मारिओ कॅपेची

कॅपेची, मारिओ रॅमबर्ग : (६ ऑक्टोबर, १९३७).

इटालियन शास्त्रज्ञ. लक्ष्यवेधी जनुक परिवर्तन (Targeted gene modification) या संशोधनासाठी मारिओ कॅपेची, मार्टिन एव्हान्‍स आणि ऑलिव्हर स्मिथीज यांना २००७ सालचे वैद्यकशास्त्र आणि शरीरविज्ञान विषयातील नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.

मारिओ कॅपेची यांचा जन्म व्हेरोना, इटली येथे झाला. त्यांचे शिक्षण बक्स काउंटी, पेनसिल्व्हेनिया येथील जॉर्ज स्कूलमध्ये झाले आणि तेथूनच त्यांनी पदवी संपादन केली. कॅपेची यांनी १९६१ मध्ये ॲंटिओख कॉलेज, ओहिओ (Antioch College, Ohio) येथून रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांमध्ये विज्ञानशाखेची पदवी मिळवली. पदवीधर विद्यार्थी म्हणून भौतिकशास्त्र व गणिताचा अभ्यास करण्यासाठी कॅपेची एमआयटीमध्ये आले. मात्र आपल्या अभ्यासक्रमादरम्यान रेणवीय जीवशास्त्रात (Molecular Biology) त्यांना रस निर्माण झाला. त्यानंतर जे. डी. वॉटसन (डीएनएच्या रचनेचे सहसंशोधक) यांच्या प्रयोगशाळेत सहभागी होण्यासाठी हार्व्हर्ड येथे ते स्थलांतरित झाले. वॉटसन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांचा प्रबंध पूर्ण केला. १९६७ मध्ये कॅपेची यांना हार्व्हर्ड विद्यापीठाकडून जीवभौतिक शास्त्रामध्ये पीएच.डी. मिळाली.

हार्व्हर्ड विद्यापीठात ते सोसायटी ऑफ फेलो या संघाचे कनिष्ठ अधिछात्र (Junior fellow) होते (१९६७-१९६९). १९६९ मध्ये हार्व्हर्ड मेडिकल स्कूलमधील जीवरसायनशास्त्र विभागात ते साहाय्यक प्राध्यापक बनले. नंतर ते उटा विद्यापीठात रूजू झाले. कॅपेची १९८८ पासून हार्व्हर्ड ह्यूज मेडिकल इन्स्टिट्यूट येथे प्रमुख संशोधक आहेत. त्याशिवाय नॅशनल सायन्स ॲकॅडमी या संस्थेचे ते सभासद आहेत.

मानवी भ्रूण विकासातील संबंधित जनुकांचा अभ्यास करण्यासाठी कॅपेची यांनी मूषकाच्या भ्रूण पेशींचा उपयोग केला. या भ्रूण पेशीतील एक जनुक काढून टाकलेले होते . जनुक काढून टाकण्याऐवजी कृत्रिम डीएनए क्रम जनुकाच्या स्थानी घातल्यास त्या स्थानावरील जनुक व्यक्त होत नाही. त्या जनुकाच्या व्यक्ततेचा अभाव झाल्यास काय परिणाम होतो, याचा त्यांनी अभ्यास केला. या मूषकाचे नाव ‘नॉक आऊट माऊस’ (Knockout Mouse) असे ठेवण्यात आले. हा मूषक जनुकीय अभियांत्रिकी (Genetic Engineering) आणि कृत्रिम गर्भधारणा (in vitro fertilization) या तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आला होता.

कॅपेची यांनी मूषकाच्या होक्स जनुक गटातील जनुकांचे  विश्लेषण केले. होक्स जीन्स (Hox gene) हा जनुक गट बहुतेक सर्व बहुपेशीय प्राण्यांच्या भ्रूण विकासामध्ये (embryonic development)  शरीर खंडांचा व अवयवांचा क्रम निश्चित करतात. सर्वांत प्रथम ही जनुके फळमाशीमध्ये आढळली. त्यानंतर त्यांचा आढळ सर्व पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये आहे, असे सिद्ध झाले.

सध्या उटा विद्यापीठामध्ये कॅपेची मानवी आनुवंशिकी (Human genetics) या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

पहा : एव्हान्‍स, मार्टिन; स्मिथीज, ऑलिव्हर.

संदर्भ : Nobel physiology And medicine, 2007.

 समीक्षक : मद्वाण्णा, मोहन