच्या ईशान्येस आणि रशियाच्या सरहद्दीपासून जवळ ही प्रणाली आहे. फिनलंडच्या सुमारे ४,३७७ चौ. किमी. क्षेत्रात तिचा विस्तार आढळतो. या प्रणालीत विविध प्राकृतिक स्वरूपे आढळतात. द्रुतवाहयुक्त वेगाने वाहणारे असंख्य जलप्रवाह आणि सुमारे १४,००० बेटे त्यात आहेत. या सरोवर प्रणालीचे जलनि:सारण साइमा सरोवर, व्हऑक्सी नदी आणि साइमा कालव्याद्वारे फिनलंडच्या आखाताकडे आणि रशियातील लॅडोगा सरोवराकडे झाले आहे. यातील साइमा या ६० किमी. कालव्याची निर्मिती १८५६ मध्ये करण्यात आली आहे. या कालव्याचा काही भाग फिनलंडमध्ये, तर काही भाग रशियात आहे.

साइमा सरोवर प्रणालीच्या दक्षिण भागात साइमा हे प्रमुख सरोवर असून त्याचा विस्तार १,१४७ चौ. किमी. आहे. या सरोवराच्या दोन शाखा असून त्या लॅपीनरांतापासून उत्तरेच्या दिशेने ३५० किमी. पर्यंत पसरलेल्या आहेत.

हिमयुगाच्या अखेरीस हिमनद्या वितळून या सरोवर प्रणालीची निर्मिती झाली आहे. सुमारे ६,००० वर्षांपूर्वी याचा विस्तार सुमारे ९,००० चौ. किमी. क्षेत्रात असावा.

डिसेंबर अखेर ते एप्रिल अखेर या प्रणालीतील बहुतांश भाग गोठलेला असतो. एरव्ही खुला असताना त्यातून जलवाहतूक केली जाते. साइमा सरोवर प्रणालीतील एकमेकांना जोडली गेलेली सरोवरे, नद्या, प्रवाह, साइमा कालवा यांच्या माध्यमातून जलमार्गांचे दाट जाळे निर्माण झाले आहे. आवश्यकतेनुसार त्यांच्या मार्गात जलपाश निर्माण केले आहेत. या जलमार्गांचा उपयोग लाकूड, खनिजे, लाकडाचा लगदा व इतर मालाच्या आणि पर्यटकांच्या वाहतुकीसाठी केला जातो. जलमार्गांनी येथील प्रमुख शहरे एकमेकांना जोडली गेली आहेत. जोएनसू, कूओपिओ, लॅपर्नराटा, मिकेली व सॅव्हानलिना ही येथील प्रमुख शहरे आहेत. लाकूड कापकाम, लाकडाचा लगदा व कागदनिर्मिती हे या प्रदेशातील प्रमुख उद्योग आहेत. प्रणालीच्या दक्षिण भागात मोठी जलविद्युतनिर्मिती केंद्रे आहेत. त्यांपैकी रशियाच्या सरहद्दीजवळील इमातारा हे केंद्र विशेष प्रसिद्ध आहे.

येथील निसर्गसुंदर सरोवरे, टेकड्या, वने इत्यादी पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. व्हॉल स्ट्रिट जर्नलने २०१४ मध्ये तयार केलेल्या जगातील पाच सुंदर सरोवरांच्या यादीत साइमा सरोवराचा उल्लेख आहे. या सरोवरात गोड्या पाण्यातील दुर्मिळ रिंग्ड सील आढळतात.

समीक्षक : वसंत चौधरी