इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल्स अ‍ॅण्ड मटेरियल टेक्नॉलॉजी (आयएमएमटी) ही पदार्थ अभियांत्रिकी आणि खनिजशास्त्राच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणारी एक महत्त्वाची आणि प्रगत संशोधन संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९६४ मध्ये करण्यात आली. या संस्थेचे कार्यालय भुवनेश्वर (ओडिशा) येथे आहे. पूर्वी ही संशोधन संस्था प्रादेशिक संशोधन प्रयोगशाळा, भुवनेश्वर या नावाने ओळखली जात असे. या संशोधन संस्थेची स्थापना झाल्यापासून या संस्थेने पदार्थ अभियांत्रिकी आणि खनिजशास्त्रातील तंत्रज्ञानाची निर्मिती आणि या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) इतर संलग्न संशोधन संस्थांप्रमाणे ही संस्थादेखील सीएसआयआरशी संलग्न संस्था आहे.

उद्दिष्ट आणि उपक्रम :  पदार्थ अभियांत्रिकी व खनिजशास्त्र संशोधनातील एक नेतृत्व निर्माण व्हावे या दीर्घकालीन उद्देशाने २००७ मध्ये संस्थेचे नाव बदलून ते इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल्स अ‍ॅण्ड मटेरियल्स टेक्नॉलॉजी (आयएमएमटी) असे करण्यात आले. या संस्थेने स्थापनेपासूनच मूलभूत आणि उपयोजित संशोधनावर भर दिलेला आहे. नैसर्गिक स्रोतांचे व्यावसायिक शोषण रोखण्यासाठी खाजगी व सरकारी भागीदारीच्या (Public Private Partnership, PPP) माध्यमातून काम करणे तसेच शून्य कचरा प्रक्रियेसाठी अत्याधुनिक सल्ला सेवा राबवणे इत्यादी उपक्रम या संस्थेने हाती घेतले. आयएमएमटीमध्ये सुमारे गेल्या दशकापासून संशोधन आणि विकास यांवर जास्त भर देण्यात आलेला आहे. यामुळे खनिज क्षेत्रातील भारतीय उद्योगांना जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी निश्चितपणे मोलाची मदत झालेली आहे.

आयएमएमटी ही खनिजशास्त्राच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणारी संस्था असली तरी  सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार संस्थेला विज्ञान क्षेत्रातील  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि अभियांत्रिकीच्या या इतर शाखांमधील संशोधनाशी जुळवून घेत आंतरविद्याशाखीय संशोधन (Interdisciplinary research) करावे लागते. या संस्थेमध्ये खनिज आणि धातू उद्योगाचे संशोधन आणि विकास यांसंबंधित समस्यांचे निराकरण करण्याकरिता तसेच त्याच्या शाश्वत विकासासाठी विविध विषयांमध्ये मूलभूत संशोधन आणि तंत्रज्ञानात्मक कार्यक्रम आयोजित करण्याकरिता अनेक तज्ञ कार्यरत आहेत.

खाणीशी संबंधित संशोधनातील खनिज प्रक्रिया, जैव-खनिज प्रक्रिया, धातू निष्कर्षण पद्धती (Metal extraction), प्रक्रिया अभियांत्रिकी, औद्योगिक कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, समुद्री आणि वन उत्पादने विकास, औषधी व सुगंधी वनस्पतींचे उपयोग, कलिल आणि पदार्थ रसायनविज्ञान (Colloid and material chemistry)  आणि पर्यावरणीय स्थिरता हे आयएमएमटीच्या संशोधनाचे प्रमुख विषय आहेत.

कार्यक्षेत्र : उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे तयार झालेल्या नवीन धोरणांच्या परिणामांमुळे देशात खनिज उत्पादन आणि खनिज उपयोगाच्या स्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. या बदलांना अनुसरून आयएमएमटीचे खनिज प्रक्रिया विभाग (Mineral processing Department) सध्या हलक्या दर्जाच्या खनिज वापराशी निगडित असलेल्या विविध समस्यांचे निराकरण कसे करता येईल, याबाबत संशोधन करत आहे.

तसेच (१) कनिष्ठ दर्जा श्रेणीतील अयस्क (पर्यायी इंग्रजी शब्द येथे द्यावा) व खनिजांचे मूल्यमापन करणे, योग्य प्रवाह पत्रके विकसित करण्यासाठी वापर करणे, (२) व्यावसायिक/औद्योगिक उत्पादनासाठी (Scale up) रचनाकृती/आराखडा (Design data) तयार करणे, (३) गुंतागुंतीच्या खनिजांच्या प्रक्रियेसाठी अभिनव तंत्रांचा विकास करणे, (४) कचरा आणि तत्सम उत्पादने यांपासून मौल्यवान वस्तू निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेचा विकास करणे, (५) विविध वनस्पती व रोपांच्या कार्यक्षमतेत योग्य बदल करून सुधारणा करणे, (६) खनिज प्रक्रियेमध्ये आवश्यक असलेल्या उत्पादनासाठी लागणाऱ्‍या ऊर्जेमध्ये कपात करण्यात यश मिळवणे, (७) खनिज, धातू व रासायनिक उद्योगांशी संबंधित पर्यावरण प्रदूषणाचा अभ्यास करणे अशा अनेक विषयांवर ही संस्था संशोधन करीत आहे.

शैक्षणिक उपक्रम :  आयएमएमटी ही संशोधन संस्था पदार्थ अभियांत्रिकी आणि खनिजशास्त्र या विषयांतील देशातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र देखील आहे. तेथील ॲकॅडेमी ऑफ सायन्स अँड इनोव्हेटिव्ह रिसर्च (AcSIR) या केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना पीएच. डी. या पदवीचे शिक्षण पुरविले जाते. तसेच आयएमएमटी देशातील अनेक विद्यापीठांशी पीएच.डी. आणि इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी संलग्न आहे. आयएमएमटी दरवर्षी महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकल्प संशोधन पूर्ण करण्यासाठी गुणवत्तेवर आधारित प्रवेश देते. अभियांत्रिकी व विज्ञान शाखांमधील अनेक विद्यार्थी येथे त्यांचे पदवी व पदव्युत्तर स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतात.

 समीक्षक : अ. पां. देशपांडे