बोएम-बाव्हेर्क, यूजीन फोन : (१२ फेब्रुवारी १८५१ – २७ ऑगस्ट १९१४). नामवंत ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ज्ञ व मुत्सद्दी. त्यांचा जन्म ब्रून (मोरेव्हिया) येथे झाला. यूजीन फोन नाइट बोएम फोन बाव्हेर्क हे त्यांचे पूर्ण नाव. व्हिएन्ना विद्यापीठात कायदा व अर्थशास्त्र या विषयांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी इ. स. १८७२ – इ. स. १८७५ या काळात ऑस्ट्रियाच्या वित्त मंत्रालयात काम केले. त्यानंतर इ. स. १८८० पर्यंत त्यांनी विविध पदांवर काम केले. इ. स. १८८१ – इ. स. १८८९ या काळात त्यांनी इन्सब्रुक विद्यापीठात अर्थशास्त्राचे अध्यापन केले. ‘ऑस्ट्रियन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ या संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ असलेले अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ कार्ल मेंगर, फीड्रिख फोन वायझर व बोएम-बाव्हेर्क या त्रयींपैकी ते एक. त्यांनी कार्ल मेंगर या अर्थशास्त्रज्ञांसोबत आपल्या कार्याची सुरुवात केली.

बोएम-बाव्हेर्क हे आर्थिक सिद्धांताच्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध टिकाकार, आर्थिक उपपत्तीकार आणि विचारवंत म्हणून लोकप्रिय होते. त्यांचा ‘भांडवल आणि व्याज’ या विषयीचा सिद्धांत अर्थशास्त्राच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. यामुळेच अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांनी त्यांच्या कार्याची तुलना सनातनवादी परंपरेतील थोर अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकार्डो (David Ricardo) यांच्याशी केली. कॅपिटल ॲण्ड इंटरेस्ट (१८८४, १८८८, ३ खंड म. शी. भांडवल आणि व्याज) हा बोएम-बाव्हेर्क यांचा प्रसिद्ध ग्रंथ. या ग्रंथाच्या पहिल्या खंडात बोएम-बाव्हेर्क यांनी इ. स. १८८४ मध्ये हिस्ट्री ॲण्ड क्रिटिक ऑफ इंटरेस्ट थिअरीज आणि दुसऱ्या खंडात इ. स. १८८९ मध्ये ‘पॉझिटिव्ह थिअरी ऑफ कॅपिटल’ या लेखांची मांडणी केली. बोएम-बाव्हेर्क यांच्या मृत्युनंतर तिसऱ्या खंडात इ. स. १९२१ मध्ये ‘एसेज ऑन कॅपिटल ॲण्ड इंटरेस्ट’ या लेखांची मांडणी होऊन आधुनिक आर्थिक सिद्धांतात महत्त्वपूर्ण योगदान दिले गेले आहे. आपल्या लिखाणांतर्गत त्यांनी मार्क्सवादी मूल्यसिद्धांतावर विशेष टीकाटिप्पणी केली. कार्ल मार्क्स  यांच्या सिद्धांतावर अशी टीकी करणारे ते पहिले अर्थशास्त्रज्ञ होय. त्यांच्या मते, भांडवलदार श्रमिकांचे शोषण करीत नाहीत, तर त्यांना उत्पन्न आणि रोजगार पुरवितात. जर उत्पादन तत्क्षणिक होत असेल, तर उत्पादनाला मदत केल्याने श्रमिकांना सर्व मोबदला प्राप्त होतो आणि उत्पादन फेऱ्यागणिक होत असेल, तर त्या अनुषंगाने श्रमिकांना मोबदला मिळून भांडवलाचीही निर्मिती होते. मार्क्स यांचा ‘श्रमिकांचा शोषणविषयक सिद्धांत’ उत्पादनप्रक्रियेतील ‘समय’ या आयामाकडे दुर्लक्ष करतो, असे बोएम-बाव्हेर्क यांचे मत आहे.

बोएम-बाव्हेर्क यांनी धनात्मक व्याजदराची कारणमीमांसा करताना लोकांच्या उत्पन्नाची आणि वस्तुंची सीमांत उपयोगिता यांत काळागणिक होणाऱ्या ऱ्हासासोबत वर्तमान वस्तुंची तांत्रिक श्रेष्ठता हे मुख्य कारणही नमूद केले. त्यांच्या मते, भांडवलाचा निव्वळ प्रत्यय हा फेऱ्यागणिक उत्पादित केलेल्या मूल्याधिक्याचा परिणाम आहे. भांडवल जर स्वमालकीचे असेल, तर भांडवलाला व्याज दिले गेले पाहिजे; हा त्यांचा विचार मुख्य प्रवाहातील अर्थशास्त्रज्ञांनी मान्य केला.

बोएम-बाव्हेर्क यांनी इ. स. १८९५ – इ. स. १९०४ या कालावधीत तीन वेळा (इ. स. १८९५; १८९७-९८; १९००–१९०४) ऑस्ट्रियाचे वित्तमंत्री हे पद भूषविले. त्या काळात सुवर्णचलनाची ओळख आणि साखरेवरील अर्थसाह्य हटविणे या महत्त्वपूर्ण सुधारणांत त्यांचे सक्रीय योगदान होते. अर्थव्यवस्थेच्या वित्तीय स्थैर्यासाठी संतुलीत अंदाजपत्रकाबाबत ते नेहमी आग्रही होते. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ योझेफ आलोईस शुंपेटर यांनी बोएम-बाव्हेर्क यांच्या या युक्तिवादाचे समर्थन केले होते. इ. स. १९०४ मध्ये ऑस्ट्रियन लष्कराच्या वित्तीय मागणीत मोठी वाढ झाली. परिणामी, अंदाजपत्रक असंतुलित झाल्याने बोएम-बाव्हेर्क यांनी वित्तमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पुन्हा व्हिएन्ना विद्यापीठात अध्यापनाचे कार्य सुरू केले.

बोएम-बाव्हेर्क यांचे कॅपिटल ॲण्ड इंटरेस्ट (१८८४), दि पॉझिटीव्ह थिअरी ऑफ कॅपिटल (१८९१), कार्ल मार्क्स ॲण्ड दि क्लोज ऑफ हिज सिस्टीम (१८९८), रिसेन्ट लिटरेचर ऑन इंटरेस्ट (१९०३), कंट्रोल ऑर इकॉनॉमिक लॉ? ॲन एसे  (१९१४ ) इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध होत.

बोएम-बाव्हेर्क यांचे व्हिएन्ना येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Böhm Bawerk, Eugen V., The Positive Theory of Capital, London, 1891.
  • Edwin R. A. Seligman and Alvin Johnson, Encyclopedia of the Social Sciences, Vol. I, 1959.
  • David L. Sills, International Encyclopedia of the Social Sciences, 1968.
  • David R. Henderson, The Concise Encyclopedia of Economics, 2007.
  • Robert P. Guinn, The New Encyclopedia Britannica, Vol. II, 1911.

समीक्षक : निर्मल भालेराव