औद्योगिक वापरासाठीचे जलशुद्धीकरण 

मालाचे उत्पादन करताना पाण्याचे विविध उपयोग असे : १) कच्चा माल म्हणून, २) विद्रावक म्हणून, ३) वाफ उत्पन्न करण्यासाठी, ४) यंत्रणा थंड ठेवण्यासाठी, ५) कच्चा माल वाहून नेण्यासाठी, ६) औद्योगिक अपशिष्ट (Industrial pollutants) वाहून नेण्यासाठी, ७) अग्निशमनासाठी, ८) बागकामासाठी, ९) कारखान्यामधील उपाहारगृहे व स्वच्छतागृहे ह्यांमध्ये वापरण्यासाठी इत्यादी. वरीलपैकी क्र. १ ते ४ ह्या वापरांसाठी अत्यंत उच्च प्रतीचे पाणी असावे लागते, तर क्र. ९ मध्ये उत्पन्न झालेले सांडपाणी एकत्र करून, शुद्ध करून, बागकामासाठी आणि स्वच्छतागृहांमध्ये पुनर्वापरासाठी घेतल्यास पिण्याच्या पाण्याची बचत करता येते.

उत्पादनासाठी खूप पाणी वापरणार्‍या (उदा., वस्त्रोद्योग, कागद, खनिज तेल इ.) कारखान्यांमध्ये औद्योगिक सांडपाणी स्वच्छ करून त्याचा पुनर्वापर केला जातो.

वरील सर्व कामासाठी वापरण्याच्या शुद्धीकरण प्रक्रिया घरगुती जलशुद्धीकरणासारख्या असल्या तरी शुद्ध केलेले पाणी पिण्याच्या पाण्यापेक्षा खूपच उच्च प्रतीचे असावे लागते कारण त्या शुद्धतेवर तयार मालाची प्रत तसेच यंत्रणेची कार्यक्षमता अवलंबून असते. उदा., क्र. १ ते ४ शुद्धीकरण प्रक्रिया –

पिण्यायोग्य पाणी ⟶ विपरित परासरण (Reverse osmosis) ⟶ पृष्ठशोषण (Adsorption) ⟶ आयन विनिमय (ion exchange) ⟶ प्रतिआयनीभवन (deionization) ⟶ वायुविनिमय (gas transfer) पाण्यामधील विरघळलेले वायू पूर्णपणे काढून टाकण्यासाठी रसायनांचा उपयोग, तसेच पाण्यामध्ये विरघळलेल्या पदार्थांचे स्फटिकीकरण होऊ नये म्हणून वापरण्याची रसायने (sequestering agents) इत्यादी. वरीलपैकी वापरण्याच्या प्रक्रिया आणि त्यांचा क्रम शुद्ध केलेले पाणी उत्पादन प्रक्रियेमध्ये कोठे वापरणे आहे ह्यावर अवलंबून असतो.

उपाहारगृहे व स्वच्छतागृहे ह्यामधील सांडपाण्याची जलशुद्धीकरण प्रक्रिया ⟶ चाळणे (screening)⟶ वायुजीवी जीवाणू वापरून केलेले शुद्धीकरण ⟶ निस्यंदन (Filtration) ⟶ पृष्ठशोषण (Adsorption) ⟶ निर्जंतुकीकरण (disinfection).

घरगुती वापरामध्ये सर्वांत शुद्ध आणि जंतुविरहित पाणी लागते ते पिण्यासाठी, अन्न शिजविण्यासाठी.  त्यासाठी बाजारात अनेक प्रकारची सुटसुटीत वापरण्यास सोपी उपकरणे उपलब्ध आहेत त्यांच्यामध्ये पाण्याचे निस्यंदन, पृष्ठशोषण, विपरित परासरण आणि अतिनील किरण (ultraviolet rays) वापरून पाण्याचे निर्जंतुकीकरण  करण्याची सोय केलेली असते.

समीक्षक : सुहासिनी माढेकर