आयएसओ हे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन या नावाचे संक्षिप्त रूप आहे. आयएसओ ही आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था असून तिचे मुख्यालय जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे. जगातील सु. १५० देशांच्या राष्ट्रीय मानक संस्था या संस्थेशी संलग्न आहेत.
उद्दिष्ट : औद्योगिक मानांकनाचे आंतरराष्ट्रीय समन्वयन आणि एकत्रीकरण हे उद्दिष्ट समोर ठेवून आयएसओ या संस्थेची स्थापना १९४६ मध्ये करण्यात आली. २३ फेब्रुवारी १९४७ पासून ही संस्था कार्यरत झाली.
इतिहास : या संस्थेचे फ्रेंच नाव Organisation internationale de normalisation तर रशियन नाव Mezhdunarodnaya organizatsiya po standartizatsii असे आहे. परंतु देशपरत्वे आणि भाषापरत्वे संस्थेचे नाव बदलू नये, यासाठी समान या अर्थाच्या isos या ग्रीक शब्दावरून आयएसओ असे संस्थेचे नामकरण करण्यात आले.
आयएसओ या संस्थेद्वारे ISO/R 1 : 1951 Standard reference temperature for industrial length measurements या शीर्षकाचे पहिले मानक १९५१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. सदर मानक अनेक वेळा सुधारित करण्यात येऊन सध्या ते ISO 1: 2002 या शीर्षकाने ओळखले जाते.
मे १९५२ पासून संस्थेशी निगडित तांत्रिक सदस्य, प्रसिद्ध मानके आणि संबंधित प्रशासकीय संरचना याबाबतची माहिती देणारे मासिक आयएसओ प्रसिद्ध करते.
मानक निर्मितीमधील मूलभूत तत्त्वे : आंतरराष्ट्रीय स्तरावरील औद्योगिक क्षेत्रातील मागणीनुसार मानकाचा विषय निवडला जातो. तांत्रिक समितीमधील सदस्य मानकाची व्याप्ती आणि स्वरूप ठरवतात.
कार्यक्षेत्र : १९६० मध्ये ISO 31 हे एककांसंदर्भातील मानक प्रसिद्ध करण्यात आले (या मानकाचे ISO 80 000 असे नामांतरण करण्यात आले). हे मानक एसआय मापन पद्धतीबाबत होते, जेणेकरून जागतिक पातळीवर सर्व मापन पद्धतीमध्ये एकसूत्रीपणा असावा. उदा., अंतर मोजणीसाठी मीटर तर वेळ मोजणीसाठी सेकंद हे एकक इत्यादी.
आयएसओ या संस्थेने १९६८ मध्ये मालवाहतुकीसंदर्भात पहिले मानक प्रसिद्ध केले. १९७१ मध्ये पर्यावरणाशी निगडित हवा आणि जल गुणवत्ता नियमनासाठी स्वतंत्र समित्या तयार केल्या. यामध्ये पर्यावरण तज्ञ मृदेची गुणवत्ता, पर्यावरण व्यवस्थापन आणि नूतनीकरण ऊर्जा यांवर लक्ष केंद्रित करतात. १९९५ मध्ये या संस्थेने आपले महाजालकावर जालपृष्ठ (webpage) प्रसिद्ध केले आणि २००० पासून जालपृष्ठावरून मानक विक्री सुरू केली. १९९६ मध्ये संस्थेने पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीचे ISO 14001 हे मानक प्रसिद्ध केले. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामधील सूक्ष्मातीत/अब्जांश तंत्रविद्या आणि जैवइंधने यांसारख्या नवोदित शाखांचे समावेशन करता यावे, याकरिता आयएसओ या संस्थेने २००३ नंतर आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार केला.
आयएसओ आणि आयईसी या संस्थांनी २००५ मध्ये JTC 1 नामक संयुक्त तांत्रिक समिती तयार केली. या समितीने ISO/IEC 27001 या शीर्षकाचे माहिती व तंत्रज्ञान (Information Technology) क्षेत्रासंबंधित व्यवस्थापन प्रणाली मानक प्रसिद्ध केले.
२०१० मध्ये ISO 26000 हे सामाजिक बांधिलकी/जबाबदारी या विषयाशी निगडित पहिले आंतरराष्ट्रीय मानक प्रसिद्ध केले. २०११ मध्ये प्रसिद्ध केलेले ISO 50001 हे मानक शासकीय आणि खाजगी संस्थांना ऊर्जा विनिमय आणि व्यवस्थापन यांबद्दल मार्गदर्शन करते. २०१६ मध्ये प्रसिद्ध केलेले ISO 37001 हे मानक संस्थांना लाचलुचपत प्रतिबंधाबाबत माहिती पुरवते. २०१८ मध्ये प्रसिद्ध केलेले ISO 45001 : 2018 हे मानक व्यवसायजन्य/कार्यक्षेत्रीय अपघात आणि आजार यांचे प्रमाण कमी करण्याबाबत माहिती देते.
सन्मान : प्रगत चलच्चित्र सांकेतिक प्रमाण (advanced video coding standard) निर्मितीसाठी २५ ऑगस्ट २००८ रोजी आयएसओ, आयटीयू आणि आयईसी या संस्थांना एकत्रितपणे एमी पुरस्काराने (Emmy award) सन्मानित करण्यात आले.
उपयुक्तता : औद्योगिक प्रमाणीकरण, ग्राहकाभिमुखता आणि सामाजिक जागरूकता या धोरणांमुळे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विकासामध्ये आयएसओ या संस्थेचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.
संदर्भ : www.iso.org
समीक्षक : अ. पां. देशपांडे