सीएलआरआय

सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट ( CLRI ) ही  जगातील सर्वांत मोठी चर्म संशोधन संस्था आहे. या संस्थेची स्थापना २४ एप्रिल, १९४८ रोजी चेन्नई (तमिळनाडू) येथे वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या अंतर्गत घटक प्रयोगशाळेच्या स्वरूपात केली गेली.

दुसऱ्या महायुद्धानंतर भारतात चर्मोद्योगासंबंधी संशोधन करणाऱ्या स्वतंत्र संस्थेची गरज होती. भारतीय चर्मोद्योग त्या काळी अमेरिका, जर्मनी, ब्रिटन इ. प्रगत देशांशी तुलना करता फार मागे होता. उच्च प्रतीचे कातडे तयार करण्यासाठी प्रगत देशात यांत्रिक व रासायनिक उद्योगाचे पाठबळ होते. तयार चर्मास मागणी भरपूर असल्याने त्याचा खप झपाट्याने होत असे.  याचा विचार करून कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) या संस्थेतील चर्म संशोधन समितीच्या शिफारशीनुसार सीएसआयआर या संस्थेने मद्रास येथे सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेची  स्थापना केली.

उद्दिष्ट : विज्ञानातील नवीन शोधांचा उपयोग चर्मोद्योगांसाठी करून त्यास आधुनिक स्वरूप देणे तसेच आर्थिक, सामाजिक व इतर समस्या सोडवून चर्मोद्योग एक प्रगतिशील उद्योग बनविणे हा या संस्थेचा उद्देश होय.

कार्यक्षेत्र : आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी या संस्थेने पुढीलप्रमाणे कार्ये केली :

(१) चर्मालयात कातडी येईपर्यंत ती कशी टिकतील यासंबंधीचे संशोधन.

(२) ई.  आय. टॅनिंग, ढोरी पद्धत व क्रोम पद्धत या प्रकियांत सुधारणा.

(३) वनस्पतिज पदार्थाच्या आयातीस आळा घालण्यासाठी देशात उपलब्ध असलेल्या टॅनिनयुक्त वनस्पतींचा वापर करून मिश्र टॅनिंग पदार्थ तयार करणे.

(४) चर्मोद्योगात लागणारी काही रसायने व यंत्रे तयार करणे.

(५) चर्मालयातील अपशिष्टांपासून उपपदार्थ मिळवणे आणि प्रदूषण टाळणे यांविषयी संशोधन.

याशिवाय चर्मावरील मूलभूत संशोधन येथे चालते. विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कातडी कपडे व बुटाचा रचनात्मक विकास करणे, नमुने बनवणे आणि प्रकल्प सल्ला, उपक्रम व्यवहार्यता अहवाल तयार करणे, गुणवत्ता नियंत्रण या बाबतीत संस्था तांत्रिक मदत देते.

शैक्षणिक कार्य : चर्म उद्योगास आवश्यक तंत्रज्ञ ही संस्था प्रशिक्षण देऊन तयार करते. मद्रास विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी ही संस्था मदत करते. डॉक्टरेट पदवीसाठीही या संस्थेत संशोधन चालते. चर्मतंत्राच्या शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय केंद्र या संस्थेत आहे. आशिया व आफ्रिका या देशांतून येथे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात.  या संस्थेमध्ये अभियांत्रिकी विज्ञान, रासायनिक आणि भौतिक विज्ञान, जैव विज्ञान आणि माहिती विज्ञान असे विभाग आहेत. या संस्थेची कानपूर, अहमदाबाद, जलंदर आणि कोलकाता येथे प्रादेशिक विस्तार केंद्रे कार्यरत आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेतील चर्मोद्योगाचे स्थान व महत्त्व पाहून  या उद्योगाच्या  विविध आर्थिक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी संस्थेने एक स्वतंत्र शाखा स्थापन केली आहे. या शाखेतर्फे तांत्रिक-आर्थिक सर्वेक्षण व योजना हाती घेण्यात येतात. चर्मोद्योगातील लोकांपर्यंत या संस्थेचे संशोधन पोहोचवण्याकरिता संस्थेमध्ये व इतरत्र विविध प्रायोगिक प्रदर्शने भरविणे; तांत्रिक माहिती देणे; नियतकालिके, पुस्तके इत्यादींचे प्रकाशन करणे, एकस्व घेणे; उद्योगाला संस्थेतर्फे तज्ञ पुरवणे व तांत्रिक साहाय्य देणे इ. मार्गांचा अवलंब करण्यात येतो.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेबरोबर कातडी उत्पादने तयार करणे, विशेषत: पादत्राणे आणि चर्म उत्पादनाची रचना या विशेष पैलूचे व्यावसायिक प्रशिक्षण, यासंबंधीचा शैक्षणिक कार्यक्रम संस्थेने २००४ मध्ये सुरू केला. त्याच वर्षी संस्थेने तांदळाच्या कोंड्याच्या  तेलापासून बायो डीझेल निर्मिती करण्याचा पथदर्शी प्रकल्प हाती घेतला. येथील शास्त्रज्ञांनी २०१४ मध्ये चर्म उद्योगावरील संशोधनातील समस्या आणि त्यावरील उपायांची देवाणघेवाण सोयीस्कर होण्यासाठी संकेतस्थळ सुरू केले  आहे.

उपयुक्तता : सी. एल. आर. आय. या संस्थेच्या संशोधनामुळे कातडी पट्ट्यांची व औद्योगिक कातड्यांची आयात जवळजवळ बंद झाली आहे. चर्मोद्योग साहाय्यक तज्ञांची आयातही बऱ्याच प्रमाणात कमी झाली. संस्थेच्या संशोधनामुळे कातड्यांचा दर्जा सुधारला असून निर्यातीत वाढ होण्यास मदत झाली आहे. कोलकाता, राजकोट, जालंदर, कानपूर व मुंबई येथे संस्थेच्या शाखा आहेत.

सन २००३ मध्ये या संस्थने भाजलेल्या रुग्णांच्या त्वचा आच्छादित करण्यासाठी जैविक आच्छादन  विकसित केले. द्वितीय आणि तृतीय स्थितीतील भाजलेले व्रण जलद व अधिक प्रभावीपणे बरे होण्यास त्यामुळे मदत होते.

जी .एन. रामचंद्रन यांनी संयोजी पेशी जालातील प्रथिन घटकाची तिहेरी सर्पिलाकार (helical) प्रतिकृती विकसित केली (१९५४). त्यांच्या या योगदानास १९९९ मध्ये एवाल्ड  पुरस्काराने ( Ewald Prize) सन्मानित करण्यात आले. सदर संशोधनाकरिता सी. एल. आर. आय. या संस्थेने त्यांना नमुने पुरविले होते.

संदर्भ :  http://www.clri.org/                                                                                                                                                                                   

समीक्षक : मोहन मद्वाण्णा