कर्नाटक ( दाक्षिणात्य ) संगीतातील रचनांचा एक प्रकार. या प्रकारातील संगीतरचना सर्वसाधारणपणे भक्ती, प्रेम, शौर्य इ. रसांवर आधारित असतात. विशेषतः हंसध्वनी, कल्याणी, झिंजोटी, बिलहारी आदी रागांचे सादरीकरण स्वरजती रचनांमधून केले जाते.

स्वरजती सादरीकरणाची सुरुवात वर्णम् या शास्त्रोक्त गान प्रकाराने होते. वर्णम् म्हणजे ठराविक स्वरात बांधलेला छोटासा तुकडा. यासाठी मुख्यत्वे आदिताल किंवा अट्टताल या तालांची निवड करतात. वर्णम् मधील शब्द छोटे आणि सुटसुटीत असतात आणि ते काहीशा दीर्घ स्वराकृतीत असे बसविलेले असतात, की ज्यातून रागस्वरूप स्पष्ट व्हावे. वर्णम् नंतर पल्लवी आणि अनुपल्लवी सादर केली जाते. ‘पल्लवी’ रागाचे पूर्वांग स्थापित करते, तर ‘अनुपल्लवी’ उत्तरांग स्पष्ट करते. वर्णम् सादर केल्यानंतर रागसंगीताच्या रचनांमध्ये सर्वाधिक महत्त्व असलेली कृति आणि कीर्तन सादर केले जाते. कृती आणि कीर्तन यांत अनुक्रमे संगीत-कवित्व आणि साहित्यमाधुर्य हे प्रधान घटक असतात. राग मांडणीतील हा महत्त्वाचा भाग असतो. कृतीमध्ये ‘पल्लवी’, ‘अनुपल्लवी’ आणि ‘ चरणम् ’ हे प्रकार अंतर्भूत असतात. ‘चरणम्’मुळे ‘पल्लवी’ आणि ‘अनुपल्लवी’ अधिक स्पष्ट होतात. ‘अनुपल्लवी’ नसलेल्या कृतीस ‘कीर्तन’ म्हणतात.

स्वरजती सादर करताना सुरुवातीस शब्दरहित स्वराकारांचा आविष्कार केला जातो. त्यानंतर शब्दबद्ध रचना गायली जाते. कर्नाटक संगीतातील प्रख्यात रचनाकार त्यागराज यांच्या रचना स्वरजती पद्धतीने सादर केल्या जातात.

कर्नाटक संगीतातील महान त्रिमूर्ती म्हणजे त्यागराज, मुथ्थुस्वामी दीक्षितर आणि श्यामशास्त्री. त्यागराजांच्या ‘नट’, ‘आरभी’, ‘वरळी’, ‘श्री’ आणि ‘गौला’ या पाच रागांतील स्वरजती प्रसिद्ध आहेत. या रचना पंचरत्न म्हणून ओळखल्या जातात. मुथ्थुस्वामींच्या ‘कमलांगा’ आणि ‘नववर्ण’ या कृती प्रसिद्ध आहेत. त्यागराज आणि श्यामशास्त्री यांच्या रचना मुख्यत्वे तेलुगू भाषेत आहेत, तर मुथ्थुस्वामी दीक्षितर यांनी आपल्या रचना संस्कृत भाषेत लिहिल्या आहेत.

समीक्षक : सुधीर पोटे